नवोदित कथालेखकांसाठी बांद्यात 17 ला कार्यशाळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नवोदित कथालेखकांसाठी बांद्यात 17 ला कार्यशाळा
नवोदित कथालेखकांसाठी बांद्यात 17 ला कार्यशाळा

नवोदित कथालेखकांसाठी बांद्यात 17 ला कार्यशाळा

sakal_logo
By

नवोदित कथालेखकांसाठी
बांद्यात १७ ला कार्यशाळा
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १० ः शिक्षण प्रसारक मंडळ बांदा संचलित येथील गोगटे वाळके महाविद्यालय बांदा आणि साहित्य संस्कृती मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी विभाग आयोजित नवोदित कथालेखकांसाठी कथालेखन कार्यशाळा शुक्रवारी (ता.१७) गोगटे-वाळके महाविद्यालयात आयोजित केली आहे. ही एक दिवसीय कथालेखन कार्यशाळा भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व राजर्षी शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्षानिमित्त आयोजित केली आहे. या कार्यशाळेला विषय तज्ज्ञ म्हणून साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक मराठीतील ख्यातनाम साहित्यिक राजन गवस, आघाडीचे कथालेखक व साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक किरण गुरव, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे मराठी विभाग प्रमुख व समीक्षक प्रा. डॉ. नंदकुमार मोरे, नुकताच साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झालेले नामवंत साहित्यिक प्रा. प्रवीण बांदेकर या कार्यशाळेत मार्गदर्शन करणार आहेत.
कथा हा वाड्मय प्रकार, मराठी कथेची स्थितीगती वाटचाल व स्वरूप, कथेचे प्रवाह, विविध लेखकांचे या वाड्मय प्रकारातील योगदान तसेच कथेची बलस्थाने कोणती असतात. कथेची निर्मिती प्रक्रिया, आशयनिष्ठ कथा कशी लिहावी, विविध भाषिक प्रयोग कथेत कसे करावेत, कथेला प्रारंभ कसा करावा व कथेचे शेवट कसा असावा, भाषाशैली व प्रयोगशील कथा मांडाव्यात याविषयी नवलेखकांना या कार्यशाळेत या तज्ज्ञ व्यक्तींच्या माध्यमातून मार्गदर्शन मिळणार आहे. दिवसभर चालणारी ही कथालेखन कार्यशाळा चार सत्रात होईल. ज्या नवलेखकांना या कार्यशाळेत सहभागी व्हायचे असेल त्यांनी डॉ. एन. डी.कार्वेकर यांच्याशी संपर्क साधून आपली नोंदणी करावी, असे आवाहन शिक्षण प्रसारक मंडळ बांदाचे चेअरमन डी. बी. वारंग आणि प्राचार्य डॉ. गोविंद काजरेकर यांनी केले आहे.