
सातेरी मंडळाचे उपक्रम कौतुकास्पद
80764
सरमळे ः कार्यक्रमाचे उद्घाटन करताना सरपंच विजय गावडे आदी.
सातेरी मंडळाचे उपक्रम कौतुकास्पद
विनायक दळवी ः ओटवणेत विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा सत्कार
ओटवणे, ता. ६ ः सातेरी भगवती कला, क्रीडा मंडळाचे सातत्यदर्शी उपक्रम अन्य मंडळांसाठी प्रेरणादायी असून अशा मंडळांच्या सहकार्यासाठी सदैव तत्पर आहे, अशी ग्वाही सावंतवाडी पंचायत समितीचे माजी उपसभापती विनायक दळवी यांनी दिली.
सरमळे येथील सातेरी भगवती कला, क्रीडा मंडळाच्या आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष रवींद्र म्हापसेकर, ओटवणे सरपंच दाजी गावकर, उपसरपंच संतोष कासकर, सरमळे सरपंच विजय गावडे, उपसरपंच दीपांकर गावडे, सदस्या दिव्या गावडे, सुहासिनी सावंत, संजना सावंत, राजन कांबळे आदी उपस्थित होते. मंडळाचे कार्य कौतुकास्पद असून मंडळ राबवित असणारे अभिनव उपक्रम स्तुत्य आहेत. भविष्यात मंडळ अजूनही भरारी घेईल, अशा शुभेच्छाही मान्यवरांनी दिल्या. मंडळाच्या माध्यमातून प्रतिवर्षी विविध उपक्रमही राबविले जातात. या कार्यक्रमांच्या माध्यमातून विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा सत्कार मंडळातर्फे करण्यात आला. रसिकांचे मनोरंजन व्हावे, यासाठी नवोदित कलाकारांना संधी देत दोन नवोदित बुवांचा डबलबारी जंगी सामनाही ठेवण्यात आला होता. यावेळी पत्रकार दीपक गावकर, लुमा जाधव यांसह भजनी बुवा अनंत नाईक (सोनुर्ली) व नागेश शेटकर (शेर्ले) यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमस्थळी मंडळाचे उपाध्यक्ष संजय गावडे, खजिनदार सागर गावडे, सदस्य मंगेश सावंत, संतोष सरमळकर, सत्यवान सावंत, ज्येष्ठ ग्रामस्थ नाना गावडे, विठ्ठल गावडे, मनोज सावंत, बंटी गावडे, चंद्रकांत गावडे, अक्षय परब आदी उपस्थित होते. उपाध्यक्ष संजय गावडे यांनी सूत्रसंचालन केले.