वणव्यासमोर बळीराजा हतबल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वणव्यासमोर बळीराजा हतबल
वणव्यासमोर बळीराजा हतबल

वणव्यासमोर बळीराजा हतबल

sakal_logo
By

81063
बांदा ः वणव्यात काजू बागा होरपळून असे नुकसान होते.

वणव्यासमोर बळीराजा हतबल

जिल्ह्यातील स्थिती; कोट्यवधीचे नुकसान होऊनही मुस्कटदाबी

तुषार सावंत ः सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. ७ ः जिल्ह्यात वणव्यांमुळे दरवर्षी कोट्यावधीच्या बागायती, नैसर्गिक संपत्ती, मालमत्तांचे नुकसान होते; मात्र हे वणवे मानवनिर्मित की नैसर्गिक हे शोधणे कठीण असते. त्यातच अशा आपत्तीत शासनाकडून मदतीचा हात देण्याची ठोस तरतूदच नसल्याने अनेक शेतकऱ्यांचे यात मोठे नुकसान होते. अलिकडे जिल्हा परिषदेकडून थोडीफार मदत मिळत असली तरी शासनस्तरावरुन भरपाई मिळत नसल्याने अशा घटनांमध्ये यंत्रणेकडे जाणेही टाळले जाते. यात होणारे नुकसान मात्र शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या हादरवणारे असते.
जंगलमय भागात वणवा पेटणे ही एक नैसर्गिक घटना असते; मात्र अलीकडच्या काळात बागायती क्षेत्रात वणवे लागण्याचे प्रमाण वाढले आहे. यात काजू, आंबा याचे नुकसान मोठ्या प्रमाणात होते. या आगीचे बहुतांश वेळचे कारण मानवनिर्मित असते. नुकसान मात्र रक्त आटवून बागायती उभी केलेल्या शेतकऱ्यांचे होते.
जिल्ह्यात जानेवारीनंतर थंडीचा पारा उतरल्यावर जंगलात आणि लगतच्या माळरानावर वणवे पेटण्याच्या घटना घडतात. यातून वनसंपदेचे मोठे नुकसान होते. बरचद्या याचे कारण शॉर्टसर्किट सांगितले जाते. काहीवेळा पूर्ववैमनस्यातून बागायतीला आगी लावण्याचे प्रकारही घडतात. यात नुकसान मात्र कोट्यवधीच्या घरात होत असते. सध्या पालापाचोळा आणि गवत सुकले आहे. काजू, आंबा बागायदार आपल्या बागेची राखण करतात; पण भर दुपारच्यावेळी आग लावली गेली किंवा लागली तर ती थोपवणे कठिण बनते. अशा आगीपासून रक्षणासाठी बागायतीतील गवत काढले जाते; मात्र अलिकडे गवत काढण्यासाठी सऱ्हास ग्रासकटरचा वापर केला जातो. यात गवताचे मुळ नष्ट होत नाही. त्यामुळे गवत काढूनही आग थोपवणे कठिण बनते.
वणवे सऱ्हास जंगलमय भागात, माळरानावर लागतात. त्याठिकाणी जायला रस्ता नसतो. यामुळे आग विझवण्यासाठी तेथे बंबं पोहचू शकत नाही. शिवाय जिल्ह्यात अग्निशमन बंबांची संख्याही मर्यादीत आहे. माळरानावर पाण्याचीही उपलब्धता नसते. त्यामुळे भडकलेली आग उघड्या डोळ्यांनी पाहण्यापलिकडे शेतकऱ्यांसमोर पर्याय नसतो. वर्षानुवर्षेचे हे संकट आहे. अलिकडच्या कालावधीच जिल्ह्यात वणवे लागण्याचे प्रमाण वाढले आहे. शासनाकडून अशा घटनांमध्ये भरपाईची थेट तरतूद नाही. यामुळे नुकसाग्रस्त महसूल किंवा कृषी विभागाकडे जाणे टाळतात. अचानक लागलेल्या आगीत नुकसान झाल्यावर काही वेळा शेतकरी पोलिसात तक्रार दाखल करतात; पण पोलिस केवळ अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल करुन थांबतात. अंदाजे नुकसानीचा आकडा दिला जातो. या तक्रारीची पोलिसही फारशी दखल घेत नाहीत.
