
‘कोरे’तर्फे गाड्यांच्या वेळेत बदल
‘कोरे’तर्फे गाड्यांच्या वेळेत बदल
कणकवली ः कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या व सिंधुदुर्गामध्ये थांबा असणाऱ्या तीन गाड्यांच्या विरामगाम स्थानकावरील वेळेमध्ये बदल करण्यात आला आहे. तिन्ही गाड्या यापूर्वी विरामगाम स्थानकावर दुपारी २.०५ वाजता पोहोचून २.०७ वाजता सुटत होत्या. आता या गाड्या दुपारी १.५५ वाजता पोहोचून १.५७ वाजता सुटणार आहेत. नव्या बदलानुसार ओखा-एर्नाकुलम एक्स्प्रेस (१६३३७) ६ फेब्रुवारीपासून, वेरावल-थिरुवनंतपूरम सेंट्रल एक्स्प्रेस (१६३३३) ९ फेब्रुवारीपासून, गांधीधाम-नागरकोइल एक्स्प्रेस (१६३३५) १० फेब्रुवारीपासून धावणार असल्याची माहिती कोकण रेल्वे प्रशासनाने दिली आहे. ओखा-एर्नाकुलम गाडीला कणकवली, वेरावल-थिरुवनंतपूरम गाडीला कुडाळ, गांधीधाम-नागरकोईल गाडीला सावंतवाडी स्थानकावर थांबा आहे.
-------------
आंबा उत्पादकांची उद्यापासून नोंदणी
वेंगुर्ले ः महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळामार्फत हापूस आंबा थेट विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध करण्याच्या दृष्टीने उत्पादक ते ग्राहक थेट विक्री उपक्रम राबविला जातो. आंबा हंगाम २०२३ साठी आंबा उत्पादकांना विक्रीकरिता पुणे आणि राज्यातील आंबा परराज्यातील इतर शहरांमध्ये स्टॉल उपलब्ध होण्यासाठी आंबा उत्पादकांची नोंदणी ६ फेब्रुवारीपासून सुरू करण्यात येणार आहे. नावनोंदणीसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २८ फेब्रुवारीला आहे. अशी माहिती कृषी पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक डॉ. भास्कर पाटील यांनी दिली. स्टॉल नोंदणीसाठी आंबा नोंदीसह सातबारा उतारा व आवश्यक कागदपत्रांसह नोंदणी करावी.
--
कुडाळात बसफेऱ्या उद्यापासून पूर्ववत
कुडाळ ः येथील एसटी आगारातून सुटणाऱ्या ५९ बसफेऱ्या ४ व ५ फेब्रुवारी दरम्यान रद्द करून आंगणेवाडी येथील भराडी यात्रोत्सवाला सोडण्यात येत आहेत. यामुळे काही बसफेऱ्या बंद राहतील, अशी माहिती एसटी आगार व्यवस्थापक सचेतन बोवलेकर यांनी दिली. मुंबई, पुणे अशा शहरांतून भाविक आंगणेवाडी यात्रेला येतात. या यात्रेला भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन एसटी महामंडळाने काही जादा बसफेऱ्या या यात्रेला सोडल्या आहेत. याची प्रवाशांनी नोंद घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. या बसफेऱ्या सोमवारपासून (ता. ६) पूर्ववत वेळापत्रकाप्रमाणे सोडण्यात येतील.