
लांज्यातील चोरी प्रकरणी जळगाव येथे अटक
rat३१२५.txt
(पान ३)
लांज्यातील चोरी प्रकरणी संशयित अटक
लांजा, ता. ३१ः डिसेंबर २०२२ मध्ये झालेल्या चोरीचा लांजा पोलिसांनी यशस्वीपणे छडा लावत अट्टल चोरट्याला जळगाव येथून अटक केली आहे. याबाबत लांजा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदरचा प्रकार हा डिसेंबर २०२२ मध्ये लांजा बस स्थानकात घडला होता. लांजा बस स्थानकात एसटीत चढणाऱ्या एका महिलेच्या हातातील अडीच तोळ्याची सोन्याची बांगडी चोरट्याने कट्टरच्या साह्याने तोडून लंपास केली होती. याप्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर या सराईत चोरट्याचा लांजा पोलिसांकडून माग काढला जात होता. संशयित कुणाल सुनील गायकवाड (वय ३९, राहणार अंबरनाथ, ठाणे) हा चोरटा जळगाव येथे असल्याची खबर लांजा पोलिसांना मिळाली. यानुसार लांजा पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजस्विनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन भुजबळराव, कॉन्स्टेबल प्रथमेश वारिक, मंगेश कोलापटे यांच्या पथकाने जळगाव येथे जाऊन या सराईत चोट्याला ताब्यात घेतले. या चोरट्याला घेऊन लांजा पोलिसांचे पथक रात्री लांजा पोलीस ठाण्यात दाखल केले असल्याचे पोलिसांनी सांगितले.