
संक्षिप्त
पान २
चिपळूण मराठा समाजाची एकत्रच शिवजयंती
चिपळूण ः रत्नागिरी जिल्ह्याचा भव्यदिव्य असा मराठा क्रांती चिपळूणमध्ये घेण्यात आला. या मोर्चात लाखोंने मराठा समाज एकत्र आला आणि शिस्तबद्ध असा मराठा मोर्चा अखंड जिल्ह्याने अनुभवला. त्यानंतर चिपळूणमध्ये विविध ठिकाणी शिवजयंती साजरी होऊ लागली; परंतु काही जाणकार लोकांनी शिवजयंती एकत्र एकाच ठिकाणी साजरी करण्यासाठी सूचना केल्या. या सूचनेला प्रतिसाद देऊन चिपळूण तालुका मराठा समाजाची एकच भव्यदिव्य अशी दिमाखदार शिवजयंती साजरी करण्याच्या उद्देशाने हॉटेल अतिथी येथे बैठक घेऊन चर्चा करून पुढील बैठक २ फेब्रुवारीला घेण्याचे ठरले. बैठकीला मराठा समाजातील जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे. हॉटेल अतिथीचे मालक प्रथितयश उद्योजक प्रकाशराव देशमुख, सतीश मोरे, रमेश शिंदे, मकरंद जाधव, सुनील जाधव, संतोष सावंत देसाई, सचिन नलावडे, प्रदीप साळुंखे, विक्रांत सावंत उपस्थित होते.
आगवे ग्रामपंचायत सभागृहाचे उद्घाटन
चिपळूण ः तालुक्यातील आगवे गावात ग्रामपंचायत इमारतीवर असणाऱ्या जागेत सभागृह व्हावा, अशी येथील ग्रामस्थांची मागणी होती जेणेकरून ग्रामपंचायतीमध्ये होणाऱ्या सभा व इतर कार्यक्रमास पुरेशी जागा उपलब्ध व्हावी. १५ वा वित्त आयोग व ग्रामपंचायत फंड याचा वापर करून येथे नवीन ग्रामपंचायत सभागृह बांधले. त्याचे उद्घाटन आमदार शेखर निकम यांच्या उपस्थितीत झाले. आमदार निकम यांनी गावविकासाच्यादृष्टीने मार्गदर्शनपर भाषण करताना ग्रामस्थांनी मागणी केलेल्या विकासकामांबाबत पाणीयोजना, व्यायामशाळा, रस्ते ही कामे विविध योजनेतून पूर्ण करण्याबाबत ग्रामस्थांना आश्वासित केले. या वेळी भुवड, पूजा निकम, सीताराम कदम, जयंत घडशी (सरपंच), अनिकेत भंडारी, श्रीराम हुमणे, वसंत चव्हाण, भागवत, सोनाली चव्हाण, अंगणवाडी सेविका, आशासेविका व गावातील गावकरी मंडळी आदी उपस्थित होते.
७९१४६
सावंत महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिन
साखरपा ः येथील प्रा. आबासाहेब सावंत कला आणि वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आला. उपप्राचार्या प्रा. शिल्पा वैद्य यांनी प्रास्ताविकात मतदानाचे महत्व सांगितले तसेच मतदान हा केवळ हक्क नसून ते आद्य कर्तव्य असल्याचे त्या म्हणाल्या. प्राचार्य डॉ. विश्वास पाटील यांनी मतदान हे कोणत्याही आमिषाला बळी न पडता आणि निर्भिडपणे करण्याची गरज व्यक्त केली. जीमखाना विभागप्रमुख प्रा. सूरज लिंगायत यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मतदानाची शपथ दिली. सूत्रसंचालन एनएसएस विभागप्रमुख प्रसाद झेपले यांनी केले. या कार्यक्रमाला सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
७९१४७
भराडीन देवीचा शनिवारी उत्सव
पावस ः रत्नागिरी तालुक्यातील कारवांचीवाडी येथील जागृत स्वयंभू भराडीन देवीचा शनिवारी (ता.४) उत्सव साजरा होत आहे. ४ फेब्रुवारीला पहाटे ४ वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजेपर्यंत हा उत्सव होत आहे. तरी सर्व भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा. आज भक्तांच्या हाकेला धावणारी म्हणून प्रसिद्ध असलेले हे देवस्थान रत्नागिरी शहराच्या हाकेच्या अंतरावर आहे. सदरहू देवस्थानच्या आख्यायिकेबद्दल सांगावयाचे झाल्यास देवीचा महिमा अपरंपार आहे. सर्व ग्रामस्थ या देवीच्या चरणी नतमस्तक होतात तसेच हेवेदावे बाजूला सारून सगळे ग्रामस्थ देवीचा उत्सव पार पडण्यासाठी यथाशक्ती काम करताना दिसत आहेत. याकरिता उत्सव कमिटी सगळ्यांना सोबत घेऊन नियोजनबद्ध कार्य करत आहे.