
ग्रामीण डाक सेवक पदासाठी भरती प्रक्रिया
ग्रामीण डाक सेवक
पदासाठी भरती प्रक्रिया
ओरोस, ता. ३१ : भारतीय डाक विभागात ग्रामीण डाक सेवक पदासाठी भरती होणार आहे. यामध्ये देशाभरात ४० हजार ८८९ पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. यापैकी महाराष्ट्रात २,४१४ जागा भरल्या जाणार आहेत तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात शाखा डाकपाल (ब्रांच पोस्टमास्तर) ४१ आणि सहायक शाखा डाकपाल (असिस्टंट ब्रांच पोस्टमास्तर) पदाची ४७ अशी एकूण ८८ पदे भरली जाणार आहेत. यासाठी कोणतीही परीक्षा नसून दहावीच्या गुणांच्या आधारे निवड केली जाणार आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सिंधुदुर्ग विभागाचे अधीक्षक डाकघर मयुरेश कोले यांनी केले आहे.
या पदांसाठी कुठलीही परीक्षा घेतली जाणार नसून दहावीच्या मार्कांच्या टक्केवारीनुसार पदे भरली जाणार आहेत. सर्व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने आपले अर्ज सादर करायचे आहेत. ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख १६ फेब्रुवारी आहे. फॉर्म भरण्यासाठी आवश्यक शुल्क, वय मर्यादा व या बाबत इतर सविस्तर माहीतीसाठी आणि ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी https://indiapostgdsonline.gov.in/ या वेबसाईट ला भेट द्यावी. भारतीय डाक विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या या भरतीचा फायदा जिल्ह्यातील तरुण-तरुणींनी घ्यावा असे आवाहन सिंधुदुर्ग विभागाचे अधीक्षक डाकघर कोले यांनी केले आहे.