
राजापूर ः भाजपच्या रणनीतीत नारायण राणे केंद्रस्थानी असतील
फोटो ओळी
- rat६p१.jpg- नारायण राणे--KOP२३L८०७४४
भाजपची गणिते लोकसभेची ............. लोगो
भाजपच्या रणनीतीत नारायण राणे केंद्रस्थानी शक्य
रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघ ; खासदार विनायक राऊतांशी संघर्ष होणार
संदेश सप्रे ः सकाळ वृत्तसेवा
देवरूख, ता. ६ ः रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघावर दीर्घकाळाने दावा सांगता येईल, अशी परिस्थिती भाजपसाठी निर्माण झाली आहे. शिवाय नारायण राणे यांच्या सारखा तगडा उमेदवार भाजपच्या हाताशी आहे. ते आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार असतील, अशी चर्चा सुरू असून भाजपने राणे वा इतर कोणी उमेदवार असो, निवडणुकीची रणनीती ठरवत पावले टाकण्यास सुरवात केली आहे. या रणनीतीत नारायण राणे यांना अत्यंत महत्वाचे किंबहुना केंद्रीय स्थान असेल, असे संकेत मिळत आहेत.
शिवसेनेत पडलेली फूट आणि उमेदवारीवर दावा सांगण्यासाठी शिंदे गटाचा कोणी मोठा नेता उपलब्ध नाही, अशा निर्माण झालेल्या पोकळीत भाजप आपला दावा पुढे रेटू शकतो. गेले काही दिवस या मतदारसंघातून भाजप केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उमेदवारी देणार असल्याची जोरदार चर्चा आहे. यावर बोलताना खासदार राऊत यांनी जर राणे उभे राहिले तर आपण अडीच लाख मतांनी निवडून येऊ, असा जाहीर दावा केला आहे. यामुळे तळकोकणात पुन्हा एकदा राऊत विरुद्ध राणे असे वाक्युद्ध पेटण्याची शक्यता आहे.
गेल्या २ वर्षात भाजपने या मतदारसंघात मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार प्रसाद लाड, माजी आमदार प्रमोद जठार यांच्या माध्यमातून तळागाळात संघटना बांधणी केली आहे. केंद्र व राज्यात सत्ता असल्याने विकासासाठी भरीव निधी येत आहे. अशा स्थितीत ठाकरे गटासाठी या आधी सोपी असलेली लढाई भाजपने कठीण करून ठेवलीय. आगामी निवडणुकीत या मतदारसंघात भाजपला शिंदे गटाची साथ मिळणार आहे. त्यामुळे ठाकरे गटाची मते फोडणे भाजपसाठी सोपे होणार आहे.
चौकट
सामंत यांचा तो इशारा
राज्यात सत्तांतर घडल्यानंतर रत्नागिरीचे आमदार उदय सामंत शिंदे गटात सामील झाले. यानंतर खासदार विनायक राऊत यांनी सामंत यांच्यावर शेलक्या भाषेत टीका केली होती; मात्र टिकेला टीकेने उत्तर न देता राऊत यांना आपण याचे उत्तर मार्च २०२४ मधेच देऊ, असा आव्हान वजा इशारा सामंत यांनी दिला होता. त्यामुळे रत्नागिरी मतदार संघातून मते मिळवणे राऊत यांच्यासाठी आव्हान ठरणार आहे.
कोट
वरिष्ठांच्या आदेशानुसार संपूर्ण मतदारसंघाच्या ग्रामीण भागात आमचे काम सुरू आहे. केंद्रात आणि राज्यात आमचेच सरकार असून लोकभावना चांगल्या असल्याने पुढची लोकसभा निवडणूक आम्हाला सोपी जाईल हे निश्चित.
--प्रमोद अधटराव, तालुकाध्यक्ष, संगमेश्वर