
भिरवंडे रामेश्वर मंदिरात माघी एकादशी
79399
रामेश्वर मंदिर
भिरवंडे रामेश्वर मंदिरात माघी एकादशी
कणकवली ः सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेल्या ऐतिहासिक आणि राजकीय वारसा लाभलेल्या कणकवली तालुक्यातील भिरवंडे गावातील श्रीदेव रामेश्वर मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह सुरू असून उद्या (ता.१) माघी एकादशी महोत्सव साजरा होणार आहे. यावेळी विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. अखंड हरिनाम सप्ताहातील ढोल ताशाच्या गजरात पालखी मिरवणूक हे विशेष आकर्षण असणार आहे. भिरवंडे येथील श्रीदेव रामेश्वर मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह सुरू असून उद्या महा एकादशी महोत्सव साजरा होत आहे. अखंड हरिनाम सप्ताह प्रतीपंढरपूर असे स्वरूप प्राप्त झाले आहे. उद्याच्या महा एकादशी सोहळ्याच्या निमित्ताने सकाळी ११ वाजता भिरवंडे मुंबईवाशीय महिला मंडळ भजन सादर होणार आहे. त्यानंतर दुपारी १२ वाजता सद्गुरु वामनराव पै शाखा कणकवलीच्या वतीने उपासना यज्ञ, हरिपाठ आणि जीवनविद्या हा कार्यक्रम होणार आहे. दुपारी १ ते ३ वाजेपर्यंत महाप्रसाद वाटप करण्यात येणार आहे. तसेच रात्री कणकवलीतील बाल शिवाजी हायस्कूलच्या मुलांचा चित्ररथ सादर होणार आहे. त्यानंतर सुप्रसिद्ध बुवा संदीप लोके (लिंगडाळ, देवगड) यांचे सुश्राव्य संगीत वारकरी भजन सादर होणार आहे. त्यानंतर रात्री १२ वाजता श्रीदेव रामेश्वराची पालखी मिरवणूक ढोल ताशाच्या गजरात निघणार आहे. अखंड हरिनाम सप्ताहातील या एकादशी महोत्सवा निमित्त शेकडो मुंबईकर आणि भिरवंडेकर पाहुणेमंडळी गावात दाखल झाले आहेत. उद्या मोठ्या उत्साहात महा एकादशी साजरी केली जाणार आहे.
---
तळवणेत ५ पासून भंडारा उत्सव
तळवणे ः परशुराम भारती महाराज संजीवन समाधी मठ तळवणे येथे भंडारा उत्सवानिमित्त ५ ते १० फेब्रुवारीला विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ५ ला सकाळी गणपती - पूजन, दुपारी १२ वाजता ग्रामदेवतांचे मंदिरात आगमन, दुपारी १ वाजता नैवेद्य आरती, तीर्थप्रसाद, सायंकाळी ६ वाजता सनामदेव भजन मंडळ सांगेली यांचे भजन, ७ वाजता महाराजांचे चिपळी भजन, रात्री ९ वाजता पालखी सोहळा, १० वाजता पावणी लिलाव, ११ वाजता आरोलकर दशावतार नाट्य मंडळ यांचा नाट्यप्रयोग. ६ ला सकाळी ८ वाजता धार्मिक विधी, दुपारी १ वाजता महाप्रसाद, सायंकाळी ७ वाजता स्थानिकांची भजने, रात्री १० वाजता मराठी नाटक अग्गंबाई सूनबाई, ७ ला सकाळी ८ वाजता धार्मिक विधीस प्रारंभ, दुपारी १ वाजता महाप्रसाद, दुपारी ४ वाजता हळदीकुंकू व फुगडी, सायंकाळी ७ वाजता भाऊ नाईक, वेतोरे यांचे कीर्तन, रात्री १० वाजता खानोलकर दशावतार नाट्यमंडळ यांचे नाटक, ८ ला सकाळी धार्मिक विधी, दुपारी १ वाजता महाप्रसाद, सायंकाळी ६ वाजता पखवाज - ढोलका जुगलबंदी, ७ वाजता भावाशी राणे याचा तालसंगम कार्यक्रम रात्री १० वाजता वालावलकर दशावतार नाट्यमंडळ यांचे नाटक, ९ ला सकाळी ८ वाजता धार्मिक विधींस प्रारंभ व गणेश याग, दुपारी १ वाजता आरती, १.३० ते ४ वाजेपर्यंत महाप्रसाद, सायंकाळी ७ वाजता स्थानिकांची भजने, रात्री ९.३० वाजता विनोदी मालवणी नाटक ’अर्धी मस्ती अर्धा ढोंग, १० ला सकाळी ८ वाजता नित्यपूजा व अभिषेक, दुपारी १२ वाजता आरती, दुपारी ३ वाजता गणपतीच्या मूर्तीचे विसर्जन होणार आहे.
