
पान एक-पशुखाद्याच्या ट्रकमधून दारु वाहतूक
८०९२६
पान एक
पशुखाद्याच्या ट्रकमधून दारूची वाहतूक
करुळमध्ये कारवाई; ट्रकसह जप्त केला १७ लाख रुपयांचा मुद्देमाल
सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. ६ ः पशुखाद्याच्या ट्रकमधून साताऱ्याच्या दिशेने विनापरवाना साडेपाच लाखांची दारू वाहतूक करणारा ट्रक वैभववाडी पोलिसांनी पकडला. ही कारवाई काल (ता. ५) रात्री ९.३० वाजता करुळ तपासणी नाक्यावर केली. ट्रकसह १७ लाख ३५ हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. याप्रकरणी ट्रक चालक आबासो राजाराम बाबर (रा. दाधोली, ता. पाटण, जि. सातारा) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्याला आज न्यायालयात हजर केले.
याबाबत अधिक माहिती अशी, करुळ तपासणी नाक्यावर रविवारी (ता. ५) रात्री ये-जा करणाऱ्या वाहनांची पोलिस कॉन्स्टेबल हरिश्चंद्र जायभाय तपासणी करीत होते. या दरम्यान रात्री ९.३० च्या सुमारास वैभववाडीहून (केए २२ २६२४) कोल्हापूरच्या दिशेने जात असलेला ट्रक तपासणी नाक्यावर आला. त्याला तपासणीसाठी जायभाय यांनी थांबवले. ट्रकचालक आबासो बाबर याच्याकडे तपासणीसाठी कागदपत्रांची मागणी केली. यावेळी ट्रक चालकाने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर गाडीची तपासणी करताना ट्रकचा हौदा जाड ताडपत्री टाकून दोरीच्या साह्याने बांधून घेतला होता. जायभाय यांना याबाबतचा संशय आल्यामुळे त्यांनी पोलिस निरीक्षक अमित यादव यांना संबंधित घटनेची तत्काळ माहिती दिली. त्यानंतर वैभववाडी पोलिस स्थानकातून उपनिरीक्षक अमोल पाटील व कॉन्स्टेबल कृष्णात पडवळ यांना तपासणी नाक्यावर पाठविण्यात आले. तेथून ट्रक चालकासह ट्रक वैभववाडी पोलिस स्थानकात आणला. पंचाच्या समक्ष ट्रकचा हौदा उघडण्यात आला. हौद्यात मागच्या बाजूला पशुखाद्य भरलेले होते. पशुखाद्यांची पोती बाजूला केली असता आतमध्ये दारूचे लेबल असलेले बॉक्स सापडले. बॉम्बे रियल व्हिस्कीचे ४ लाख ७० हजार ८८० रुपयांचे एकूण ३२७ बॉक्स सापडले. दुसऱ्या ४९ बॉक्समध्ये ७५० मिलीच्या ब्लूमाल्ट रॉयल व्हिस्कीची ६४ हजार ८८० रुपये किमतीची दारू सापडली. अशी एकूण ५ लाख ३४ हजार रुपयांची दारू ट्रकमध्ये होती. पोलिसांनी दारूसह १२ लाख रुपयांचा ट्रक ताब्यात घेतला आहे. या प्रकरणी ट्रक चालक आबासो राजाराम बाबर याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास वैभववाडी पोलिस निरीक्षक अमित यादव करीत आहेत.