आंगणेवाडी लेख-3

आंगणेवाडी लेख-3

आंगणेवाडी लेख-3

टीपः swt311.jpg मध्ये फोटो आहे.
ओळ - L80147

आंगणेवाडी ः येथील देखणे मंदिर.

ही तर आनंद पर्वणी
- रवींद्र वराडकर, मालवण

लीड
कोकणची दक्षिण काशी समजली जाणारी मालवण तालुक्यातील आंगणेवाडी म्हणजे मसुरे गावातील एक छोटीशी वाडी; पण या छोट्याशा वाडीने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले आहे. कारण या ठिकाणी फेब्रुवारीत देवी भराडीची यात्रा भरते. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे, रायगड व कर्नाटक जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधील भाविक आपल्या मुलाबाळांसह आणि इष्ट मित्रांसह या यात्रोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होतात. भाविकांसाठी ही आनंद पर्वणी असते.
.............
कोकणी माणूस उत्सव प्रिय समजला जातो. भाविकतेचा परमोत्कर्ष या कोकणीभूमीत सण, समारंभ प्रसंगी दिसून येतो. जत्रा आणि यात्रांचे उदंड पीक या भूमीत प्रचंड प्रमाणात येते. महाराष्ट्राची मायमाउली श्री देवी भवानी महाराष्ट्राची रक्षणकरती देवी म्हणून मराठी मुलखात सुप्रसिद्ध आहे. या देवीच्या दर्शनासाठी लाखो भाविक स्त्री-पुरुष श्री क्षेत्र तुळजापूरला श्रद्धायुक्त अंत:करणाने यात्रोत्सवाच्या वेळी प्रचंड गर्दी करतात. देवीला साकडे घालतात, नवस करतात आणि नवस फेडतात. देवी ही शक्तिमाता विश्वाचा आधार आणि उद्धारकरती म्हणून मानले जाते. तुळजापूर काय किंवा कोल्हापूर जवळची ज्योतिबाची यात्रा काय, सर्व ठिकाणी भाविक लोक भक्तिभावाने गोळा होतात. तेच चित्र मालवण तालुक्यातील आंगणेवाडी या गावात दिसून येते.
आंगणेवाडीची यात्रा ही खऱ्या अर्थाने भराडी देवीची यात्रा आहे. भाविक मनाचे, उदार अंतःकरणाचे आंगणे बंधू हे या देवीचे मानकरी असून लोकहित लक्षात घेऊन उत्सवाला योग्य वळण लावण्यासाठी नगरपालिका, लोकनेते आणि शासकीय संरक्षणाच्या पाठबळावर लोककल्याणकारक योजना आखून त्याची अंमलबजावणी केली जाते. यात्रा काळात राज्य परिवहन महामंडळाची एसटी वाहतूक व्यवस्था, प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि संरक्षणासाठी उभारलेली स्त्री-पुरुष पोलिसांची चौकी, ध्वनीवर्धकावरून वेळोवेळी भाविकांना दिल्या जाणाऱ्या सूचना, राजकीय पुढार्‍यांचे आणि मंत्री महोदयांचे आगत-स्वागत, सर्वकाही मनोवेधक असेच असते. गर्दीच्या हलकल्लोळात लक्षवेधक वाटते. उत्सवाच्या आनंद लहरीने जीवनाची फुलबाग फुलत असते. मुंबई, पुण्यात स्थायिक झालेले कित्येक मालवणी माणसे एसटी, अन्य खासगी बसेस, खासगी वाहने यांच्या माध्यमातून आंगणेवाडीतील भराडी देवीच्या यात्रेला येतात. देवी भराडीचे दर्शन घेऊन यात्रोत्सवाचा आनंद लुटतात. मालवणच्या जवळच मसुरे गावात मालवणपासून 15 किलोमीटर अंतरावर आंगणेवाडी ही छोटीशी वाडी वसली आहे. महाराष्ट्रात ही आंगणेवाडी तीर्थक्षेत्र म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्र शासनाने हे तीर्थक्षेत्र विकसित करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. गेल्या काही वर्षांत भाविकांबरोबरच पर्यटकही आंगणेवाडीत देवीच्या दर्शनासाठी येतात. त्यामुळे मंदिर परिसर बारमाही गजबजलेला दिसून येते.