---
पण कृषी विभागाचे काय?
विजेच्या तारांच्या घर्षणामुळे आग लागली तर त्याचा पंचनामा होतो; पण कृषी विभागाकडून जळालेल्या बागायतीच्या नुकसानीचा अंदाज घेण्यासाठी कोणताही मोजमापाचा निकष शासन दरबारी नाही; पण वीज तारांमुळे नुकसान झाल्यास केवळ ऊस शेतीसाठी महावितरणकडून भरपाई दिली जाते; मात्र आंबा, काजूसाठी तशी तरतूद नाही. केवळ नैसर्गिक संकटात विमा भरला असल्यास निकषाच्या आधारावर भरपाई दिली जाते. यामुळे जिल्ह्यातील काजू, आंबा बागायदारांसमोर मोठ संकट आहे. अलिकडे जिल्हा परिषद काही प्रमाणात मदतीचा हात देते; मात्र त्यालाही मर्यादा आहेत. अशा आगीत अनेक वर्षे कष्ट करुन उभ्या केलेल्या बागा उद्ध्वस्त झाल्यास शेतकऱ्यांचे मात्र आयुष्यभराचे नुकसान होते.
----------
वणव्याचे संकट
* स्थानिक वनस्पती, वन्यजीव आणि त्यांच्या अधिवासावर घाला
* वृक्ष, वेली, झुडूपांच्या बिया जळाल्याने जैवविविधतेवर दुरगामी परिणाम
* असंख्य पक्षी, सस्तन प्राणी, सरीसृप, उभयचर, त्यांची अंडी, पिल्ले होरपळतात
* जमिनीच्या वरच्या थरातील उपयुक्त जीवाणू नष्ट झाल्यास सुपिकतेवर परिणाम
* भाजल्यामुळे टणक झालेल्या वनजमिनीत पावसाचे पाणी न मुरता वाहून गेल्याने भूजलाचे पुनर्भरण थांबते
* भारताच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयक संसदीय समितीने २०१६ मध्ये दिलेल्या अहवालानुसार भारतातील वणव्यांचे प्रमाण ५५ टक्क्यांनी वाढले
* महाराष्ट्रात विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्रात वणव्यांचे प्रमाण जास्त
* वणवे रोखण्यासाठी जनप्रबोधन आवश्यक
* संयुक्त वणवा प्रतिबंधक कृती दल स्थापणे आवश्यक
* गाव किंवा शहरांप्रमाणेच वनजमिनीसाठी एक अग्निशमन यंत्रणा असणे गरजेचे
* अग्निशमन व्यवस्थापनाच्या बाबतीत विविध सरकारी यंत्रणांमध्ये योग्य समन्वय हवा
------------
कोट
नैसर्गिक आपत्तीत झालेल्या नुकसानीची शासनाकडून भरपाई दिली जाते. त्याचे निकष निश्चित केले आहेत; मात्र मानवनिर्मित आपत्तीला कोणतीही मदत शासनाकडून केली जात नाही. तशी तरतूदही नाही. शेतकऱ्याचा किंवा त्यांच्या जनावरांचा मृत्यू नैसर्गिक आपत्ती काळात झाला तरीही मदत करता येते.
- रमेश पवार, तहसिलदार, कणकवली
-----------
विजेच्या तारांच्या घर्षणामुळे अथवा ट्रान्सफॉर्मरलगत उडालेल्या ठिणगीमुळे ऊस शेतीचे नुकसान झाल्यास महावितरणकडून भरपाई दिली जाते. यासाठी उसाचा उतारा लक्षात घेतला जातो. कारखान्यात ऊस गेल्यानंतर तेथील उतारा किती आहे, यावर नुकसानीची रक्कम ठरते. यासाठी विभागस्तरावर अधिकारी पंचनामा करतात.
- बाळासाहेब मोहीते, कार्यकारी अभियंता, महावितरण