--------------------------
मालवणात २६ला बालनाट्य स्पर्धा
मालवण ः पर्यावरणाचे संवर्धन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. या जबाबदारीचे भान प्रत्येकालाच हवे. संस्कारक्षम वयात मुलांमध्ये पर्यावरण संवर्धनाचे विचार रुजविणे गरजेचे आहे. त्यासाठी इको फोक्स् व्हेंचर्स, मँग्रुव्हज फाऊंडेशन, स्वराध्या फाऊंडेशन यांच्यावतीने २६ फेब्रुवारीला सकाळी १० ते ९ या वेळेत येथील मामा वरेरकर नाट्यगृह येथे जिल्हास्तरीय बालनाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ’जैव विविधतेचा आसरा कांदळवन, तटरक्षक, धूपरक्षक सैनिक कांदळवन,पर्यावरणाचे फुप्फुस कांदळवन’ या विषयावर स्पर्धक संघांनी बालनाट्याचे सादरीकरण करायचे आहे, अशी माहिती स्वराध्या फाऊंडेशनचे गौरव ओरसकर यांनी हॉटेल उबंटू येथे पत्रकार परिषदेत दिली. यावेळी नितीन वाळके, अभय कदम, गौरेश काजरेकर, सुधीर कुर्ले, विनायक भिलवडकर आदी उपस्थित होते. प्रथम क्रमांकाला १२ हजार, चषक व प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांकाला ८ हजार चषक व प्रमाणपत्र, तृतीय क्रमांकाला ५ हजार, चषक व प्रमाणपत्र, उत्तेजनार्थ क्रमांकांना २ हजार, चषक व प्रमाणपत्र अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत, तसेच वैयक्तिक बक्षिसे देण्यात येणार आहेत. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ स्पर्धा पूर्ण झाल्यावर त्याच दिवशी रात्री ८ वाजता मामा वरेरकर नाट्यगृहात होईल. नाव नोंदणीसाठी गौरव ओरसकर, गौरेश काजरेकर यांच्याशी संपर्क साधावा.
-------------------------
अमूल्य घाडी याचे कॅरम स्पर्धेत यश
ओटवणे ः महाराष्ट्र कॅरम असोसिएशनमार्फत घेण्यात आलेल्या १४ वर्षाखालील शालेय राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेत सावंतवाडीतील अमूल्य अरुण घाडी या विद्यार्थ्याने चौथा क्रमांक पटकावला असून त्याची उत्तरप्रदेश वाराणसी येथे होणार्या राष्ट्रीय शालेय कॅरम स्पर्धेसाठी महाराष्ट्र कॅरम टीममध्ये निवड झाली आहे. अमूल्य सावंतवाडीतील मिलाग्रीस स्कूलमध्ये आठवीमध्ये शिकत आहे. त्याने नुकत्याच रत्नागिरी डेरवण येथे झालेल्या राज्यस्तरीय १४ वर्षाखालील शालेय कॅरम मुलांच्या गटातून प्रथम क्रमांक पटकाविला होता. तसेच या स्पर्धेत सावंतवाडीतील मयुरी सुभाष गावडे आणि प्रणिता नथुराम आहिरे या मुलींनीही या स्पर्धेत चमकदार कामगिरी करून १८ वर्षाखालील महाराष्ट्र कॅरम टीममध्ये आपले स्थान निश्चित केले. अमूल्य घाडी याची महाराष्ट्र कॅरम संघात निवड झाल्याबद्दल त्याचा मिलाग्रींस हायस्कूलमध्ये फादर सालढाणा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या तिन्ही खेळाडूंना त्यांचे कोच सचिन घाडी यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. या तिघांचेही अमेय प्रभूतेंडोलकर मित्रमंडळ आणि सबनीसवाडा मित्रमंडळाने अभिनंदन केले असून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
--
कणकवलीत रविवारी चित्रकला स्पर्धा
कणकवली : शहरातील सिंधुदुर्ग कला महाविद्यालयात रविवारी ५ फेब्रुवारीला तीन गटात शालेय चित्रकला स्पर्धा होणार आहे. मुद्रा एज्युकेशन ट्रस्ट (मुंबई )यांच्या माध्यमातून ही स्पर्धा होत आहे. स्पर्धेकरिता प्रवेश शुल्क नाही. स्पर्धेकरिता ड्राईंग पेपर संस्थेतर्फे देण्यात येईल तर रंग व इतर साहित्य विद्यार्थ्यांनी स्वत: आणावयाचे आहेत. कलाकृती रंगवण्यासाठी माध्यमाचे बंधन राहणार नाही. तर चित्र काढून रंगविण्यरासाठी विद्यार्थ्यांना दोन तासांचा अवधी दिला जाणार आहे. पहिली ते चौथी, पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी अशा तीन गटात ही स्पर्धा होईल. प्रथम पारितोषिक २५१ रूपये, द्वितीय पारितोषिक १५१ रूपये, तृतीय पारितोषिक १०१ रूपये अाणि दोन उत्तेजनार्थ पारितोषिक दिले जाणार आहे. तसेच सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक दिले जाणार आहे. सिंधुदुर्ग कला महाविद्यालयात सकाळी साडे दहा ते दुपारी साडे बारा या वेळेत परीक्षा होईल. तर दुपारी एक वाजता स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे.