पत्रकार वारिसेंच्या अपघाती मृत्यूची चौकशी व्हावी

पत्रकार वारिसेंच्या अपघाती मृत्यूची चौकशी व्हावी

पत्रकार वारिसेंच्या अपघाती
मृत्यूची चौकशी व्हावी
मुख्यमंत्र्यांकडे मागणी; उपविभागीय अधिकाऱ्याना निवेदन
चिपळूण, ता. ८ः रिफायनरीच्या विरोधात वृत्तांकन केलेल्या राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिसे यांचा अपघाती मृत्यू झाला. याबाबत त्यांच्या नातेवाईकांनी संशय व्यक्त केला आहे. या प्रकरणी गृह खात्यामार्फत उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित आरोपीला कठोरात कठोर शासन व्हावे, अशी मागणी चिपळुणातील पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. त्यासाठीचे निवेदन उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन बारी यांना देण्यात आले.
उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन बारी यांच्याशी चर्चा करताना चिपळूणातील पत्रकार बांधव म्हणाले, शासनाने पत्रकार हल्ला विरोधी कायदा लागू केला आहे. मात्र, राज्यात त्याची योग्य अंमलबजावणी होताना दिसत नाही. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून अनेकवेळा समाजहितासाठी चांगल्या वाईट घटनांचे वृत्तांकन केले जाते. अशावेळी पत्रकारांची सुरक्षितता मात्र धोक्यात येते. शासनाने पत्रकारांना संरक्षण व सुरक्षितता मिळण्यासाठी प्राधान्य द्यावे. राज्यात पत्रकारांवर हल्ले, मारहाण, धमक्या, खोटे गुन्हे दाखल करण्याचे प्रमाण वाढले आहे. भारतीय लोकशाहीला हे घातक असून त्यातून समाजात अराजकता निर्माण होणार आहे. त्यामुळे अशा घटनांचे कुणीही समर्थन करू नये. सत्ताधाऱ्यांनी देखील याला वेळीच पायबंद घालण्यासाठी कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने पाऊले उचलावीत. पत्रकारांवरील हल्ल्यांचे प्रमाण वाढले असून याबाबत शासन गंभीर नाही. शासनाचे पत्रकारांच्या सुरक्षिततेसाठी केलेल्या नियोजनाची माहिती द्यावी. अशाप्रकारच्या घटनामध्ये आरोपींना मोक्का कायदा लावण्यात यावा. या घटनेचा सखोल तपास करून संबंधितांवर कठोर कायदेशिर कारवाई करावी, तसे न झाल्यास पत्रकारांच्यावतीने जिल्ह्यात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. डीवायएसपी बारी यांनी या प्रकरणी झालेल्या कारवाईची माहिती दिली. निवेदन देताना नागेश पाटील, सुभाष कदम, सतीश कदम, राजेंद्र शिंदे, राजेंद्रकुमार शिंदे, समीर जाधव, संदीप बांद्रे, महेंद्र सुर्वे, इकलाख खान, महेंद्र कासेकर, संतोष सावर्डेकर, सुशांत कांबळे, राजेश जाधव, मकरंद भागवत, संतोष कुळे, संतोष पिलके, ओंकार रेळेकर, शाहीद खेरटकर आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com