मौखिक आरोग्याकडेही हवे लक्ष

मौखिक आरोग्याकडेही हवे लक्ष

लोगो ः मौखिक आरोग्य दिन
---
80446

मौखिक आरोग्याकडेही हवे लक्ष

तज्ज्ञांचे मत; दुर्लक्ष केल्यास उतारवयात त्रासदायक

निखिल माळकर ः सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ४ ः शारीरिक आरोग्य सुदृढ राखण्यासह मौखिक आरोग्याला प्राधान्य देणेही महत्त्वाचे आहे; पण दुर्दैवाने याकडे दुर्लक्ष होते. सर्वांगीण आरोग्य सुदृढ ठेवण्याच्या दृष्टीने मौखिक आरोग्य सांभाळणे तितकेच महत्त्वाचे आहे. याकडे दुर्लक्ष केल्यास याचा परिणाम उतारवयात भोगावा लागतो, असे मत जिल्ह्यातील आरोग्य अभ्यासकांनी आज व्यक्त केले. दरवर्षी ५ फेब्रुवारी हा दिवस डॉ. जी. बी. शंख्वाळकर यांचा जन्मदिन ‘मौखिक आरोग्य दिन’ म्हणून साजरा होतो. यानिमित्ताने जिल्ह्यातील या क्षेत्राबाबतची स्थिती विविध तज्ज्ञांकडून जाणून घेतली.
दातांची कीड, हिरड्यांचे आजार, मुखदुर्गंधी, तंबाखूमुळे होणाऱ्या मुखाच्या आजारांचा प्रामुख्याने मौखिक आरोग्यात समावेश होतो. मौखिक आरोग्याचा मनुष्याच्या सामान्य आरोग्याशी घनिष्ठ संबंध आहे. तरी देखील मौखिक आरोग्याकडे गंभीरतेने बघितले जात नाही. मौखिक शुद्धता आणि दंत आरोग्य याकडे नागरिकांचे लक्ष नाही. वृद्धावस्थेत मौखिक पेशींवर याचा परिणाम होतो. वाढत्या वयानुसार होणाऱ्या आजारांचा आणि औषधांचाही ज्येष्ठांच्या मौखिक आरोग्यावर परिणाम होतो. मौखिक आरोग्य म्हणजे केवळ दातांच्या स्वच्छतेपुरतेच मर्यादित नाही, तर एकूणच मुखाची निगा राखण्याकडे लक्ष द्यावे. रात्री जेवताना दातांमध्ये अडकलेले अन्नकण काढण्यासाठी विशेष ‘ब्रश’ आहेत. ब्रशच्या शास्त्रशुद्ध वापरातून दात स्वच्छ करावेत. मधुमेहासह पचनसंस्थेतील दोष यांसारख्या रोगांची पहिली लक्षणे मुखामध्येच आढळतात. सकाळी आणि रात्री तीन मिनिटे दात स्वच्छ घासले पाहिजेत. टंग क्‍लिनर किंवा हाताने जीभ नियमितपणे स्वच्छ केली पाहिजे. दातांच्या फटीतील कण ‘डेंटल फ्लास’ या दोऱ्यानेच काढावेत. तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांपासून कटाक्षाने दूर राहिले पाहिजे.
दंत आरोग्याकडे सारेच दुर्लक्ष करतात. समाजामध्ये सर्वांसाठी तोंडाचे आणि दातांचे आरोग्य फारच महत्त्वाचे आहे. मौखिक आरोग्य तुम्हाला एका निरोगी जीवनाकडे नेईल. जीवनामध्ये मौखिक आरोग्याचा फार मोठा वाटा आहे. आपले दात जागेवर धरून ठेवण्यासाठी हिरड्या त्यांच्याभोवती असतात. हिरड्या निरोगी ठेवण्यासाठी मुखाचे आरोग्य राखणाऱ्या सवयींचा अवलंब करा. दररोज किमान दोनदा ब्रशने दात स्वच्छ घासा. दररोज एकदा तरी दातांमधील फटी साफ करा आणि दातांच्या डॉक्टरकडे नियमितपणे जाण्याचे वेळापत्रक राखा. आपल्या हिरड्या लाल आणि सुजलेल्या असतील आणि त्यामधून चटकन रक्त येत असेल, तर त्यांना जंतुसंसर्ग झाला आहे, असे समजा. ह्यास ‘जिंजिव्हायटिस’, असे म्हणतात. त्वरित उपचाराने तोंडाचे आरोग्य पुन:श्च मिळवा. उपचार न केल्यास जिंजिव्हायटिस खूपच गंभीर होऊन ‘पेरिओडोंटिटिस’ रोग होईल आणि दात पडू लागतील. दररोज किमान दोनदा ब्रशने दात स्वच्छ घासा. घाई न करता हे कार्य व्यवस्थितपणे पूर्ण करण्यासाठी पूर्ण वेळ लावून ब्रश करा. योग्य टूथपेस्ट आणि टूथब्रश वापरा. फ्लोराइडयुक्त टूथपेस्ट आणि नरम केसांचा ब्रश वापरा. दातांचे चर्वण पृष्ठभाग तसेच जीभही घासा; मात्र फार वेगाने व दाबाने घासू नका, अन्यथा हिरड्यांना इजा होईल. दर तीन-चार महिन्यांनी नवीन टूथब्रश घ्या.
