
पंजाब नॅशनल बँकेच्या शाखेचे कुडाळात उद्घाटन
79709
कुडाळ ः पंजाब नॅशनल बँक शाखेचे उद्घाटन करताना बिभूप्रसाद महापात्रा. बाजूला देवेंद्र सिंह, राकेश राठोड, मनोज गजभिये, प्रदीप माने, सुनील मेस्त्री, निमेश महाडेश्वर व इतर.
पंजाब नॅशनल बँकेच्या
शाखेचे कुडाळात उद्घाटन
कुडाळ, ता. १ ः देशात स्वातंत्र्य लढा चळवळीदरम्यान पंजाब नॅशनल बँक ही पहिली स्वदेशी बँक सुरू झाली. गेली १२८ वर्षे परिवाराप्रमाणे ग्राहकांना चांगली सेवा देत असणाऱ्या या बँकेची जिल्ह्यातील पहिली शाखा कुडाळ येथे सुरू होत आहे. येथेही ग्राहकांना परिवाराप्रमाणे सेवा देण्यात येईल, असे प्रतिपादन पंजाब नॅशनल बँकेचे अचल मुख्य महाप्रबंधक बिभूप्रसाद महापात्रा (मुंबई) यांनी येथे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिल्या बँक कार्यालयाच्या प्रारंभी प्रसंगी केले.
यावेळी बँकेचे मंडल प्रमुख देवेंद्र सिंह, सहाय्यक महाप्रबंधक राकेश राठोड, मुख्य प्रबंधक मनोज गजभिये, मुख्य प्रबंधक सुनील मेस्त्री, उद्योजक प्रदीप माने, शाखा प्रबंधक निमेश महाडेश्वर तसेच कोल्हापूर सर्कल कर्मचारी आदी उपस्थित होते. यावेळी महापात्रा यांनी, स्वातंत्र्य लढ्याची चळवळ सुरू असताना लाहोर येथे १८८५ मध्ये स्वातंत्र्य सेनानी लाला लजपतराय यांनी पुढाकार घेऊन आपल्या इतर तीन सहकाऱ्यांना घेऊन या पहिल्या स्वदेशी बँकेची सुरुवात केली. तेव्हापासून गेली १२८ वर्षे ही बँक ग्राहकांना परिवाराप्रमाणे सेवा देत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज पहिली शाखा सुरू झाली असून येथेही सर्वांना चांगल्या प्रकारे सेवा देऊ, असा विश्वास व्यक्त केला.