
मंडणगडावर माघी गणेशोत्सव
मंडणगडावर
माघी गणेशोत्सव
मंडणगडः येथील नवयुवक तरुण मंडळातर्फे माघी गणेश जयंत्ती निमित्ताने मंडणगड किल्ल्यावर २५ जानेवारीला विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अभिषेक, पूजापाठ, धार्मिक कार्यक्रमासह कीर्तन व स्नेहज्योती अंध विद्यालयाचा सुस्वर भजनाचा कार्यक्रम होणार आहे. शिला लेंढे, सुभाष लेंढे, छाया लेंढे, राजेंद्र लेंढे यांच्या सौजन्याने पुजेनिमित्त प्रसाद व खिचडी महाप्रसाद होईल. कार्यक्रमाला तालुकावासीयांनी उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष समीर लेंढे, उपाध्यक्ष राहुल कोकाटे यांनी केले आहे.
--------
राष्ट्रसेविका समितीचा
मकर संक्रमण उत्सव
रत्नागिरी : राष्ट्रसेविका समितीचा रत्नागिरी शहराचा मकर संक्रमण उत्सव पटवर्धनवाडीतील टिळकनगर उद्यान येथे साजरा झाला. या वेळी ६७ महिला उपस्थित होत्या. जिल्हा सहशारीरिक शिक्षण प्रमुख अंजली पांचाळ या मुख्य शिक्षिका होत्या. सूर्य नमस्कार प्रात्यक्षिक झाले. रत्नागिरी शहर सेवाप्रमुख मृणाल भावे यांनी सूर्यनमस्कारांचे महत्त्व सांगितले. जिजामाता शाखा संपर्कप्रमुख अनुराधा ताटके यांनी प्रास्तविक केले. संक्रमण उत्सवाचे महत्व व समितीमार्फत चालवल्या जाणाऱ्या सेवाकार्यांची माहिती सांगितली. सौ. मुक्ता बाष्टे यांनी अत्यंत सोप्या भाषेत स्त्रियांचे आरोग्य याविषयी माहिती सांगितली. वैयक्तिक गीत जिल्हा सहकार्यवाहिका मीरा भिडे यांनी सांगितले. अनुश्री रायकर यांनी सांघिक गीत सांगितले. ५ फेब्रुवारीला होणाऱ्या संचलनाची माहिती देण्यात आली. कार्यक्रमाला ज्येष्ठ कार्यवाहिका विद्याताई पटवर्धन, चिपळूणच्या ज्येष्ठ सेविका मनीषा साठे, कोकण प्रांत संपर्क प्रमुख उमा दांडेकर उपस्थित होत्या.
-----------------
लोककला महोत्सवात
कोकणी पदार्थ मेजवानी
चिपळूणः येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या अरविंद जाधव अपरांत संशोधन केंद्राच्या वतीने ५ ते ८ फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या पर्यटन लोककला सांस्कृतिक कोकणी खाद्य महोत्सवातील स्टॉलसाठी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. कोकणातल्या लोककला, पर्यटन, कोकणी खाद्यसंस्कृती यांची ओळख सर्वदूर व्हावी यासाठी या महोत्सवाचे आयोजन केले आहे. कोकणी खाद्य संस्कृतीची ओळख व्हावी यासाठी महोत्सवात खाऊगल्लीचे आयोजन केले आहे. कोकणातील शाकाहारी, मांसाहारी आणि मस्त्याहारी खाद्यपदार्थाची मेजवानी उपलब्ध असणार आहे. पर्यटन लोककला सांस्कृतिक कोकणी खाद्य महोत्सवांतर्गत २२ स्टॉल उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यासाठी २५ जानेवारीपर्यंत नावनोंदणी करणाऱ्या इच्छुकांना हे स्टॉल उपलब्ध होणार आहेत. २९ जानेवारीला सोडत पद्धतीने स्टॉलचे वाटप केले जाणार आहे. इच्छुकांनी माहितीसाठी विभागप्रमुख प्रकाश घायाळकर, सुनील खेडेकर यांच्याशी संपर्क साधावा.