शारीरिक आरोग्याचा आरसा
चेहरा जसा भावनांचा आरसा असतो, त्याचप्रमाणे दात, मुख हे सर्व शरीराच्या आरोग्याचा आरसा असतो. सुंदर दात असल्यामुळे आपल्या व्यक्तिमत्त्वामध्ये निश्चित फरक पडतो. हसत चेहरा हा सर्वांना प्रिय असतो. दातांच्या स्वास्थ्यामुळे हसरा चेहरा अधिकच सुंदर दिसतो. त्यामुळे दातांचे आरोग्य टिकवणे फारच जरुरी आहे. दात किडू नये म्हणून काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी ब्रश व टूथपेस्टच्या साह्याने दात स्वच्छ केले पाहिजेत. सकाळी व रात्री झोपण्यापूर्वी गोलाकार पद्धतीने ब्रशिंग केले पाहिजे. तसेच गोळ्या, बिस्किटे, चॉकलेट, केक यासारखे अतिगोड व अतिचिवट पदार्थ सेवन न करता त्याऐवजी सफरचंद, गाजर, मुळा, काकडी, स्ट्रोबेरी, पेरू, बोर अशी फळे खाणेच योग्य.
गर्भवती असल्यापासून कॅल्शियम व फ्लोराईड युक्त पदार्थांचे सेवन करा. त्यामध्ये दूध अंडी, मासे, पेरू, बोर, लिंबू, मोसंबी, स्ट्रॉबेरी आदींचा समावेश असावा.
....................
काय करायला हवे?
नरम ब्रिसलचा ब्रश वापरा. प्रत्येक जेवणानंतर खळखळून चुळा भरा. अडकलेले अन्नकण काढण्यासाठी फ्लॉसिंग करा.
तोंड कोरडे पडू लागल्यास लाळेचे प्रमाण वाढवण्यासाठी बिनसाखरेचे च्युईंगम चघळा. स्नायूंना व्यायाम घडविण्यासाठी कडक व दाणेदार पदार्थ खा. मद्यार्कविरहित माउथवॉशचाच वापर करा. कारण मद्यार्कयुक्त माउथवॉशने तोंड कोरडे पडते. जीभ स्वच्छ‍ आहे, ह्याची खात्री करण्यासाठी टंग क्लीनर वापरा. जिभेवर जीवाणूंचा थर जमल्यास ‘हॅलिटोसिस’सारखे रोग होऊ शकतात. टूथब्रशने देखील जीभ स्वच्छ करता येते. पडून गेलेल्या दातांच्या ठिकाणी खोटे दात (इंप्लांट्स) बसवावेत. म्हणजे क्राउन्स आणि ब्रिजना आधार मिळतो व चेहऱ्याची एकंदर ठेवण चांगली दिसते. दात झिजले असल्यास तुम्ही विविध उपाय करून त्यांचे निवारण मिळवू शकता. क्राउन लावून ते मूळ आकारात आणता येतात. तसेच इंप्लांटचे देखील विविध प्रकार असतात. सरते शेवटी सांगायचे म्हणजे, धूम्रपानामुळे तोंडाचे आरोग्य पार बिघडते. त्याने दात तर काळे पडतातच, शिवाय इतर अनेक गंभीर परिणाम होतात.
--
कोट
मौखिक आजारांची लक्षणे वारंवार दिसत असली तरी त्याकडे दुर्लक्ष करण्याचे प्रमाण अद्याप दिसून येते. या लक्षणांकडे वेळीच लक्ष दिले गेल्यास आजारांना आळा घालणे शक्य असते; मात्र माहितीअभावी त्याकडे दुर्लक्ष करण्याचे प्रमाण अधिक आहे. ग्रामीण भागात सातत्याने आरोग्य चाचणी घेणे गरजेचे आहे.
- डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर, वैद्यकीय अधिकारी, उपजिल्हा रुग्णालय.
...................
कोट
दंत आरोग्याकडे सारेच दुर्लक्ष करतात. वृद्धावस्थेत दातांची झीज झाल्यानंतर मौखिक आरोग्य सांभाळणे कठीण असते. तसेच लहानपणी दुधाचे दात किडले तरी ते दात पडणारच आहेत, ही भावना पालकांच्या मनात असते; मात्र दुधाचे दात किडून पडले, तर येणाऱ्या नवीन दातांना धोका असतो. प्रत्येक व्यक्तीने चांगले ब्रश करणे गरजेचे आहे. तसे न झाल्यास ही समस्या निर्माण होते.
- डॉ. सागर देसकर, सावंतवाडी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com