क्रिकेट लीगमध्ये सातेरी-नेमळे ‘चॅम्पियन’

क्रिकेट लीगमध्ये सातेरी-नेमळे ‘चॅम्पियन’

80925
निरवडे ः विजेत्या सातेरी नेमळे संघाला गौरविताना माजी आमदार प्रमोद जठार आदी.


क्रिकेट लीगमध्ये सातेरी-नेमळे ‘चॅम्पियन’

निरवडेतील स्पर्धा; बांदा उपविजेता; रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सावंतवाडी, ता. ६ ः युवा जनसेवा संघ, निरवडे आयोजित ‘निरवडे चॅम्पियन्स ट्रॉफी २०२३’ अर्थात सावंतवाडी प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सातेरी नेमळे संघाने मोरया बांदा संघावर एकतर्फी विजय मिळवत चषकावर आपले नाव कोरले. तर बांदा संघ उपविजेता ठरला. नो चान्स कारीवडे संघ तृतीय, तर जय माऊली तिरोडा संघ चतुर्थ बक्षिसाचा मानकरी ठरला. संपूर्ण स्पर्धेत आपल्या बहारदार खेळीने रसिकांची मने जिंकणारा सातेरी नेमळे संघाचा अरविंद नेमळेकर मालिकावीर ठरला. डीजेचा थरार, देवगड येथील ढोल-ताशा पथकाची धून, फटाक्यांची आतषबाजी व बक्षिसांची खैरात यांसह हजारो क्रिकेट रसिकांच्या उपस्थितीमुळे ही स्पर्धा यादगार ठरली.
अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मोरया बांदा संघाने मर्यादित ५ षटकांमध्ये ६ गडी बाद २८ धावा केल्या. तर प्रत्युत्तरादाखल २९ धावांचे आव्हान स्वीकारून फलंदाजीस उतरलेल्या सातेरी नेमळे संघाने केवळ ३.५ षटकांत ६ गडी बाद २९ धावा फटकावून लीलया विजय संपादन केला. विजेत्या सातेरी नेमळे संघाला मान्यवरांच्या हस्ते ''निरवडे चॅम्पियन्स ट्रॉफी'' व श्री मूळपुरुष मंदिर बांदिवडेकरवाडी पुरस्कृत रोख ७५ हजार रुपये बक्षिस देऊन गौरविण्यात आले. उपविजेत्या मोरया बांदा संघाला उपविजेता चषक व युवा जनसेवा संघ पुरस्कृत रोख ५० हजार रुपये बक्षीस देऊन सन्मानित केले. तृतीय पारितोषिक विजेता कारिवडे संघ व चतुर्थ विजेता तिरोडा संघाला चषकांसह तिसरे बक्षीस प्रत्येकी ५००० रुपये विभागून देण्यात आले. यावेळी माजी आमदार प्रमोद जठार यांच्यासह वास्को-गोवाचे आमदार कृष्णा उर्फ दाजी साळकर, गोवा-चिकलीम येथील सरपंच कमला यादव, कायदेतज्ज्ञ ॲड. अनिल निरवडेकर, मडगाव प्रिन्सिपल कौन्सिलर तथा दक्षिण गोवा पीडीए डिरेक्टर गिरिष बोरकर, निरवडे सरपंच सुहानी गावडे, उपसरपंच अर्जुन पेडणेकर, सावंतवाडी तालुका खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष तथा निरवडेचे माजी सरपंच प्रमोद गावडे, मळगाव उपसरपंच हनुमंत पेडणेकर, चिकलिम ग्रामपंचायत सदस्य दीपक बांदिवडेकर, मळेवाड उपसरपंच हेमंत मराठे, भरत बांदिवडेकर, बाबल सावळ, प्रभाकर बांदिवडेकर, संजय तानावडे, युवा कार्यकर्ते दिनेश पेडणेकर, बाबल मयेकर, साई तानावडे, भूषण बांदिवडेकर आदी उपस्थित होते. तत्पूर्वी स्पर्धेचे उद्‍घाटन राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोकण विभागीय अध्यक्षा अर्चना घारे-परब यांच्या हस्ते झाले. पाच दिवस चाललेल्या या भव्य क्रिकेट स्पर्धेत खासदार विनायक राऊत, माजी आमदार परशुराम उपरकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते, माजी सभापती चंद्रकांत उर्फ बाळा गावडे आदींनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. स्पर्धेच्या शिल्लक राहिलेल्या रकमेतून निरवडे पंचक्रोशीसाठी लवकरच आरोग्य शिबिराचे आयोजन करणार असल्याची माहिती मंडळाने दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com