धावत्या बेस्‍ट बसला आग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धावत्या बेस्‍ट बसला आग
धावत्या बेस्‍ट बसला आग

धावत्या बेस्‍ट बसला आग

sakal_logo
By

धावत्या बेस्‍ट बसला आग
मुंबई : वांद्रे सिग्नल जंक्शन येथे बेस्टच्या धावत्या गाडीला भीषण आग लागली. या वेळी बसमध्ये साधारणतः २५ प्रवासी होते. वाहकाच्या सतर्कतेमुळे कुणालाही दुखापत झाली नाही. मात्र आगीमुळे संपूर्ण बस जळून खाक झाली. बस मार्ग क्रमांक सी- ५१ अनुक्रमांक १२, बस गाडी क्रमांक ७८७६, सांताक्रूझ आगार मातेश्वरी बस वाहक-चालकांसह निघाली होती. सदर बस सांताक्रूझ आगाराकडे अप दिशेने जात असताना सुमारे सव्वाएक वाजता एस. व्ही. रोड, वांद्रे सिग्नल जंक्शन येथे आली असता या गाडीच्या गिअर बॉक्सजवळ स्पार्क होऊन शॉर्टसर्किटने गाडीने पेट घेतला. ही सीएनजी नॉन एसी बस आहे. आग लागल्याचे लक्षात येताच वाहकाने तातडीने बस थांबवली. त्यानंतर लागलीच गाडीतील वीस ते पंचवीस प्रवाशांना बसमधून सुखरूप खाली उतरवले. या वेळी कोणीही जखमी झाले नाही, मात्र बस पूर्णपणे जळाली. सांताक्रूझ आगार मातेश्वरीचे आगार अधिकारी शिरोडकर यांनी घटनास्थळाला भेट देत माहिती घेतली. या वेळी त्यांनी कर्मचारी आणि प्रवाशांची चौकशी केली. बसला नेमकी आग का लागली, याची चौकशी करण्यात येत आहे. या वेळी सहायक आगार व्यवस्थापक, वांद्रे आगार आणि इतर पथक उपस्थित होते.
---
पालिका सुरक्षा दलास पारितोषिक
मुंबई : महाराष्ट्र दिनी राज्यस्तरीय पथ संचलन सोहळ्यादरम्यान सर्वोत्कृष्ट पथ संचलनाचे द्वितीय पारितोषिक बृहन्मुंबई महापालिकेच्या सुरक्षा दलास जाहीर झाले होते. छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे मंगळवारी (ता. २४) आयोजित एका विशेष सोहळ्यादरम्यान अप्पर पोलिस महासंचालक (प्रशासन) अनुपकुमार सिंह यांच्या हस्ते आणि पोलिस सह आयुक्त (प्रशासन) मुंबई एस. जयकुमार आणि अप्पर पोलिस आयुक्त (सशस्त्र पोलिस दल) आरती सिंह यांच्या उपस्थितीत ते पारितोषिक आणि सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. दरवर्षी महाराष्ट्र दिनी म्हणजेच १ मे रोजी दादर पश्चिम परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे महाराष्ट्र राज्याच्या वर्धापन दिनाचा मुख्य सोहळा आयोजित होतो. राज्यपालांच्या उपस्थितीत होणाऱ्या या सोहळ्यादरम्यान विविध गणवेशधारी दलांच्या पथकांचे पथसंचलनदेखील मोठ्या जोशात व उत्साहात होत असते.
--
पोलिसांचे ऑपरेशन ‘ऑल आऊट’
मुंबई : मुंबई शहरात प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर २४ आणि २५ जानेवारीला ऑपरेशन ऑलआऊट हे विशेष अभियान मुंबई पोलिसांकडून राबवण्यात आले. मुंबई पोलिसांच्या रेकॉर्डवरील ५१ आरोपींना अटक करण्यात आली. १०० अजामीनपात्र वॉरंटची बजावणी करून आरोपींना अटक करण्यात आली.
अमली पदार्थ खरेदी-विक्री करणाऱ्यांवर १३९ कारवाया करण्यात आल्या. अवैध शस्त्र बाळगणाऱ्या आरोपींवर ४१ कारवाया करण्यात आल्या असून त्यात चाकू, तलवारी जप्त करण्यात आल्या. अवैध दारू विक्री, जुगार धंद्यांवर ७० ठिकाणी छापे टाकले. मुंबई शहराबाहेर तडीपार केलेले, परंतु मुंबई शहरात विनापरवाना प्रवेश केलेल्या तडीपार आरोपींना अटक करण्याच्या अनुषंगाने एकूण ४२ कारवाया करण्यात आल्या. महाराष्ट्र पोलिस कायद्याचे कलम १२०, १२२ व १३५ अन्वये संशयितरीत्या वावरणाऱ्या इसमांवर ११४ कारवाया केल्या.