
कोकण विकासासाठी प्राधिकरण स्थापणार
80415
आंगणेवाडी ः भराडी देवीच्या वार्षिकोत्सवात शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री देवी भराडीचे दर्शन घेतले. शेजारी डॉ. श्रीकांत शिंदे, दीपक केसरकर आदी.
कोकण विकासासाठी प्राधिकरण स्थापणार
मुख्यमंत्र्यांची घोषणा; सिंधुदुर्ग-मुंबई ग्रीनफिल्ड महामार्ग हाती घेणार
सकाळ वृत्तसेवा
आंगणेवाडी, ता. ४ ः कोकणात मत्स्य, पर्यटन व्यवसायाला मोठा वाव आहे. ही बाब डोळ्यांसमोर ठेवून आम्हाला कोकणाचा विकास साध्य करायचा आहे. त्यादृष्टीने बाळासाहेब ठाकरे मुंबई-नागपूर या समृद्धी महामार्गाप्रमाणेच सिंधुदुर्ग-मुंबईला जोडणाऱ्या ग्रीनफिल्ड महामार्गाचे काम राज्य व केंद्राच्या माध्यमातून हाती घेतले जाणार आहे. कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी कोकण विकास प्राधिकरण स्थापन केले जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केली.
आंगणेवाडीतील भराडी देवीच्या वार्षिकोत्सवाच्या निमित्ताने येथे आलेल्या शिंदे यांनी दुपारी भराडी मातेचे दर्शन घेतले. यावेळी आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष भास्कर आंगणे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात केला. केंद्रीय मंत्री नारायण राणे, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, उद्योगमंत्री उदय सामंत, भाजपचे प्रदेश सचिव नीलेश राणे, ब्रिगेडियर कर्नल सुधीर सावंत, आमदार नीतेश राणे, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, प्रमोद जठार, रवींद्र फाटक, अतुल काळसेकर, शाम सावंत यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘‘कोकणला ७२० किलोमीटरची किनारपट्टी लाभली आहे. येथे मत्स्य व पर्यटन व्यवसायाबरोबरच कृषीमध्येही विकासाच्या संधी आहेत. कोकणाच्या विकासाला गती येण्यासाठी रखडलेला मुंबई-गोवा महामार्गाचे काम युद्धपातळीवर हाती घेतले आहे. सागरी महामार्गाचे रुंदीकरण करण्यासाठी आमच्या सरकारची प्राथमिकता असेल. कोकणाच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी समृद्धी महामार्गाप्रमाणेच सिंधुदुर्ग-मुंबई ग्रीनफिल्ड महामार्ग बनविण्याचा आमच्या सरकारचा मानस आहे. कोकणात नैसर्गिक साधनसंपत्ती विपुल प्रमाणात आहे. त्याचा विकासासाठी उपयोग होण्यासाठी स्वतंत्र असे कोकण विकास प्राधिकरण स्थापन केले जाईल.’’
श्री. राणे म्हणाले, ‘‘आमचे सरकार सामान्य जनतेचे आहे. सरकारच्या स्थैर्यासाठी भराडी मातेला साकडे घातले आहे. हे सरकार आपला कार्यकाल पूर्ण करेल. आंगणे कुटुंबीयांनी भाविकांची चांगली काळजी घेतली.’’
जनतेच्या सुखासाठी मुख्यमंत्र्यांचे साकडे
राज्यातील जनतेला, शेतकऱ्याला सुखी ठेव, असे साकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भराडी मातेला घातले. आंगणेवाडी येथे भक्त निवास उभारण्यासाठी आंगणे कुटुंबीयांनी प्रस्ताव द्यावा, त्यावर तत्काळ विचार केला जाईल, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.