मालवणच्या परिसरात भराडी देवी म्हणजे कोकणची कुलस्वामिनी, मालवणची महादेवता, आंगणे घराण्याचे आराध्य दैवत मानले जाते. कोकणची ही मायमाउली भराडी माता सर्वांवर कृपेचा वरदहस्त ठेवते. सुख, शांती, समृद्धी मिळण्यासाठी तसेच वैयक्तिक अडीअडचणी दूर करण्यासाठी लाखो भाविक देवीपुढे नतमस्तक होतात. आंगणेवाडी यात्रा दरवर्षी साधारणत: फेब्रुवारीत भरते. दोन दिवस यात्रोत्सवाचा, देवीची ओटी भरण्याचा कार्यक्रम असतो. यात्रेची तारीख निश्चित तिथी नसल्यामुळे कोणत्याही पंचांगात किंवा दिनदर्शिकेत त्याचा उल्लेख नसतो. यात्रा ठरविताना देवी सांगेल तो दिवस पारंपरिक जनरुढीप्रमाणे ठरविला जातो. यासाठीचा डाळप विधी, डुकराची शिकार आणि यानंतर कौल लावून यात्रेची तारीख निश्चित केली जाते. साधारणपणे दिवाळी झाल्यावर शेतीची कामे आटोपल्यावर देवाचा कौल लावून डुकराच्या शिकारीला जाण्याचा दिवस निश्चित केला जातो. देवस्थानचे मानकरी आंगणे बंधू व इतर सर्वजण पारंपरिक प्रथेनुसार डुकराच्या शिकारीला जातात. जाताना सोबत अन्नसाठा, अंथरूण-पांघरूण बरोबर घेऊन जातात. शिकार मिळाल्याशिवाय परत घरी यायचे नाही, असा दृढ निश्चय करून मोठ्या जिद्दीने व आत्मविश्वासाने रात्रंदिवस अविश्रांत परिश्रम करतात आणि अखेर डुकराची शिकार करतातच. मग त्या डुकराची वाजत गाजत मिरवणूक काढून तो भक्ष्य मंदिरासमोर आणून भराडी देवीला गाऱ्हाणे घालून मानवला जातो. नंतर मंदिराच्या डाव्या बाजूला पातोळीच्या जागी डुकराला कापून त्याची कोष्टी, म्हणजे मटणाचे वाटप करून उपस्थित लोकांना प्रसाद म्हणून दिला जातो. शिकार करणारा जर आंगणे कुटुंबीयांपैकी असेल, तर त्याला डुकराच्या पाठीचा कणा दिला जातो. मग तो त्याची पूजा करून गावातील पाच लोकांना जेवणकरी म्हणून बोलावून त्यांना प्रसाद दिला जातो. आंगणे बंधूंशिवाय इतरांनी शिकार केल्यास त्याला पानाचा विडा व काही रक्कम दक्षिणा म्हणून दिली जाते. यानंतर देवीचा कौल लावून यात्रेची तारीख निश्चित करून जाहीर केली जाते. एकदा जाहीर केलेल्या तारखेत कधीही बदल केला जात नाही.
यात्रेच्या ठरविलेल्या तारखेशिवाय मंदिरात उत्सव काळात केलेला भाविकांचा नवस कधीही फेडला जात नाही. यात्रेच्या दिवशी स्वयंभू पाषाणाला मुखवटा घालून काठ्यांच्या साहाय्याने देवीला साडीचोळी नेसवतात. सुवर्णालंकार घालून देवीला सजवतात. सूर्य उगवल्यावर न्हावी देवीला आरसा दाखवून सूर्यकिरणांचा प्रकाशझोत परावर्तित करून देवीच्या मुखकमलावर प्रकाश टाकतो. यालाच देवीला ''आरसा दाखवणे'' असे म्हणतात. हा आरसा किरण विधी झाल्यावर देवीची तयारी पूर्ण झाली, असे समजून ओटी भरण्याचा कार्यक्रम सुरू होतो. देवीची ओटी खण, नारळ, सोन्याचे नाणे यांनी भरली जाते. पहिली ओटी वेरलीच्या घराण्याने भरली पाहिजे, अशी प्रथा आहे. त्यानंतर सर्वांसाठी ओटी भरण्याचा कार्यक्रम रात्री उशिरापर्यंत सुरू असतो. रात्री नऊ वाजण्याच्या दरम्यान आंगणेवाडीतील प्रत्येक घरातील एक स्त्री स्नान करून शुचिर्भूत होऊन मौनधारण करून कुणालाही स्पर्श न करता सोवळे पाळून भोजन तयार करते. हाच प्रसाद देवीला नैवेद्य म्हणून दाखवतात. या नैवेद्य दाखविण्याच्या पद्धतीला ''ताटे लावणे'' असे म्हणतात. ही प्रसादाची ताटे घेऊन आंगणे कुटुंबीयांमधील स्त्रीया नव्या कोऱ्या साड्या नेसून देवळाच्या दिशेने चालू लागतात. यावेळी आंगणे पुरुष मंडळी त्या स्त्रियांच्या पुढे जाऊन पेटत्या मशाली घेऊन त्यांना देवळापर्यंत सोबत करतात. पूर्वी हा प्रसाद उडविला जात असे; मात्र गेली काही वर्षे प्रसाद उडविण्याची