पान एक-आंगणेवाडीला सुमारे 10 लाख भाविक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पान एक-आंगणेवाडीला सुमारे 10 लाख भाविक
पान एक-आंगणेवाडीला सुमारे 10 लाख भाविक

पान एक-आंगणेवाडीला सुमारे 10 लाख भाविक

sakal_logo
By

80706
आंगणेवाडी ः येथे शनिवारी रात्री ताटे लावण्याचा कार्यक्रम पार पडला.
80707
आंगणेवाडी ः यात्रोत्सवात शनिवारी रात्री भाविकांच्या गर्दीने उच्चांक गाठल्याचे दिसून आले.

आंगणेवाडीला दहा लाखांवर भाविक
विक्रमी गर्दी ः ताटे लावण्याचा कार्यक्रम ठरला अविस्मरणीय
सकाळ वृत्तसेवा
आंगणेवाडी, ता. ५ ः लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडीच्या आई भराडी देवीचा यात्रोत्सव भक्तांच्या अलोट गर्दीत मोठ्या उत्साहात पार पडला. यंदा यात्रा काळात दोन दिवसांत सुमारे १० लाखांहून जास्त भक्तांनी भराडी देवीचे दर्शन घेतले. यात्रेतील सर्वात महत्त्वाचा ताटे लावण्याचा कार्यक्रम आज झाला. रात्री भाविकांच्या गर्दीने उच्चांक गाठल्याचे दिसून आले. यात्रोत्सवानिमित्त व्यापारी वर्गाची लाखो रुपयांची उलाढाल झाली. यात्रेच्या आजच्या दुसऱ्या दिवशी सायंकाळी आंगणेवाडी ग्रामस्थांच्या सहकार्याने उशिरापर्यंत भाविकांची गर्दी कायम होती. आज भराडी देवीच्या यात्रोत्सवाची सांगता झाली.
आंगणेवाडीतील श्री भराडी देवीच्या यात्रोत्सवामध्ये मंदिर परिसरातील आकर्षक विद्युत रोषणाई, लेझर किरणाचे दूरवर पडणारे प्रकाशझोत साऱ्यांचे लक्ष वेधून घेत होते. मंदिरावर केलेली आकर्षक विद्युत रोषणाईने आंगणेवाडी परिसर उजळून निघाला होता. मंदिराच्या विद्युत रोषणाईसह आपल्या मोबाईलवर सेल्फी टिपताना युवावर्ग दिसून येत होता. मंदिर परिसरात भव्य सभामंडप, चलचित्र देखावा साऱ्याचे लक्ष वेधून घेत होता. गजबजलेली खाजा-मिठाईची दुकाने याबरोबरच आकाश पाळणा, मौत का कुआ इतर फनी गेम्स, या ठिकाणी युवा वर्ग चाहत्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. भाविकांना सुलभ देवीचे दर्शन होण्यासाठी नऊ रांगांचे नियोजन आंगणेवाडी ग्रामस्थांनी केल्याने भाविकांना भराडी मातेचे सुलभ दर्शन घेता आले. आंगणे कुटुंबीय व ग्रामस्थ मंडळ, तसेच प्रशासनाच्या सुयोग्य नियोजनामुळे यावर्षीचा भराडी देवीचा यात्रोत्सव मोठ्या उत्साहात सुरळीत पार पडला. सायंकाळी विविध राजकीय पदाधिकारी नेते मंडळी भेटी देत भराडी देवीचे दर्शन घेतले. रात्री १० वाजण्याच्या सुमारास देवीला प्रसाद (ताटे) लावण्याच्या धार्मिक कार्यक्रमास सुरुवात झाली. प्रथम देवीच्या मानकऱ्यांची प्रसादाची ताटे देवीच्या प्रांगणात सुहासिनी महिलांनी डोईवर घेत आणली. यानंतर ग्रामस्थांनी घरात बनविलेली प्रसादाची ताटे मंदिरात आणली. यावेळी मंदिर परिसरात भाविकांची एकच गर्दी झाली होती. ''''जय..जय भराडी देवी..''''जय... जय.. भराडी देवी....या मंत्र घोषात भाविक तल्लीन झाले होते. महाप्रसादाच्या कार्यक्रमानंतर दरवर्षीप्रमाणे अनेक भाविकांनी आंगणे कुटुंबीयांच्या घरी प्रसाद घेतला.
आंगणेवाडी यात्रेत चांगली विक्री झाली. कपडे, चादर, खेळणी, शेती उपयोगी अवजारे, मिठाई दुकानदार, खाद्यपदार्थ, हॉटेल व्यावसायिक, विविध स्टॉलधारक तेजीत होते. काल सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देवी चरणी नतमस्तक होत दर्शन घेतले. आमदार नितेश राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, प्रवीण दरेकर यांनीही माते चरणी नतमस्तक होत दर्शन घेतले.
आंगणेवाडी यात्रेत भराडी देवीच्या यात्रेस येणाऱ्या राज्यातील लाखो भाविकांना सुलभ दर्शन होण्यासाठी आंगणेवाडी ग्रामस्थ महिनाभर नियोजनात व्यस्त असतात. त्यामुळे प्रथम पाहुण्यांच्या आदरातिथ्यानंतर कौटुंबिक सोहळा अशा प्रथेमुळे यात्रेच्या दुसऱ्या दिवशी मुंबई, पुणे यासह अन्य ठिकाणी वास्तव्यास असलेल्या आंगणे कुटुंबीयांनी व स्थानिक आंगणेवाडीवासीयांनी रांगेत उभे राहून श्री देवी भराडी देवीचे दर्शन घेतले.

चौकट
काटेकोर नियोजन
यात्रा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी जिल्हा, तालुका व ग्रामपंचायत प्रशासन, तसेच पोलिस प्रशासन, महसूल विभाग, आरोग्य प्रशासन, महावितरण, एसटी प्रशासन, आंगणे कुटुंबीय मुंबई मंडळ, उत्सव समिती, तसेच आंगणे परिवाराने परिश्रम घेतले. यावेळी आंगणेवाडीत दाखल झालेल्या भाविकांनी देवीच्या दर्शनानंतर आंगणे कुटुंबीयांच्या सुनियोजनाबद्दल समाधान व्यक्त केले.