रत्नागिरी ः जुनी पेन्शन योजना प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागेल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी ः जुनी पेन्शन योजना प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागेल
रत्नागिरी ः जुनी पेन्शन योजना प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागेल

रत्नागिरी ः जुनी पेन्शन योजना प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागेल

sakal_logo
By

जुन्या पेन्शनचा प्रश्न मार्गी लागेल

आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे ; उपमुख्यमंत्री फडणवीसांचा पुढाकार
रत्नागिरी, ता. ७ ः शिक्षकांसह राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शन योजनेबाबत सभागृहात उपस्थित केलेला प्रश्न चुकीचा होता. त्या प्रश्नाला अनुसरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पेन्शन योजनेबाबत वक्तव्य केले होते; परंतु जुन्या पेन्शन योजनेबाबत सविस्तर माहिती देऊन ती कशी गरजेची आहे, हे पटवून दिले. त्यामुळे येत्या काही महिन्यात जुन्या पेन्शन योजनेचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागेल, असा विश्वास कोकण शिक्षक मतदार संघातील नवनिर्वाचित आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी व्यक्त केला.
कोकण शिक्षक मतदार संघातून विजयी झाल्यानंतर आमदार म्हात्रे सोमवारी (ता. ६) प्रथमच रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यांवर आले होते. या वेळी शिक्षकांच्या सर्व संघटनांनी शासकीय विश्रामगृह येथे आमदार म्हात्रे यांचे जल्लोषात स्वागत केले. त्यानंतर आमदार म्हात्रे पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले,‘अनेक वर्षे शिक्षकांच्या प्रश्नाबाबत आपण संघर्ष करत आहोत. शिक्षकांचे प्रश्न काय आहेत याची पूर्ण जाणीव मला आहे. शिक्षकांचे प्रश्न नीट सोडवू शकतो याची खात्री शिक्षकांना असल्यामुळे त्यांनी मला आपला प्रतिनिधी म्हणून विधान परिषदेत पाठवले आहे. सहा वर्षाच्या कार्यकाळात त्यांचा विश्वास सार्थकी लावू.’
कोकणातील सर्व आमदारांनी माझ्या पाठीशी यंत्रणा उभी केली होती. प्रत्येक मतदाराशी संवाद साधला. त्यामुळे हा विजय एकट्याचा नसून सर्वांचाच आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, उद्योगमंत्री उदय सामंत, शिक्षणमंत्री दीपक केसरकर, सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, केंद्रीय मंत्री नारायण राणेंसह सर्वांनीच प्रयत्न केले. त्यामुळेच यशाचे शिखर गाठता आले.
पुढील सहा वर्षात जुन्या पेन्शन योजनेचा शिक्षकांचा प्रश्न शंभर टक्के मार्गी लावणार आहे. जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत वित्त मंत्रालयामार्फत अभ्यास सुरू आहे. योजना पुन्हा कार्यान्वित करताना सरकारच्या तिजोरीवर किती भार पडेल व ती कशा प्रकारे लागू करता येईल याचा परिपूर्ण अभ्यास झाल्यानंतर पेन्शन योजनेची घोषणा केली जाईल, असे आमदार म्हात्रे यांनी सांगितले.