आंगणेवाडी पुरवणी लेख-1

आंगणेवाडी पुरवणी लेख-1

आंगणेवाडी पुरवणी लेख १

swt२१०.jpg मध्ये फोटो आहे.
ओळ - L८०१४६

आंगणेवाडी येथील रोषणाई केलेले मंदिर.

दक्षिण कोकणचे प्रति पंढरपूर
- प्रशांत हिंदळेकर

लीड
दक्षिण कोकणचे प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि भाविकांच्या नवसाला पावणाऱ्या आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी देवीचा जत्रोत्सव शनिवारी होत आहे. यानिमित्ताने...
..........
देवीचा कौल घेऊन आंगणेवाडी यात्रेची तारीख निश्चित केली जाते. दहा लाखांहून अधिक भाविक या जत्रोत्सवाला भेट देतात. ''आनंदाचे डोही आनंद तरंग'' असा अनुभव या जत्रोत्सवाच्या माध्यमातून भाविकांना मिळतो. मुंबईकर चाकरमानी मोठ्या संख्येने जत्रेत दाखल होत असतात. या जत्रोत्सवाची तारीख निश्चित झाल्यानंतर रेल्वे त्याचप्रमाणे खासगी वाहनांच्या बुकिंगसाठी चढाओढ लागलेली असते. प्रथेनुसार देवीला कौल लावून जत्रेची तारीख निश्चित झाल्यानंतर हा उत्सव होत आहे. प्रशासनाने सुद्धा या यात्रेचे नियोजन करण्यासाठी कंबर कसली आहे. मुंबईतील चाकरमानीच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो भाविक आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या जत्रेला दरवर्षी आवर्जून उपस्थित राहतात.
भक्तांचा लोंढाच लोंढा आंगणेवाडीकडे सरकत असतो. ज्यांना जसे सोपे वाटेल तसे लोक तिकडे जातात. काही मंडळी मुंबईहून रेल्वेने किंवा बसने कणकवलीला जातात. कणकवलीहुन आंगणेवाडीपर्यंत एसटीने खास व्यवस्था केलेली असते. मालवण आणि कणकवली या दोन एसटी डेपोच्या किमान १०० ते १५० गाड्या केवळ या जत्रेसाठी तैनात केल्या जातात. याखेरीज खासगी वाहनांची संख्याही खूप असते. साधारण १०० वर्षांपूर्वी या एसटी बसेस व खासगी वाहनांच्या ऐवजी शेकडो बैलगाड्या धावताना दिसायच्या, असे जुने जाणकार लोक सांगतात.
मालवण, कणकवली या मार्गावरून दोन फाटे आंगणेवाडीकडे जातात. मालवणहून निघाल्यानंतर वाडीचा थांबा सोडल्यावर माळरानावर डाव्या हाताला रस्ता दिसतो. ''आंगणेवाडी'' असा छोटासा फलकही तेथे आहे. हा रस्ता थेट मंदिराजवळ जातो. दुसरा रस्ता बागायत या बसस्थानकाला जातो. जत्रेव्यतिरिक्त इतरवेळी राहण्याची किंवा हॉटेलची व्यवस्था या परिसरात पुरेशी नाही. या जत्रेच्या निमित्ताने एसटी महामंडळाला फार मोठे उत्पन्न उपलब्ध होते. या जत्रेला एवढ्या मोठ्या संख्येने भाविक जमतात की, डोळ्यांचे पारणे फिटून जाते.
आंगणेवाडीची भराडी देवी ही देवी सातेरी व देवी माउलीचे तिसरे रूप समजले जाते. तसेच ती तुळजापूरच्या भवानी मातेचा अंश असल्याचे मानले जाते.
अलोट गर्दीची व कोट्यवधी रुपयांच्या उलाढालची आंगणेवाडीची जत्रा जगप्रसिद्ध आहे. या गावातील माहेरवाशीण लग्न होऊन जगाच्या पाठीवर कुठेही गेली तरी ती या जत्रेला आवर्जून उपस्थित राहते. या देवीची जत्रा फार पुरातन काळापासून सुरू असल्याचे म्हटले जाते. अशी ही भराडी देवीची जत्रा नेमकी आहे तरी काय? ही जत्रा साधारण कधीपासून सुरू झाली आणि येथे नेमके होते तरी काय? अशा अनेक मुद्द्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता असे आढळून आले की, सर्वसाधारण ३०० वर्षांपासून भाविकांनी या देवीची पूजाअर्चा करण्यास सुरुवात केली. आता अनेकांना या देवीच्या जागृतीची प्रचिती आली आहे. नवसाला पावणारी भराडी देवी म्हणून या देवीचा नावलौकिक सर्वदूर झालेला आहे. देवीच्या जागृततेच्या महिम्यामुळे यात्रेसाठी दरवर्षी लाखो भाविक आंगणेवाडीला जमू लागले. तालुक्यापासून सुमारे १५ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या मसुरे या गावातील बारा वाड्यांपैकी आंगणेवाडी ही एक; पण भराडी देवीच्या प्रसिद्धीमुळे आंगणेवाडी हे गावच असल्याचा समज सर्वसामान्य लोकांमध्ये निर्माण झाला आहे. देवीच्या महात्म्यामुळे आंगणेवाडीला हे महत्त्व प्राप्त झाले असून या ठिकाणी बहुसंख्य लोकांची वस्ती आंगणे आडनावाच्या लोकांची आहे. हे श्रद्धास्थान केवळ आंगण्यांचेच नव्हे, तर अन्य असंख्य भाविकांचे झाले आहे. देवीच्या मंदिर खर्चासाठी पेशवे चिमाजी अप्पा यांनी इनाम म्हणून २ हजार एकर भरड व शेतजमीन दिली, असे सांगितले जाते.
