
‘ऍडमिशन’मुळे तरुणांची फसवणूक ः साळगावकर
80393
बबन साळगावकर
‘ॲडमिशन’मुळे तरुणांची
फसवणूक ः साळगावकर
उद्योजक साबळे यांच्यावर टीका
सावंतवाडी, ता. ४ ः येथे सुरू केलेल्या ॲडमिशन या संस्थेकडून रोजगार मेळावे घेऊन उद्योजक हर्ष साबळे यांनी येथील युवकांची फसवणूक केली. नोकर भरती, सेटअप बॉक्स, मोफत वायफाय लोकांपर्यंत पोहचले काय? याचे उत्तर श्री. साबळेंनी द्यावे, असा आरोप माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी नुकताच येथे केला.
येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी माजी नगरसेवक सुरेश भोगटे, विलास जाधव, उमाकांत वारंग उपस्थित होते. श्री. साळगावकर म्हणाले, ‘‘उद्योजक व एक मराठी माणूस म्हणून आम्हाला हर्ष साबळे यांचा अभिमान आहे; मात्र त्यांनी येथील जनतेला खास करून येथील बेरोजगार युवकांना नोकरीची आमिषे दाखवून का फसवावे? त्यांनी या ठिकाणी सुरू केलेल्या ‘ॲडमिशन’च्या नावाने दोनवेळा युवकांची फसवणूक केली. येथील युवकांसाठी एमपीएससी, यूपीएससी स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी सुरू केलेले बाळासाहेब ठाकरे ज्ञान प्रबोधिनी सेंटरही केव्हाच या ठिकाणावरून दुसरीकडे हलवले; मात्र त्याची साधी भनकही जनतेला नाही. अलीकडेच येथे सुरू केलेल्या मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्राच्या आडून हा प्रकार केला. त्यामुळे श्री. साबळे यांना नेमका या ठिकाणी कोण खेळवत आहे, याचा शोध आता घ्यावाच लागेल.’’ ते पुढे म्हणाले, ‘ॲडमिशन’च्या नावाखाली अलीकडेच या ठिकाणी रोजगार मेळाव्याचे आमिष दाखवण्यात आले; परंतु सहज उपलब्ध होणारी दहा हजारांची नोकरी या ठिकाणच्या मेळाव्यात देऊन त्यांनी फसवणूक केली. दुसरीकडे ‘चांदा ते बांदा’ योजनेतून गीरगाईंचे स्वप्नही येथील जनतेला दाखवण्यात आले. मुळात हर्ष साबळे आणि गाईंचा संबंध काय?’’