वायंगणीतील ‘तो’ मृतदेह पुण्यातील तरुणाचा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वायंगणीतील ‘तो’ मृतदेह 
पुण्यातील तरुणाचा
वायंगणीतील ‘तो’ मृतदेह पुण्यातील तरुणाचा

वायंगणीतील ‘तो’ मृतदेह पुण्यातील तरुणाचा

sakal_logo
By

वायंगणीतील ‘तो’ मृतदेह
पुण्यातील तरुणाचा

अंगठीवरून पटली ओळख

आचरा, ता. २२ ः वायंगणी सडा माळरानावर अर्धवट जळालेल्या स्थितीत आढळलेल्या ‘त्या’ मृतदेहाची ओळख पटली आहे. हा मृतदेह पुणे येथील प्रीतेश मधुकर ताम्हणकर (वय ४०) या तरुणाचा असल्याचा त्याची पत्नी प्रीती ताम्हणकर यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे. कर्जबाजारी आणि आजारपणाला कंटाळून आत्महत्या केल्याचा अंदाज नातेवाईकांनी व्यक्त केला. हातामध्ये सापडलेल्या अंगठीवरून मृतदेहाची ओळख पटली. पुढील तपासासाठी मृतदेहाची ‘डीएनए’ चाचणी करणार असल्याचे आचरा पोलिसांनी सांगितले.
पुणे येथून प्रीतेश ताम्हणकर हे बेपत्ता असल्याची फिर्याद पुणे येथील पोलिस ठाण्यात दाखल होती. वायंगणी मृतदेह आढळून आल्याचे समजल्यानंतर त्यांच्या पत्नी पुणे येथून पाहण्यासाठी आचरा येथे दाखल झाल्या. येथील पोलिसांनी वायंगणी येथील मृतदेहाच्या शेजारी सापडलेली अंगठी, टोपी, पाण्याची बाटली प्रीती ताम्हणकर यांना दाखविल्या. यावेळी त्यांनी मृतदेह पतीचा असल्याचे सांगितले. प्रीतेशने आपला मेहुणा अमर वागज यांना आत्महत्या करणार असल्याचे पत्र पोस्टाने पाठविले होते. हे पत्र त्यांना १८ जानेवारीला प्राप्त झाले होते. या पत्रात आजारपणास व कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे म्हटले होते, अशी माहिती पत्नीने आचरा पोलिसांना दिलेल्या जबाबात दिली. ताम्हणकर यांनी हे पत्र मालवण पोस्टातून पाठविले होते. प्रीतेश हे हैदराबादला ट्रेनिंगला जात असल्याचे सांगून घरातून निघून गेले होते. १३ जानेवारीपर्यंत ते पत्नीच्या संपर्कात होते. त्यानंतर त्यांचा संपर्क होत नसल्याने पत्नीने पुणे येथील समर्थ पोलिस ठाणे येथे १४ ला बेपत्ताची फिर्याद दिली; मात्र मेहुण्याला त्यांचे पत्र प्राप्त झाल्यानंतर नातेवाईकांनी मालवण येथे शोधाशोध सुरू केली होती. कोकणात आल्यावर ते तोंडवळी तळाशील या भागातील रिसॉर्टवर वास्तव्यास असल्याने तेथेही शोधाशोध झाली. दरम्यान, ओळख पटली असली तरी खात्रीसाठी मृतदेह उद्या (ता. २३) ‘डीएनए’ चाचणीसाठी पाठविणार असून त्यासाठी प्रीतेशच्या सख्ख्या भावाच्या रक्ताचे नमुने घेतले जाणार आहेत, असे आचरा पोलिसांकडून सांगण्यात आले.