आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या कलाकारांनी सजला संगीत महोत्सव

आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या कलाकारांनी सजला संगीत महोत्सव

rat23p24.jpg
77729
रत्नागिरी : संगीत महोत्सवातील कलाकार यशस्वी सरपोतदार (गायन) ‘तालचक्र’ सादर करताना पं. विजय घाटे आणि शीतल कोलवलकर (कथ्थक), अभिषेक सिनगर (संवादिनी), सागर पाटोकर (पढंत), ताकाहिरो अराई (संतूर) आणि सुरंजन खंडाळकर (गायन). मेहताब अली नियाझी (सतारवादन) आणि पं. व्यकटेश कुमार (शास्त्रीय गायन). सोबत भरत कामत (तबला), पं. अजय जोगळेकर (संवादिनी), शिवराज पाटील आणि करुणा पटवर्धन (तानपुरा).
------------
नृत्य, ताल, सूर यांच्या त्रिवेणी संगमाची अनुभूती
संगीत महोत्सव; आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या कलाकारांनी रंगवल्या मैफिली
रत्नागिरी, ता. २३ : नृत्य, ताल, सूर यांच्या त्रिवेणी संगमाची अनुभूती संगीतप्रेमी रसिकांना देत थिबा राजवाड्याच्या परिसरात आर्ट सर्कल आयोजित शास्त्रीय संगीत महोत्सव आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या कलाकरांच्या सादरीकरणाने दिमाखात पार पडला. दोन दिवस चाललेल्या या महोत्सवाचे हे सोळावे वर्ष होते. यामध्ये शास्त्रीय गायन, सतार एकल वादनासोबत ‘तालचक्र’ या आगळ्या प्रयोगाने रसिकांना तृप्त केले. विद्युत रोषणाईत न्हाऊन निघालेला थिबा राजवाडा रंगमंचाच्या पार्श्वभूमीवर अधिकच खुलून दिसत होता.
महोत्सवाचे उद्घाटन गायिका यशस्वी सरपोतदार यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करून झाले. यावेळी ज्येष्ठ संवादिनीवादक अजय जोगळेकर, एसबीआयचे सुहास प्रभुदेसाई आणि महोत्सवाकरिता खास मुंबईहून आलेले रसिक माधव पटवर्धन आणि आर्ट सर्कलच्या अंजोर प्रभुदेसाई आदी उपस्थित होते. पहिल्या दिवसाची सुरवात यशस्वी सरपोतदार यांनी यमन रागाच्या आळवणीने केली. संध्याकाळच्या प्रहराचा यमन हा राजा. त्यामुळे अनेकांचा आवडता आणि आणि शास्त्रीय संगीताचा अभ्यास नसलेल्याला सुद्ध चटकन कळेल असा! परंतू या मैफिलीच्या निमित्ताने वेगळ्याच रुपड्याचा यमन रसिकांना अनुभवायला मिळाला. त्यानंतर शहाणा कानडा रागातील मध्यलय एकताल आणि द्रुतलय एकताल मधील बंदिशी सादर केल्या. यशस्वी यांनी मैफिलीचा समारोप राम बरवा कृष्ण बरवा या भजनाने केला. प्रणव गुरव यांची तबल्यासाठी तर अथर्व कुलकर्णी यांची संवादिनीसाठी समर्थ साथ यशस्वी यांना मिळाली. तसेच त्यांच्या शिष्या राधा आणि मयूरी यांनी आपल्या गुरूंना तानपुरा साथ केली.
मध्यंतरानंतर ‘तालचक्र’ या कार्यक्रमात तबला, संवादिनी, संतूरवादन, गायन आणि कथ्थक नृत्य या चारही कलांच्या संगमाने रसिकांच्या डोळ्याचे पारणे फेडले. तबलावादक पद्मश्री विजय घाटे यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम साकारला आहे. जपानचे संतूरवादक ताकाहिरो अराई यांनी संतूरच्या तारा छेडल्यानंतर वातावरण मंत्रमुग्ध बनून गेले. जोडीला सुरंजन खंडाळकर यांचे गायनही सुखावणारे होते. संवादिनीवादक अभिषेक सिनकर आणि पढंतसाठी सागर पाटोकर यांनीही या तालचक्रमध्ये सुंदर रंग भरले. शीतल कोळवलकर यांच्या तितक्याच ताकदीच्या आणि सफाईदार पदन्यासाने मैफिलीला पूर्णत्व दिले.
महोत्सवाच्या समारोपाच्या दिवशी कार्यक्रमाची सुरवात मेहताब अली नियाझी यांच्या सतारवादनाने झाली. सतारीच्या तारांनी छेडलेल्या शुद्ध कल्याणने पुढच्या काही क्षणातच रसिकमनाचा ताबा घेतला. अवघड अशा धमार सादरीकरणाने सतारवादनाची सांगता झाली. वयाच्या एकविसाव्या वर्षी मेहताब यांची तयारी विस्मयचकीत करणारी आहे. स्वप्नील भिसे यांच्या तबलासाथीने बहार आणली. संपूर्ण मैफलीचे संगीतसंयोजन एस. कुमार साऊंडचे उदयराज सावंत यांनी, तर सूत्रसंचालन दीप्ती कानविंदे यांनी उत्तमरित्या केले.

चौकट
व्यंकटेश कुमार यांच्या शास्त्रीय गायनाने महोत्सवाला उंची
व्यंकटेश कुमार यांच्या शास्त्रीय गायनाने महोत्सवाला एक उंची प्राप्त करून दिली. पंडितजींच्या नितळ, आरस्पानी स्वरांनी रसिकांच्या हृदयाचा ठाव घेतला. राग शंकराने स्वरांच्या बरसातीला प्रारंभ झाला. अजय जोगळेकर यांच्या जादुई बोटांनी संवादिनीद्वारे संवाद साधला, तर भरत कामत यांच्या समर्थ तबला साथीने पंडितजींच्या गाण्यात रंग भरले. राग सादरीकरणानंतर त्यानंतर बसंत बहार, दुर्गा, चारूकेसी रागातील बंदिशी व काही भजनं सादर करून रसिकांना स्वरानंदी डोलायला लावलं. पंडितजींचे शिष्य शिवराज पाटील आणि करुणा पटवर्धन यांनी तानपुऱ्याची साथ केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com