
आई भराडीच्या दर्शनासाठी जनसागर लोटला
८०४१६
आंगणेवाडी ः येथे शनिवारी श्री देवी भराडीच्या यात्रोत्सवानिमित्त दाखल भाविकांनी शिस्तबद्ध वातावरणात दर्शन घेतले.
आई भराडीच्या दर्शनासाठी जनसागर लोटला
आंगणेवाडी यात्रोत्सव; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह दिग्गजांची दर्शनासाठी हजेरी
प्रशांत हिंदळेकर ः सकाळ वृत्तसेवा
आंगणेवाडी, ता. ४ ः ‘आई भराडी नमोनमः’ च्या जयघोषात आज संपूर्ण आंगणेवाडीनगरी दुमदुमली. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले लाखो भाविक आई भराडीच्या दर्शनाने कृतार्थ झाले. भल्या पहाटे तीनपासून आई भराडीचे दर्शन, ओटी भरण्यास सुरुवात झाली. दिवसभरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, काँग्रेस, भाजप, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी, तसेच चित्रपट कलावंतांनी दर्शन घेतले. रात्री उशिरा भाविकांचा जनसागर आंगणेवाडीत लोटल्याने परिसर बहरून गेला होता.
कोकणचे प्रतिपंढरपूर म्हणून ख्याती पावलेल्या आंगणेवाडीतील आई भराडी यात्रोत्सवानिमित्ताने महिनाभर आंगणे कुटुंबीय, ग्रामस्थ मंडळ, प्रशासनाने जय्यत तयारी केली होती. मध्यरात्रीपासूनच भाविक दाखल झाले होते. रेल्वे, एसटी बस तसेच खासगी वाहनांमधून भाविक शहरात, गावागावांत दाखल होत होते. दर्शनासाठी भाविकांच्या मोठ्या रांगा होत्या. आंगणे कुटुंबीयांच्या नियोजनामुळे भाविकांना अल्पकाळातच दर्शन घेता येत होते. भराडी देवीची भरजरी साडी तसेच सुवर्णालंकारांनी पूजा बांधण्यात आली होती. मंदिराचा गाभारा आकर्षक फुलांनी सजविला होता. सर्वत्र नयनरम्य विद्युत रोषणाई होती. यावर्षी मालवण व कणकवलीच्या बाजूने नऊ रांगांची सुविधा होती. अपंग तसेच अतिमहनीय व्यक्तींसाठी स्वतंत्र रांग होती. पहाटे अनेक भाविकांनी देवीचे दर्शन घेतले. मुखदर्शनासाठीही आवश्यक सुविधा ग्रामस्थ मंडळाने केली होती. सकाळच्या सत्रातही भाविकांची मोठी गर्दी होती. देवीच्या दर्शनानंतर गृहोपयोगी, मिठाई तसेच अन्य साहित्याची खरेदी करण्यासाठी भाविकांचा भर होता.
सकाळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, खासदार राजन विचारे, रवींद्र फाटक, आमदार आशिष शेलार, विनोद तावडे, प्रताप सरनाईक, खासदार अरविंद सावंत, आमदार वैभव नाईक, खासदार विनायक राऊत, संदेश पारकर, संजय पडते, इर्शाद शेख, साक्षी वंजारी, साईनाथ चव्हाण, अरविंद मोंडकर, मेघनाद धुरी, पल्लवी तारी, नागेश मोरये, बाळू अंधारी, ममता तळगावकर यांनी दर्शन घेतले. दुपारच्या सत्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नारायण राणे, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, खासदार श्रीकांत शिंदे, माजी खासदार नीलेश राणे, आमदार नीतेश राणे, भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, संजय आंग्रे यांच्यासह अन्य नेत्यांनी दर्शन घेतले.
मंदिरात नवस बोलणे, फेडणे तसेच तुलाभार करण्यासाठी भाविकांची झुंबड उडाली होती. मंदिर परिसरात काँग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, भाजप, बाळासाहेबांची शिवसेना पक्षांची कार्यालये, शासकीय योजनांच्या माहितीचे कक्ष, बचतगट प्रदर्शन, विक्री केंद्र, पोलिस नियंत्रण कक्ष होते. मालवण तसेच कणकवलीच्या दिशेने जिल्ह्यातील हॉटेल व्यावसायिक, मिठाई, अन्य गृहोपयोगी साहित्याची दुकाने, आकाश पाळणे, लहान मुलांना आकर्षून घेणारे विविध खेळ होते. जिल्हा बँकेसह विविध राजकीय पक्षांच्या स्वागत कमानी, बॅनर्स लावण्यात आले होते. दुपारनंतर भाविकांची गर्दी आणखी वाढण्यास सुरुवात झाली. एसटीने जादा बसची सुविधा दिली होती. मालवणहून जाण्यासाठी एसटी बस स्थानक, टोपीवाला हायस्कूल, तारकर्ली, देवबाग, आनंदव्हाळ, सर्जेकोट, मालोंड, मसुरे येथून बस सोडण्यात येत होत्या. जिल्ह्यातील विविध आगारांमधूनही बस सुविधा होती. खासगी आराम बस, सहाआसनी, तीनआसनी, तसेच अन्य खासगी वाहनांमधून भाविक यात्रास्थळी दाखल होत होते. आंगणेवाडीत खासगी वाहनांसाठी तीन किलोमीटरवर वाहनतळांची सुविधा होती. आंगणेवाडीकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावर वाहतुकीची कोंडी होऊ नये, यासाठी वाहतूक पोलिसांची पथके होती. साध्या वेशातील पोलिसांची गस्तही सुरू होती. यात्रेसाठी मुंबईकर चाकरमानी शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागात दाखल होत होते.
चोख बंदोबस्त
यात्रास्थळी आरोग्य, महसूल यंत्रणा, पोलिसांसह अन्य शासनाच्या विभागांचे कक्ष होते. जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलिस बंदोबस्त तैनात आहे.
राजकीय पक्षांची वातावरण निर्मिती
यात्रोत्सवात शहरासह तालुक्यातील गावागावांमध्ये विविध राजकीय पक्षांच्या स्वागत कमानी, बॅनर्स झळकले. आगामी काळात मुंबई, ठाणे महापालिकांसह अन्य निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून राजकीय पक्षांनी यात्रेच्या निमित्ताने जोरदार वातावरण निर्मितीवर भर दिल्याचे दिसून येत आहे.