रत्नागिरी- सैन्यदलात अधिकारी होण्यासाठी महत्वाकांक्षा, परिश्रम हवेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी- सैन्यदलात अधिकारी होण्यासाठी महत्वाकांक्षा, परिश्रम हवेत
रत्नागिरी- सैन्यदलात अधिकारी होण्यासाठी महत्वाकांक्षा, परिश्रम हवेत

रत्नागिरी- सैन्यदलात अधिकारी होण्यासाठी महत्वाकांक्षा, परिश्रम हवेत

sakal_logo
By

फोटो ओळी
-rat९p३१.jpg- रत्नागिरी ः मराठा बिसनेसमन फोरमच्या रत्नागिरी शाखेमार्फत आयोजित कार्यक्रमात बोलताना मेजर जनरल (नि.) विजय पवार.


सैन्यदलात अधिकारीपदाची महत्त्‍वाकांक्षा हवी
विजय पवार : मराठा बिसनेसमन फोरमतर्फे व्याख्यानाला गर्दी
रत्नागिरी, ता. ९ ः भारतीय सैन्यदलात अधिकारी म्हणून निवड होणे ही गोष्ट कठीण असली तरी अशक्य नाही; मात्र त्यासाठी प्रबळ महत्त्‍वाकांक्षा, कठोर परिश्रम करण्याची तयारी आणि शारीरिक तंदुरुस्ती या अतिशय महत्त्‍वाच्या गोष्टी आहेत आणि त्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचे आहे, असे प्रतिपादन निवृत्त मेजर जनरल विजय पवार यांनी केले.
मराठा बिसनेसमन फोरमच्या रत्नागिरी शाखेमार्फत हॉटेल विवेक येथे आठवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थी आणि पालकांसाठी आयोजित मार्गदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते. पवार यांनी सोप्या भाषेत आर्मी, नेव्ही आणि वायुदलात अधिकारीपदाच्या संधीबाबत माहिती दिली. याकरिता आपल्या अंगी कोणते गुण असणे गरजेचे आहे हे सांगितले. एनडीए, एनए, टीईएस या प्रवेश परीक्षांचे स्वरूप आणि निवडप्रक्रिया या संदर्भात माहिती दिली. औरंगाबाद आणि नाशिक येथील सैनिक प्रशिक्षण संस्था, तिथे प्रवेश मिळवण्यासाठीची कार्यपद्धती याबाबत उपयुक्त मार्गदर्शन केले.
मराठा समाज हा नेहमीच छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा पुढे चालवत असून सर्व समाजाला आपल्यासोबत घेऊन मदतीचा हात देऊन पुढे जात आहे, असे एमबीएफचे उपाध्यक्ष राजेंद्र सावंत यांनी सांगितले. सैन्यदलातील भरतीसंदर्भात सखोल मार्गदर्शन आणि मूलभूत प्रशिक्षणाची सोय उपलब्ध करून देण्याबाबतच्या मागणीवर मराठा बिझनेसमन फोरमन विचारविनिमय करून धोरणात्मक निर्णय घेणार असल्याचे कार्यकारी सदस्य प्रसाद कदम यांनी जाहीर केले.
या वेळी रत्नागिरीमधील १० माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला. व्यासपीठावर विशेष अतिथी एमबीएफचे संस्थापक अध्यक्ष शशिकांत पवार, भारतीय तटरक्षक दलाचे प्रधान अधिकारी (मेकॅनिकल) प्रकाश वर्मा, प्रधान अधिकारी (रेडिओ) कांबळे, तटरक्षक दलाचे कमांडर निखिल हेब्बाळे उपस्थित होते. मराठा बिसनेसमन फोरमच्या रत्नागिरी शाखेचे अध्यक्ष समीर इंदुलकर यांनी प्रास्ताविक केले. सातशेहून अधिक विद्यार्थी, पालक या वेळी उपस्थित होते. पाहुण्यांची ओळख स्वप्नील साळवी यांनी, सूत्रसंचालन धुंदूर यांनी केले. सचिव कोमल तावडे यांनी आभार मानले.

चौकट १
सैनिकी परंपरा निर्माण व्हावी
इतर जिल्ह्यांच्या तुलनेत रत्नागिरीमधून सैन्यदलात अधिकारी म्हणून भरती होणाऱ्या मुलांची संख्या नगण्य आहे. याचे मुख्य कारण याबाबत आपल्याकडे पुरेशी जागरुकता नाही आणि स्थानिक पातळीवर मूलभूत प्रशिक्षणाच्या सोयी सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे लोकांमध्ये जागरुकता निर्माण व्हावी; तसेच सैन्यदलात काम करण्याची आवड निर्माण व्हावी याकरिता मराठा बिसनेसमन फोरमने कार्यक्रमाचे आयोजन केले. या द्वारे सैनिकी परंपरा निर्माण होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.