
फसवणूक प्रकरणी चौघांना सशर्त जामीन
फसवणूक प्रकरणी
चौघांना सशर्त जामीन
सावंतवाडी, ता. ७ ः बनावट दागिने बँकेत ठेवून कर्ज उचल केल्याप्रकरणी जिल्हा न्यायालयाने चौघांची पंधरा हजारांच्या सशर्त जामिनावर मुक्तता केली. याकामी ॲड. परशुराम चव्हाण यांनी काम पाहिले. संबंधितांनी वैभववाडी बँकेत बनावट दागिने ठेवून बँकेची फसवणूक केली होती. या विरोधात तब्बल सात जणांवर गुन्हा दाखल केला होता.
अधिक माहिती अशी की, संशयित साई दिलीप कांबळे, स्नेहा सज्जन नारकर, वैभवी विष्णू पाटील, सौरभ सुभाष गुरव, वसंतराव धनाजीराव पाटील, सचिन सुरेश सुतार, चंद्रकांत शिवराम भिंगार्डे यांनी वैभववाडी येथील बँकेत बनावट दागिने ठेवून पाच लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. याप्रकरणी त्यांच्या विरोधात वैभवववाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार त्यांना अटक करण्यात आली होती. सद्यस्थितीत ते न्यायालयीन कोठडीत होते. त्यातील चौघांची आज जामिनावर मुक्तता करण्यात आली.