
खारवी समाज पतसंस्थेच्या दाभोळ शाखेचे उद्घाटन
खारवी समाज पतसंस्थेच्या
दाभोळ शाखेचे उद्घाटन
दाभोळ, ता. २८ ः संपूर्ण राज्यातील सहकार चळवळीत अल्पावधीतच भक्कमपणे उभारी घेत असलेल्या खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्थेच्या दाभोळ शाखेचे उद्घाटन रविवारी महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे कार्याध्यक्ष अँड. दीपक पटवर्धन यांच्या हस्ते करण्यात आले.
पतसंस्थेची दाभोळ येथे शाखा झाली ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. ही शाखा चालवण्याची पालक म्हणून आम्ही जबाबदारी घेत असून, सर्वतोपरी सहकार्य करण्याचे अभिवचन दर्यावर्दी मच्छीमार खारवी समाज संस्था अध्यक्ष रवींद्र नाटेकर यांनी दिले. सहाय्यक निबंधक तृप्ती उपाध्ये यांनी एकूणच संस्थेची यशस्वी वाटचाल सहकार चळवळीत दृढ करण्याकरिता सर्व सभासद, संचालक मंडळ सदस्य यांनी वेळोवेळी जास्तीत जास्त शिक्षण व प्रशिक्षण घेत राहिले पाहिजे. पतसंस्था आपल्या दारी या विशेष उपक्रमाचे कौतुक करत असताना दाभोळ शाखेला आमचे सहकार्य राहील, अशी ग्वाही दिली.
संस्थेचे अध्यक्ष संतोष पावरी यांनी प्रास्ताविकातून संस्थेचा चढता आलेख हा समाजबांधवांचे व सभासदांचे सहकार्यामुळेच शक्य झाले आहे यामुळेच आम्ही सर्व संचालक, प्रशासकीय अधिकारी व समन्वय समिती सदस्य हे धनुष्यबाण पेलवत आहोत. असेच सहकार्य सर्वांकडून अपेक्षित असून उर्वरित मंजूर झालेल्या शाखा लवकरच आम्ही सुरू करू, असे जाहीर केले. सूत्रसंचालन सुधीर वासावे यांनी केले तर दीप्ती कोळथरकर यांनी आभार मानले. यावेळी स्मिता जावकर, संगीता दाभोळकर, तृप्ती उपाध्ये, रवींद्र नाटेकर उपस्थित होते.