
पान एक मेन
79638 सावंतवाडी ः संशयीत तुषार पवार याला
79639
आंबोली ः घटनास्थळी दाखल झालेले पोलिस पथक.
79641
आंबोली ः मृतदेह दरीतून बाहेर काढताना पोलिस.
79642
आंबोली ः याच ठिकाणी मृतदेह फेकताना संशयिताचा मृत्यू झाला.
कऱ्हाडमध्ये खून करून मृतदेह आंबोलीत
दरी फेकताना संशयितही कोसळला; धबधब्याजवळील प्रकाराने खळबळ
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ३१ ः आर्थिक वादातून एकाचा खून करून मृतदेह आंबोली घाटात टाकण्याच्या प्रयत्नात दरीत कोसळून एका संशयिताचा मृत्यू झाला. हा प्रकार सोमवारी रात्री घडला. आज तो उघड झाला असून यातील दुसऱ्या संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले. या प्रकाराने आंबोलीचा गुन्हे लपवण्यासाठी होणारा वापर पुन्हा एकदा उघड झाला आहे.
पंढरपूर येथील मुकादम सुशांत खिल्लारे याचे अपहरण करून कऱ्हाड येथे त्याचा खून करण्यात आला. यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी प्लास्टीक पिशवीत भरलेला त्याचा मृतदेह आंबोली घाटातील दरीत टाकत असताना खुनातील संशयित भाऊसो अरुण माने (वय ३०, रा. कऱ्हाड) तोल जावून घाटात कोसळला. यातच त्याचा मृत्यू झाला. तशी कबुली या प्रकरणी ताब्यात घेतलेला दुसरा संशयित तुषार पवार याने सावंतवाडी पोलिसांना दिली. त्यानुसार या प्रकरणी त्याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे, अशी माहिती जिल्हा पोलिस उप अधीक्षक नितीन बगाटे यांनी दिली.
श्री. बगाटे यांनी दिलेल्या माहितीनुसार यातील संशयित तुषार पवार व माने मित्र आहेत. कऱ्हाड येथे शेतीशी संबंधित व्यवसाय आहे. त्यांनी वीटभट्टीचा व्यवसाय सुरू केला आहे. त्या ठिकाणी कामगार हवे असल्यामुळे पंढरपूर येथे मुकादम खिल्लारे यांच्याकडून माने याने कामगार मागविले होते. त्यासाठी त्याला तीन लाख रूपये दिले होते; परंतु पैसे घेतल्यानंतर खिल्लारे याने कामगार दिले नाहीत. पैसे परत करण्यास नकार दिला. पैसे वसुलीसाठी तुषार पवार व माने यांनी कट रचला. त्यांनी १९ जानेवारीला खिल्लारे यांचे पंढरपूर येथून अपहरण केले. त्याला गोड बोलून निर्जनस्थळी बोलवत अपहरण करून कऱ्हाडला आणले.
त्याला माने याने कऱ्हाड येथे आपल्याच घरात दहा दिवस नजर कैदेत ठेवले. त्यांनी रविवारी (ता.२९) खिल्लारेला दारू पिण्यास घरासमोर असलेल्या शेतात नेले. यावेळी तिघात वाद झाले. दोघांनीही त्याला जोरदार मारहाण केली. मारहाणीत खिल्लारे याचा मृत्यू झाला असावा, असा संशय आहे. यामुळे पुरावा नष्ट करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर होते. दरम्यान अचानक तो मृत्यूमुखी पडल्याने दोघेजण घाबरले. यावेळी मृतदेहाचे करायचे काय, असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला. यावेळी पवार यांनी आपण माझ्या मोटारीमधून मृतदेह आंबोली घाटात नेऊन टाकू, असे सांगितले. त्यानुसार त्यांनी कट रचला. ते काल (ता.३०) दोघे आंबोलीच्या दिशेने आले. त्यानंतर काल सायंकाळी सातच्या सुमारास प्लॅस्टिक पिशवीत असलेला मृतदेह दरीत टाकत असताना मानेचा पाय निसटला व तो मृतदेहासह खोल दरीत कोसळला. अचानक हा प्रकार झाल्यानंतर पवार घाबरला; मात्र काय करावे हा प्रश्न त्याच्या समोर निर्माण झाला. रात्र असताना सुध्दा त्याने त्याच ठिकाणी घाटात ठिकाणी राहणे पसंत केले.
आज दुपारी साडेबाराच्या सुमारास त्याने कऱ्हाड येथील आपल्या मित्राला घटना सांगत तुम्ही या, मोबाईलवरून सांगितले. मित्राने हा प्रकार गंभीर असल्याने खिल्लारे व माने यांच्या घरातील लोकांना कल्पना दिली. त्यानंतर माने कुटुंबीयांनी पोलिसांना माहिती दिली. त्यामुळे हा सर्व प्रकार उघड झाला.
कऱ्हाड पोलिसांनी सावंतवाडी पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार घटनास्थळी. उपविभागीय पोलिस अधिकारी रोहिणी सोळंके, निरीक्षक फुलचंद मेंगडे, उपनिरीक्षक सुरज पाटील, उपनिरीक्षक अमित गोते, हवालदार दर्शन सावंत, दत्ता देसाई, मनीष शिंदे घटनास्थळी दाखल झाले.
शोधाशोध सुरू झाली. मुख्य धबधब्याजवळील स्टॉलवर पवार बसलेला होता. त्याच्याकडे विचारणा केली असता हा प्रकार रात्री घडला आहे. त्यानंतर आपण येथे बसून होतो. रात्री याच ठिकाणी झोपलो, असे त्याने सांगितले. त्यानुसार त्याला सावंतवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले.
याबाबतची माहिती मिळाल्यानंतर सावंतवाडीस निरीक्षक फुलचंद मेंगडे, उपनिरीक्षक अमित गोते, गणेश कराडकर, सुरज पाटील यांच्यासह आंबोलीचे हवालदार दत्ता देसाई, दीपक शिंदे आदींनी त्या ठिकाणी धाव घेतली. आंबोली येथील युवकांच्या मदतीने खोलदरीत उतरून दोन्ही मृतदेह बाहेर काढण्यात आले. त्यानंतर ते उत्तरीय तपासणीसाठी सावंतवाडी कुटीर रुग्णालयात आणण्यात आले.
पोलिस पवारची कसून चौकशी करीत आहेत. माने आणि खिल्लारे यांचे नातेवाईक सावंतवाडीत येत आहेत. त्यांची फिर्याद घेतल्यानंतरच तपास कामात गती येईल, असे पोलिस निरीक्षक मेंगडे यांनी सांगितले.
माने याच्याही घातपाताचा संशय
उपअधीक्षक बगाटे म्हणाले, ‘‘ही प्राथमिक माहिती आहे. तपास सुरू आहे. अद्याप नेमके कारण स्पष्ट नाही. संशयित पवारने दिलेल्या माहितीनुसार तपास सुरू आहे. माने याचाही घातपात झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या दिशेनेही तपास सुरू आहे.’’