
तारफा नृत्यावर आयोजकांनी धरला फेर
rat०७२३.txt
बातमी क्र..२३ (टुडे पान २ साठीमेन)
(टीप- यापूर्वी पाठवलेले मेन खाली घेऊन ही बातमी मेन करावी.)
फोटो ओळी
-rat७p१७.jpg-
८१०६५
चिपळूण ः लोककला महोत्सवात लोकनृत्यावर धरलेल्या फेऱ्याने उपस्थितांनीही ठेका धरला.
-ratchl७११.jpg-
८१०७७
चिपळूण ः महोत्सवात लोककला सादर करताना कलाकार मंडळी
--
तारफा नृत्यावर आयोजकांनी धरला फेर
लोककला महोत्सव ; कर्मविधीत बंदिस्त कुंभार क्रिया पहिल्यांदा रंगमंचावर
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ७ ः येथील श्री जुना कालभैरव मंदिरअंतर्गत (कै.) बापू बाबाजी सागावकर मैदानावर उभारण्यात आलेल्या सह्याद्री नगरात सुरू असलेल्या लोककला महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी सोमवारी विविध प्रकारच्या लोककला पाहाण्याची संधी जिल्हावासियांना मिळाली. तारफा नृत्य हे वैशिष्ट्यपूर्ण ठरले. पालघर जिल्ह्यातील तलासरी येथील आदिवासी बांधवांनी तारफा नृत्याने मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांच्यासह आयोजक, उपस्थितांना नृत्य करत ठेका धरायला लावला. मुख्याधिकाऱ्यांसह सारेच रंगमंचावर येऊन आदिवासी बांधवांसमवेत तारफा वाद्यावर भार हरखून नाचले.
कार्यक्रमातील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कुंभार क्रिया.लोककला महोत्सवाने ही क्रिया पाहण्याची संधी नटवर्य शंकर घाणेकर रंगमंचावर उपलब्ध करून दिली. कुंभार क्रिया हा विधी माणूस मेल्यानंतर केला जातो. कुंभार क्रिया केली नाही तर त्याला मोक्ष मिळत नाही, अशी भावना आहे. कुंभार समाजातील ही मंडळी ही क्रिया आजवर जपून आहेत. याला डाक घालणे असेही म्हणतात.
गुहागर तालुक्यातील खामशेत येथील दौलत पालकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कुंभार विधी प्रथमच जाहीरपणे रंगमंचावर सादर केला. लांजा तालुक्यातील केळवली येथील शाहीर मधुकर पंदेरे यांनी भेदिक शाहिरी सादर केली. त्यांचे सुपुत्र शाहीर तुषार पंदेरे यांनी पोवाडा सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. पालघर जिल्ह्यातील तलासरी येथील तारफा नृत्याने कालचा दिवस अक्षरशः गाजवला. तारफा वाजवणारा मुख्य आणि त्याच्याभोवती गोल करून नृत्य करणाऱ्या युवती व तरुण मंडळी यांनी उपस्थितांना आपल्या नृत्याने वेड लावले. मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांच्यासह लोककला विभागाचे प्रमुख प्रा. संतोष गोणबरे, योगेश बांडागळे, दिलीप आंब्रे, प्राची जोशी, आदिती देशपांडे, शिवाजी शिंदे, तुकाराम पाटील, मनिषा दामले आदी सर्वांनीच तारफा नृत्यावर फेर धरला आणि हा लोककला महोत्सवाचा परमोच्च बिंदू ठरला. त्यानंतर पालघर येथील घोरनृत्य असेच आगळेवेगळे ठरले. महाराष्ट्राच्या सीमेवर व गुजरातला लागून असलेल्या या आदिवासी बांधवांच्या या लोककलेने दाद मिळवली. दिवसाचा शेवट गोड झाला तो दशावताराने. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तेंडुलकर पारंपरिक दशावतार नाट्य मंडळांनी सादर केलेला दशावतार सर्वांच्या आठवणीत राहील, असा होता.
---------
लोककट्ट्यावर धम्माल
सायंकाळी लोककट्ट्यावरील कार्यक्रमाने सुरवात झाली. चिपळूण तालुक्यातील मांडकी येथील शशिकांत वहाळकर यांनी नमनचा काही भाग सादर केला. माधवी भागवत यांनी जात्यावरच्या ओव्या सादर केल्या. गुहागर तालुक्यातील महिला मंडळांनी पारंपरिक गाणी सादर केली. संस्कृती ग्रुप यांनी गवळणींची जाखडी सादर केली. सखाराम काजवे व कोकरे यांनी बासरीवादन करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. सिद्धिविनायक ग्रुपने सांस्कृतिक गीत सादर केले. संतोष गमरे आणि सहकारी यांनी प्रबोधन गीत सादर केले, तर विजयालक्ष्मी भोसले यांनी मालवणी गजाली सादर केल्या. महाराष्ट्र हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी मुस्लिम गीते सादर करून उपस्थितांना ठेका धरायला लावला.