शिक्षकांसाठी अभियोग्यता परीक्षा

शिक्षकांसाठी अभियोग्यता परीक्षा

शिक्षकांसाठी अभियोग्यता बुद्धिमत्ता परीक्षा
ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यास प्रारंभ; संभाव्य भरतीसाठी चाचणी अनिवार्य
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ३ः राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये ''पवित्र'' या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक भरतीकरिता ''शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी २०२२'' या परीक्षेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यास ३१ जानेवारीपासून प्रारंभ झाला आहे. संभाव्य शिक्षक भरतीसाठी ही परीक्षा देणे गरजेचे आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पात्र उमेदवारांनी जास्तीत जास्त संख्येने या परीक्षेसाठी अर्ज सादर करून जास्तीत जास्त गुण मिळवावेत, असे आवाहन प्राथमिक शिक्षणाधिकारी महेश धोत्रे यांनी केले.
शिक्षक भरतीसाठी महत्त्वाची असलेल्या ''शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी २०२२'' या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत ८ फेब्रुवारीला रात्री ११ वाजून ५९ मिनिटांपर्यंत ठेवली आहे. ''पवित्र पोर्टल'' या संगणकीय प्रणालीद्वारे https://ibpsonline.in/mscepjan२३/ hi वेबसाईट लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. या परीक्षेचे प्रवेशपत्र १५ फेब्रुवारीपासून ऑनलाईन उपलब्ध करून दिले जाणार आहे. २२ फेब्रुवारी ते ३ मार्च या कालावधीत परीक्षेसाठी प्रविष्ट झालेल्या उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी मराठी, इंग्रजी आणि उर्दू हे भाषा माध्यम राहणार आहे. मराठी मासिक क्षमता आणि इंग्रजी भाषिक क्षमता यावरील प्रश्न वगळता इतर सर्व प्रश्न द्विभाषिक असणार आहेत. त्यामुळे उमेदवारांनी अर्ज भरताना इंग्रजी-मराठी अथवा इंग्रजी-उर्दू यापैकी एक माध्यम निवडणे गरजेचे आहे. २०० गुणांची एकूण परीक्षा असणार आहे. यात अभियोग्यता विषयावर ६० टक्के तर बुद्धिमत्ता विषयावर ४० टक्के प्रश्न असणार आहेत. परीक्षा कालावधी दोन तासांचा ठेवण्यात येणार आहे. ही परीक्षा विषय ज्ञानावर होणार नसल्याने अभ्यासासाठी विशिष्ट स्तर ठरलेला नाही.
यामध्ये नियुक्त करावयाच्या रिक्त पदांचा सामाजिक, समांतर आरक्षण, अध्यापनाच्या विषयाच्या रिक्त पदांबाबतचा तपशील संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था, खासगी व्यवस्थापन यांच्या पवित्र प्रणालीवरील जाहिरातीमुळे राहणार आहे. विविध मागास प्रवर्ग, आर्थिक दृष्ट्या दुर्बल, महिला, माजी सैनिक, अंशकालीन, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, प्राविण्य प्राप्त खेळाडू, अनाथ इत्यादींसाठी सामाजिक व समांतर आरक्षण शासनाकडून वेळोवेळी निर्गमित करण्यात येणाऱ्या आदेशानुसार राहणार आहे; मात्र याचा लाभ घेण्यासाठी आवश्यक प्रमाणपत्र सक्षम प्राधिकाऱ्याने प्रदान केलेले असणे बंधनकारक आहे. उमेदवारी अर्ज भरताना हे आवश्यक प्रमाणपत्र उपलब्ध नसले तरी ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या ८ फेब्रुवारी या अंतिम दिनांकादिवशी हे प्रमाणपत्र उपलब्ध झाले तरी तो उमेदवार परीक्षेसाठी पात्र ठरणार आहे. आरक्षणाचा लाभ केवळ महाराष्ट्राचा सर्वसाधारण रहिवाशी असलेल्या उमेदवाराला घेता येणार आहे. या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करताना अमेदवारांना काही अडचण उद्भवल्यास msce.tait२०२२@gmail.com या ई-मेलवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

चौकट
अशी आहे प्रक्रिया
खुल्या प्रवर्गासाठी ९५० रुपये, मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, दिव्यांग उमेदवार यांच्यासाठी ८५० रुपये प्रवेश शुल्क राहणार असून ते पुन्हा मिळणार नाही. अर्ज सादर करताना तीन परीक्षा केंद्रांची निवड करणे आवश्यक आहे. निवड प्रक्रिया करताना प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, अध्यापक विद्यालय, रात्र शाळा या सर्व प्रकारच्या शाळांमधील परीक्षेत मिळालेले गुण विचारात घेतले जाणार आहेत. अभियोग्यता ही परीक्षा गणितीय क्षमता, वेग आणि अचूकता, मराठी आणि इंग्रजी विषयाची भाषिक क्षमता, अवकाशिय क्षमता, कल, आवड, समायोजन, व्यक्तिमत्त्व इत्यादी उपघटकावर राहणार आहे. तर बुद्धिमत्ता ही परीक्षा आकलन, वर्गीकरण, समसबंध, क्रम - श्रेणी, तर्क व अनुमान, कुट प्रश्न, सांकेतिक भाषा, लयबद्ध मांडणी इत्यादी उपघटकावर होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com