ही प्रथा बंद करण्यात आली आहे. ताटे लावण्याचा कार्यक्रम पार पडल्यानंतर सर्व माहेरवाशिणी आपल्या घरी जातात. प्रत्येकाच्या घरात भाविकांना हा प्रसाद दिला जातो. ताटे लावण्याचा कार्यक्रम पार पडल्यानंतर रात्री पुन्हा अकरा वाजल्यानंतर देवीची ओटी भरण्याचा कार्यक्रम पुन्हा सुरू होतो. दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत हा कार्यक्रम अखंड सुरू असतो. यावर्षी प्रथमच सायंकाळी पाच वाजेपर्यंत ओटी भरण्याचा कार्यक्रम सुरू ठेवण्याचा निर्णय आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळाने घेतला आहे.
आंगणेवाडीची भराडी देवी म्हणजे स्वयंभू पाषाण आहे. या पाषाणाची जन्मकथा श्रवणीय असून दैवी चमत्कारच म्हटला पाहिजे. आंगणे नामक एका माणसाची गाय रानातील एका विशिष्ट पाषाणावर पान्हा सोडत असे. रात्री देवीने स्वप्नात येऊन दृष्टांत दिला व आपण तेथे प्रकट झाल्याचे ग्रामस्थांना सांगितले. तेव्हापासून सर्वजण त्या मोकळ्या माळावरील पाषाणाची भक्तिभावाने पूजा करू लागले. भरड भागातील एका राईत हे पाषाण प्रकट झाले, म्हणून हिला ''भराडी देवी'' असे नाव पडले. भराडी देवी ही नवसाला पावणारी देवी म्हणून प्रसिद्ध आहे. देवीचे स्थान किमान तीनशेहून अधिक वर्षे जुने आहे; मात्र देवीच्या पाषाणाचा फोटो काढण्याची देवीची परवानगी नसल्यामुळे देवीचा फोटो कोणत्याही अंकाच्या मुखपृष्ठावर किंवा अन्यत्र लावण्यास देवीची परवानगी नाही. त्यामुळे भराडी मातेच्या मंदिरात फोटो काढला जात नाही.
मालवण परिसरातील बहुसंख्य शाळांना यात्रेनिमित्त स्थानिक सुटी जाहीर केली जाते. त्यामुळे अनेक विद्यार्थी, शिक्षक जत्रेत सहभागी होतात. यात्रा म्हणजे आनंद पर्वणी असते. यात्रेच्या चार दिवसांपूर्वीपासून विविध खाद्यपदार्थांची दुकाने, उपाहारगृहे, भांड्यांची, कपड्यांची, फळांची व फुलांची दुकाने सजवली जातात. प्रत्येक तालुक्यातील नामवंत मिठाईवाले, सुवर्णकार किंवा उद्योगपती, राजकीय व्यक्ती, भोजनगृहाचे मालक आपली जाहिरात व्हावी म्हणून आकर्षक कापडी बॅनर्स लावून जाहिरात करतात. त्यामुळे मालाची विक्रीही वाढते. श्री भराडी आईचा सर्वांवर कृपा कटाक्ष असतो. फेरीवाल्याचा म्हणजे ओटी साहित्य, सुवर्ण लेणे, नारळ, खण, अगरबत्ती अशा विविध विक्रेत्यांचा व्यवसाय तेजीत असतो. सर्व दुकानवाले, व्यापारी, हॉटेल मालक विक्री झाल्यामुळे आनंदात असतात. देवीचे मनोमन आभार मानतात. भराडी देवीचे मंदिर यात्रेच्या निमित्ताने विद्युत रोषणाईच्या झगमगटात रात्री खुलून दिसते. यात्रा म्हणजे देवी दर्शन, यात्रा म्हणजे खरेदी आणि यात्रा म्हणजे आप्तेष्ट ओळखीच्या माणसांचे, स्नेही सोबत्यांचे अनपेक्षित दर्शन आणि मनोहर संमेलन असते. 4 फेब्रुवारीला होणाऱ्या आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेत आनंदाने ओसंडून वाहणाऱ्या माणसांमधील प्रचंड ऊर्जास्त्रोताचे दर्शन घडेल. हा ऊर्जास्त्रोत सर्व माणसांना श्री देवी भराडी माता पुरवीत असावी. आंगणेवाडी निवासिनी मालवणची महादेवी श्री भराडी माता समस्त भाविकांवर कृपेचा वरदहस्त ठेवील. अशाप्रसंगी देवी भराडी मातेला विनम्र अंत:करणाने वंदन करून म्हणावेसे वाटते ''सर्व मंगल मांगल्ये । शिवेसर्वार्थ साधिके । शरण्ये त्र्यंबके गौरी । नारायणी नमोस्तुते।।''
...............

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com