
जामसंडेत क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन
80959
जामसंडे ः येथील कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन अग्नीवीर रेणूका राणे यांच्या हस्ते झाले. शेजारी अॅड. अजित गोगटे व अन्य. (छायाचित्र ः संतोष कुळकर्णी)
जामसंडेत क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन
क्रीडा रसिकांची गर्दी; शनिवारपर्यंत रंगणार स्पर्धांचा थरार
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. ६ ः जामसंडे येथील सन्मित्र मंडळातर्फे आयोजित क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन अग्नीवीर रेणुका राणे यांच्या हस्ते आज झाले. राज्यभरातील खेळाडूंची उपस्थिती, क्रीडा रसिकांची गर्दी, ढोल-ताश्यांचा गजर आणि आकाशाला गवसणी घालणारे फटाके उडवून उद्घाटन करण्यात आले. आजपासून राज्यस्तरीय पुरुष खुलागट आणि जिल्हास्तरीय महिला आणि पुरुष गटाच्या स्पर्धांना प्रारंभ झाला. उद्घाटनावेळी विविध मान्यवरांची तसेच क्रीडा रसिकांची उपस्थिती होती. दरम्यान, शनिवारपर्यंत (ता. ११) महोत्सव चालणार आहे.
जामसंडे येथील इंदिराबाई ठाकूर क्रीडानगरीत सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचे रेणुका राणे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने उद्घाटन झाले. क्रीडानगरीत चार मैदाने तयार केली आहेत. राणे यांच्या हस्ते क्रीडाध्वज फडकवण्यात आला. यावेळी अभिनेत्री रुची नेरुरकर (बयो), हेमा कुळकर्णी, सायली घारे, पूर्वा केतकर, स्पर्धा आयोजन समिती कार्याध्यक्ष तथा माजी आमदार अॅड. अजित गोगटे, जिल्हा बँक संचालक प्रकाश बोडस, भाजप तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर, माजी सभापती सुनील पारकर, प्रकाश गोगटे, नगरसेवक शरद ठुकरुल, नगरसेविका प्रणाली माने, तन्वी चांदोस्कर, मंडळाचे अध्यक्ष राजा भुजबळ, कार्यवाह चंद्रकांत पाटकर, आंतरराष्ट्रीय पंच राजेंद्र अनभवणे, स्पर्धा निरीक्षक प्रवीण सावंत, पंचप्रमुख विद्याधर घाडी आदी उपस्थित होते. महोत्सवामध्ये राज्यस्तरीय पुरुष (निमंत्रित खुलागट कबड्डी स्पर्धा), जिल्हास्तर पुरुष व महिला (निमंत्रित) खुलागट कबड्डी स्पर्धा बुधवारपर्यंत चालतील. दरम्यान, स्पर्धेच्या ठिकाणी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर गावडे यांनी केले.
----
स्पर्धांवर एक नजर
जिल्हास्तर कुस्ती स्पर्धा बुधवारी (ता. ८), जिल्हास्तर हॉलीबॉल स्पर्धा शुक्रवारी (ता. १०), जिल्हास्तर कॅरम स्पर्धा शनिवारी (ता. ११) घेण्यात येणार आहेत. ढोल-ताश्यांच्या गजरात, शालेय विद्यार्थ्यांच्या लेझिमच्या तालावर मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. राज्यस्तरीय स्पर्धेत १५ संघ, जिल्हास्तरीय पुरुष गटाच्या कबड्डी स्पर्धेत १६ संघ, तर महिलांचे ८ संघ सहभागी आहेत. कुस्ती स्पर्धेमध्ये सुमारे १२० स्पर्धक, कॅरम स्पर्धेमध्ये सुमारे ८० स्पर्धक, तर हॉलीबॉल स्पर्धेत १६ संघ सहभागी होणार आहेत.