
छोट्या धरणांच्या उभारणीने चिपळूणची पूरमुक्ती
ratchlvardha२९p८
७८९७९
कोकणात पूरपरिस्थिती थांबवण्यासाठी छोटी धरणे आवश्यक आहेत.
ratchlvardha२९p९
७८९८०
महापूरात घर आणि दुकानांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले मात्र शासनाकडून म्हणावी तेवढी नुकसान भरपाई मिळाली नाही
इंट्रो
पुण्यात पानशेत, वरसगांव, खडकवासला धरणात अतिवृष्टीचे पाणी साठविता यावे यासाठी अगोदरच वेळोवेळी पाणी सोडून जागा करून ठेवलेली होती. अतिवृष्टीचा अंदाज आल्यावर तेथील इंजिनिअर्सनी ते अतिवृष्टीचे पाणी साठविण्यासाठी धरणात आणखी जागा करण्याकरिता वरसगांव, पानशेत, खडकवासला धरणे आणि पुणे शहरातील नदीचा परिसर यांचा उत्तमप्रकारे समन्वय ठेवून नदीपात्राच्या बाहेर पाणी जाणार नाही अशाप्रकारे ‘नियंत्रित जलनिःसारणाच्या तत्त्वाने’ पाणी सोडले आणि अतिवृष्टीचा मार सोसून पुणे शहर पूरमुक्त ठेवले. आता चिपळूणसाठी असे व्यवस्थापन होणे अपेक्षित आहे. चिपळूणच्या पूरक्षेत्रात असे नियंत्रित जलनिःसारण शक्य आहे असे आहे.
- विजय जोगळेकर, चिपळूण
----------------------
छोट्या धरणांच्या उभारणीने चिपळूणची पूरमुक्ती
२००५ ला अतिवृष्टीमुळे सह्याद्रीपट्ट्यात फार मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. कोल्हापूर ते नाशिकपर्यंतची सह्याद्रीतील धरणे ओसंडून वाहू लागली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात त्या धरणांतून पुर्वेकडे पाणी सोडावे लागले. कोयना धरण ७० टक्के भरल्यावर त्याच्या गेटमधून पाणी सोडता येते. म्हणजे अतिवृष्टीचा मार सोसण्यासाठी त्या धरणात फक्त ३० टीएमसीची क्षमता शिल्लक राहते. २० ते २५ जुलै २००५च्या अतिवृष्टीने ती क्षमता वापरली गेल्यानंतरसुद्धा धरणात पावसाचे पाणी येतच होते. परिणामी त्या धरणातून पाणी सोडण्याच्या सुरक्षित मर्यादेपेक्षा कितीतरी जास्त प्रमाणात पाणी सोडावे लागले आणि सांगलीत पाणी साठले. सांगलीच्यादृष्टीने, पाणलोट क्षेत्रात वरच्या बाजूला पाणी अडविणारी धरणे नसल्यासारखी ही स्थिती होती. त्यामुळे सांगली आणि परिसर पाण्यात बुडाला. आज चिपळूणची अशीच स्थिती आहे. म्हणून नियंत्रित जलनिःसारणाचा उपाय योजला पाहिजे.
सिंचन विभागाच्या हिशेबाने चिपळूणच्या पूर्वेकडे असलेले चारशे चौरस किलोमीटरचे पाणलोट क्षेत्र हे अत्यंत लहान पाणलोट क्षेत्र आहे. (दहा-वीस हजार चौरस किलोमीटरची पाणलोट क्षेत्र असतात आणि त्याचेही व्यवस्थापन ते करतात.) त्यामुळे या छोट्या पाणलोट क्षेत्राचे व्यवस्थापन करणे सोपे आहे. त्यातही ६-७ ठिकाणी प्रत्येकी एक ते दीड टीएमसी पाणी अडविणारी छोटी धरणे बांधायची आहेत. त्या धरणांना वीस टक्के डेडवॉटर असेल अशा पद्धतीने गेट बांधायचे. त्यात महापुरात साठणारे संभाव्य पाणी (२४ तासात १५ सेंटीमीटरपेक्षा जास्त वेगाने पाऊस सुरू झाल्यावरचे) पकडावयाचे आहे, ही फार सोपी बाब आहे. अतिवृष्टीचा कालखंड संपल्यावर वाशिष्ठीत हे पाणी टप्प्याटप्प्याने नदीच्या दोन्हीही किनाऱ्यांच्या आतच राहील अशाप्रकारे सोडणे हेही शक्य आहे. नदीची पन्नास टक्के जलनिःसारण क्षमता वापरली जाईल अशाप्रकारे पाणी सोडले तरी तीन दिवसात ही धरणे रिकामी होतील आणि पुढील अतिवृष्टीचे पाणी अडविण्यासाठी उपलब्ध होतील. अशाप्रकारे पूरनियंत्रणाचे आवश्यक ते उपचार केल्यानंतरच चिपळूणची पूरपातळी नदीच्या दोन किनाऱ्यामध्ये सीमित करता येईल.
