
कलंबिस्त हायस्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात
81061
कलंबिस्त : येथे स्नेहसंमेलन कार्यक्रमात मार्गदर्शन करताना प्रा. रुपेश पाटील.
कलंबिस्त हायस्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात
मान्यवरांची उपस्थिती ः गुणदर्शनपर कार्यक्रमांनी रसिक मंत्रमुग्ध
सावंतवाडी, ता. ७ ः तालुक्यातील कलंबिस्त पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित कलंबिस्त हायस्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात झाला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोकण विभागीय महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम झाला.
यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे प्रसिद्ध व्याख्याते प्रा. रुपेश पाटील, संस्थाध्यक्ष शिवाजीराव सावंत, उपाध्यक्ष गोविंद लिंगवत, सचिव यशवंत राऊळ, सहसचिव चंद्रकांत राणे, संचालक लाडजी राऊळ, वसंत सावंत, चंद्रकांत राऊळ, शशिकांत धोंड, कलंबिस्त सरपंच सपना सावंत, राष्ट्रवादी काँग्रेसच्या रत्नागिरी पक्षनिरीक्षक चित्रा बाबर-देसाई, शिरशिंगे सरपंच दीपक राऊळ, रवींद्र म्हापसेकर, मुख्याध्यापक अभिजीत जाधव आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमास उपस्थित असलेला तुळस (ता. वेंगुर्ले) येथील छोटा अवलिया विजय तुळसकर याची प्रा. पाटील यांनी बौद्धिक चाचणी घेणारी छोटेखानी मुलाखत घेतली. यात त्याने हार्मोनियम वादनाची कला सादर करून रसिक प्रेक्षकांची उत्स्फूर्त दाद मिळविली. कलंबिस्त हायस्कूलतर्फे त्याचा सत्कार करण्यात आला. प्रा. पाटील यांनी उपस्थित पालक, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आजच्या स्पर्धात्मक युगात चांगला माणूस बनण्याची स्पर्धा मोठी आहे. आदर्श व सुसंस्कृत समाजासाठी पालकांनी आपल्या पाल्याशी सुसंवाद साधावा, असे आवाहन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा घारे-परब यांनी मुलांना घडविण्यात पालकांची भूमिका महत्त्वाची आहे, असे सांगत कलंबिस्त हायस्कूलच्या विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धांतील यशाबद्दल गौरवोद्गार काढले व शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व अहवाल वाचन मुख्याध्यापक अभिजीत जाधव यांनी, सूत्रसंचालन किशोर वालावलकर यांनी केले. आभार प्रदर्शन विलास चव्हाण यांनी केले. पारितोषिक वितरणानंतर प्रशालेच्या विद्यार्थ्यांचा ‘कलादर्पण’ हा विविध गुणदर्शनपर बहारदार कार्यक्रम सादर झाला.