
मडुरा-सातार्डा रस्त्याचे काम रोखले
78707
मडुरा-सातोसे रस्त्याचे सुरू असलेले डांबरीकरणाचे काम.
मडुरा-सातार्डा रस्त्याचे काम रोखले
निकृष्ट कामाचा आरोप; उपसरपंच गावडेंकडून ठेकेदार धारेवर
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. २८ ः मडुरा-सातोसेमार्गे सातार्डा रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप करत मडुरा उपसरपंच बाळू गावडे यांनी काल (ता. २७) रोखले. निकृष्ट कामाबद्दल संबंधित ठेकेदाराला त्यांनी जाब विचारत डांबराशिवाय टाकलेली खडी विस्कटून त्यांनी निकृष्ट काम निदर्शनास आणून दिले. याबाबत माहिती देण्यासाठी कार्यकारी अभियंता अनामिका चव्हाण यांना फोन केला असता संपर्क झाला नसल्याचे गावडे यांनी सांगितले.
मडुरा-सातार्डा मार्गावर नेहमीच वाहनांची मोठी वर्दळ असते; मात्र गेल्या काही वर्षांत खड्ड्यांमुळे दुरवस्था झाली आहे. त्यामुळे वाहन चालकांना जीव मुठीत धरून वाहने हाकावी लागत होती. खड्डे चुकविण्याच्या नादात लहान-मोठे अपघातही झाले होते. त्यामुळे या रस्त्याचे डांबरीकरण करावे, अशी मागणी अनेक वर्षांपासून ग्रामस्थ तसेच वाहनचालकांतून करण्यात येत होती. अखेर मडुरा-रेडकरवाडी थांबा ते रेखवाडी दरम्यानच्या मार्गासाठी निधी मंजूर झाला आहे. त्यानुसार या कामाला कालपासून ठेकेदाराकडून सुरुवात करण्यात आली. दरम्यान, संबंधित ठेकेदार डांबराचा वापर न करता खडी टाकून काम करण्याचा प्रयत्न करीत असल्याची माहिती मिळताच उपसरपंच गावडे यांनी घटनास्थळी जात हे काम रोखले. कामाच्या ठिकाणी बांधकाम विभागाचा सुपरवायझरही उपस्थित नव्हता. याचा फायदा घेत ठेकेदार निकृष्ट काम करून घेण्याच्या प्रयत्नात होता; असा आरोप गावडे यांनी केला. याबाबतची माहिती रेखवाडीतील युवकांनी दिल्याचे त्यांनी सांगितले.
------
‘निकृष्ट काम खपवून घेणार नाही’
दरम्यान, जोपर्यंत उत्कृष्ट कामाची हमी देत नाही, तोपर्यंत काम करू देणार नसल्याचा इशारा देत त्यांनी संबंधित ठेकेदाराला धारेवर धरले. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर रस्ताकामास मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत निकृष्ट काम खपवून घेणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. यावेळी देवी माऊली कला क्रीडा मंडळाचे अध्यक्ष केशव परब उपस्थित होते.