आता आपत्तीमुक्त असणे हा जनतेचा हक्क आहे. त्यामुळे पाणलोट क्षेत्रात योग्य उपचार करून पुराचे पाणी नदीच्या पात्रात राहील, अशी उपाययोजना करावी लागेल. तीन दिवसात शंभर सेंटीमीटर पाऊस पाणलोट क्षेत्रात पडला तर जेवढे पाणी चिपळूण परिसरात साठेल तेवढे पाणी पूर्वेकडील सर्व उपनद्यांवर मिळून (योग्य जागा पाहून) साठविण्यासाठी धरणे बांधणे हा पूरनियंत्रणाचा भाग आहे. प्रस्तावित धरणांचे डिझाईन, स्थान निश्चित असेल, निधीची व्यवस्था असेल तर ही एक ते दीड टीएमसीची ६-७ छोटी धरणे एकाचवेळी सुरू करून दोन वर्षात पूर्ण करता येतील आणि चिपळूण कायमचे महापूरमुक्त करता येईल. यासाठी चिपळूणच्या पूर्वेकडील क्षेत्रात कंटूर मॅपिंग वगैरे करून धरणांची सुयोग्य जागा निश्चित करणे, त्यांचे डिझाईन व एस्टिमेट बनविणे, नदीतील गाळ /अडथळे काढणे याचा कार्यक्रम ठरविणे अशा उपाययोजना निश्चित करण्यासाठी तज्ञ समिती गठित करावी लागेल. पूरमुक्त चिपळूणसाठीचे काम चिपळूण खोऱ्याचा अभ्यास करूनच करावे लागणार आहे आणि तज्ञ समिती नेमण्याची शक्ती आणि जबाबदारी जिल्हाधिकारी यांना "आपत्ती निवारण कायदा २००५" खाली मिळालेली आहे.
(लेखक पाणी प्रश्नाचे अभ्यासक असून झाडाना पाणी देण्याचे संत्रज्ञान त्यानी विकसित केले आहे.)
-------------------
चौकट
बॉटलनेक दूर करणेसाठी
शहरात मापातून महाराष्ट्र हायस्कूलकडे जाणारी फरशी ते बाजारपुलापर्यंतचा वाशिष्ठीचा भाग गाळाने भरला आहे. तो गाळ काढून तेथे नदी खोल करणे आवश्यक आहे म्हणजे नदीची जलनित्सारण क्षमता काहीप्रमाणात वाढेल आणि पुर्वेकडून येणारे पाणी अडणार नाही. जुना बाजारपूल तोडून टाकणे आवश्यक आहे कारण त्यालाही पाणी अडते. सुचविलेला वाशिष्ठी आणि शिवनदीचा भाग खोदावयाचा आहे तो बॉटलनेक दूर करणेसाठी. त्यामुळे नदीची जलनित्सारण क्षमता आजची १३ सेंटीमीटर ऐवजी सतरा सेंटीमीटर पाऊस चोवीस तासातील इतके पाणी वाहून नेण्याची होईल. त्यामुळे महापूराचा धोका काही प्रमाणांत कमी होईल पण पुर्णपणे नाहीसा होणार नाही.
----------------------
चौकट
शंभर टक्के नुकसानभरपाईचा विमा उतरावा
पूरनियंत्रणाचा कार्यक्रम प्रत्यक्षात येवून त्याचे संरक्षण मिळणे सूरू होईपर्यंत राजापूर , संगमेश्वर , चिपळूण , खेड या शहर आणि पूरबाधीत परिसराचा शंभर टक्के नुकसानभरपाई चा विमा शासनाने उतरावा कारण घटनेप्रमाणे नागरिकांच्या जान आणि मालमत्तेच्या सुरक्षिततेची जबाबदारी सरकारची आहे, अशी मागणी आपण लावून धरली पाहिजे.
--------------
चौकट
पूर येण्याचे कारण बेटे, गाळ नव्हेत
पूर येण्याचे कारण बेटे आणि गाळ असेल तर दरवर्षी असा विध्वंसक महापूर यायला हवा कारण ही दोन कारणे दरवर्षी असतातच.पण असा पूर दरवर्षी येत नाही म्हणजे दुसरे काहीतरी कारण आहे.कोणते आहे ते कारण ? त्यावर उपाय करायला हवा. एखादा भाग नवीन असला तरी तज्ञ असे कारण आणि त्यावरचा उपाय शोधून काढतात. एक मीटर अंतराने कंटूर मॕपिंग करायचे आणि संभाव्य धरण क्षेत्रात वर किती सेंटीमीटर पाऊस पडला म्हणजे किती पाणी येईल हे निश्चित करायचे अशी पद्धत आहे.