
बांधकरवाडीतील टॉवर अखेर कार्यान्वित
80990
कणकवली : शहरातील बांधकरवाडी येथील टॉवर कार्यान्वित झाल्याने मोबाईल ग्राहकांची गैरसोय दूर झाली आहे.
बांधकरवाडीतील टॉवर अखेर कार्यान्वित
कणकवली ता.७ : शहरातील बांधकरवाडी परिसरात उभारण्यात आलेला नवा टॉवर कार्यान्वित झाला आहे. त्यामुळे गेले सव्वा महिना ठप्प झालेली मोबाईल सेवा पुन्हा कार्यान्वित झाल्याने मोबाईल ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
शहरातील रेल्वे स्थानक परिसरातील टॉवर मुदत संपल्याने सव्वा महिन्यापूर्वी बंद करण्यात आला होता. या टॉवरवरून एअरटेल अाणि व्होडाफोनची सेवा दिली जात होती. टॉवर बंद झाल्याने बांधकरवाडी, वरचीवाडी, परबवाडी, कनकनगर या भागातील एअरटेल आणि व्होडाफोन कंपन्यांची सेवा ठप्प झाली होती. शहरातील इतर भागात येऊन येथील ग्राहकांना नातेवाईकांशी संपर्क साधावा लागत होता.
रेल्वे स्टेशन परिसरात नवीन टॉवर उभारणीसाठी शिवसेनेचे युवा जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, नगराध्यक्ष समीर नलावडे, नगरपंचायत गटनेते संजय कामतेकर यांनी प्रयत्न सुरू केले होते. यात बांधकरवाडी दत्तमंदिर परिसरातील जागा निश्चित करण्यात आली. त्यानंतर गेले आठ दिवस टॉवर उभारणी आणि सिग्नल यंत्रणा जोडणीचे काम सुरू करण्यात आले होते. कालपासून येथील टॉवर कार्यान्वित करण्यात आला. त्यामुळे या परिसरातील मोबाईल ग्राहकांची गैरसोय दूर झाली आहे. दरम्यान दत्तमंदिर येथील टॉवर तात्पुरत्या स्वरूपातील आहे. या भागातच अन्य एक जागा टॉवर उभारणीसाठी दिली आहे. तेथे लवकरच टॉवर उभारणीचे काम सुरू होऊन येथील ग्राहकांची गैरसोय कायमस्वरूपी दूर होईल अशी माहिती नगरपंचायत गटनेते संजय कामतेकर यांनी दिली.