आंगणेवाडीतील भरडावर ही स्वयंभू पाषाणरुपी देवी प्रकटली, म्हणून तिला ''भराडी देवी'' म्हणतात. तिची पूजाअर्चा सुरू झाली आणि ही देवी भाविकांना पावू लागली. या देवीची ख्याती आता तर अगदी दूरवर पसरलेली आहे. ही जत्रा नेमकी कधीपासून सुरू झाली, यासंबंधी कोणीही माहिती देत नाही. देवीच्या प्रकटीकरणाला सुमारे तीनशे वर्षांचा इतिहास असल्याचे सांगितले जाते. तथापि निश्चित स्वरुपाची माहिती कोठेही मिळत नाही.
आंगणेवाडीतील बऱ्याच व्यक्ती नोकरी अथवा व्यवसायाच्या निमित्ताने कोकणाबाहेर विशेषतः मुंबई येथे असतात. आंगणेवाडीचे क्षेत्रफळ साधारण ५३८.०२ हेक्टर म्हणजे सुमारे ८०० एकर एवढे आहे. आंगणेवाडीच्या एकूण क्षेत्रफळापैकी साधारण १८.४२ हेक्टर जमीन जंगल संपत्तीखाली असून १६१.९१ हेक्टर जमिनीवर केली जाणारी शेती पावसावर अवलंबून असते. १९९१ च्या जनगणनेनुसार या ठिकाणी ७७ घरे आणि त्यामध्ये १३५ पुरुष आणि १४८ महिला होत्या. साधारण २०-२५ वर्षांपूर्वी यात्रेसाठी सुमारे २० हजार भाविक जमायचे.
त्यापूर्वी २०-३० वर्षांत सुमारे १० हजार लोकांची उपस्थिती असायची. ही संख्या दरवर्षी वाढत जाऊन आता सुमारे १५ लाख लोक जमतात. या मंदिराचा जीर्णोद्धार काही वर्षांपूर्वी करण्यात आला आहे. आंगणेवाडी जत्रोत्सवात ग्रामस्थांमधील नाट्य कलावंत नाटके सादर करतात. या आंगणेवाडी नाट्यमंडळाची स्थापना १९६४ मध्ये झाल्याचे कळते. आंगणेवाडीतील एक सामाजिक कार्यकर्ते (कै.) दत्ता आंगणे हे या नाट्यमंडळाचे संस्थापक सदस्य होते. आंगणेवाडी वाचनालयाची स्थापना १५ जानेवारी १९५७ ला झाली. या वाचनालयाचे संस्थापक अध्यक्ष गोपालकृष्ण आंगणे हे होते. या वाचनालयात मराठी, हिंदी, इंग्रजी अशी विविध प्रकारची सुमारे ४-६ हजारांच्या दरम्यान पुस्तके असून विविध दैनिके आणि साप्ताहिके येथे उपलब्ध आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेकडून अनुदान, ग्रामपंचायतीकडून आर्थिक साहाय्य आणि ग्रामस्थांकडून देणग्यांद्वारे वाचनायालयाचा खर्च चालविला जातो.
आंगणेवाडी ग्रामस्थांचे भजनी मंडळ असून दर मंगळवारी सायंकाळी देवीच्या मंदिरात भजन करण्यात येते. सर्व गाव मंदिरातील भजनात सहभागी असते. गणपतीच्या दिवसांत तेवढे आंगणेवाडीकरांच्या घरात भजन होते. एरवी हे भजन देवीच्या मंदिरातच होते.
अशा जत्रा महाराष्ट्रात आणि देशातही ठिकठिकाणी भरतात. त्यांच्या तारखाही निश्चित असतात, असे आपल्याला माहित आहे; परंतु भराडी देवीच्या जत्रेची तारीख निश्चित नसते. महाराष्ट्राच्याच नव्हे, तर आजूबाजूच्या राज्यांच्या कानाकोपऱ्यातून लहानापासून थोरांपर्यंत अनेक भाविक या जत्रेला येतात. फार वर्षांपूर्वी या जत्रेचे स्वरूप वेगेळे होते. आता ते बदलले आहे. सध्याचा जमाना श्रद्धा-अंधश्रद्धा यांच्यावरील वादाचा असला तरी आंगणेवाडीच्या जत्रेला येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. भराडी देवीमुळेच या आंगणेवाडीच्या नावाचा प्रचार, प्रसार सर्वदूर झाला. ही जत्रा वर्षातून एकदाच येते. त्यामुळे मुंबईकर चाकरमानी आवर्जून जत्रेला येतात.
आंगणेवाडीची भराडी देवी हे कोकणातील जागृत देवस्थानांपैकी एक मानले जाते. यंदा ४ फेब्रुवारीला या देवीची जत्रा आंगणेवाडी येथे भरत आहे. आंगणेवाडीकरांच्या दृष्टीने या जत्रेला आणि दिवसाला फार मोठे महत्त्वाचे स्थान आहे. या देवीचा जत्रेचा दिवस देवीच्या कौलावर अवलंबून असतो. साधारणपणे पौष किंवा माघातला एखादा दिवस देवीच्या या जत्रेच्या वाट्याला येतो. मसुरे, देऊळवाडा येथील श्री देवी माउली, बिळवसची श्री देवी सातेरी आणि आंगणेवाडीची श्रीदेवी भराडी या तिघी बहिणी असून आंगणेवाडीच्या पठारावर तीन झाडे एकत्र उगवली आहेत. त्या ठिकाणी या तिन्ही देवता एकमेकींना भेटतात. ही जागा ''सातेरीची पेडी'' म्हणून प्रसिद्ध आहे.
................

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com