
काळसेतील अपघातप्रकरणी चालकावर गुन्हा
काळसेतील अपघातप्रकरणी
चालकावर गुन्हा दाखल
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १० ः काळसे-हुबळीचा माळ येथे काल (ता.९) झालेल्या गंभीर अपघात प्रकरणी पादचारी महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी डंपर चालक इकलास इस्माईल शेरखान (वय-३३ रा. चंदगड-कोल्हापूर) याच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. इकलास याला पोलिसांनी अटक करून येथील न्यायालयात हजर केले असता सोमवारपर्यत (ता.१३) पोलीस कोठडी सुनावण्यात आली. सहाय्यक सरकारी अभियोक्ता तुषार भणगे यांनी काम पाहिले.
काळसे हुबळीचा माळ येथे भरधाव डंपरने पाच पादचारी महिलांना धडक दिल्याची घटना काल सायंकाळी घडली. यात वृद्ध महिला रुक्मिणी पांडुरंग काळसेकर (वय-६५) यांचा मृत्यू झाला तर अन्य चार महिला गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मृत्युमुखी पडलेल्या रुक्मिणी पांडुरंग काळसेकर यांचे शवविच्छेदन करण्यात आले. मात्र, मृतदेह ताब्यात घेणार नाही असे सांगत काळसे ग्रामस्थ आज सकाळी येथील पोलीस ठाण्यात एकवटले. अपघातास कारणीभूत ठरलेल्या डंपरचा मालक जोपर्यंत येत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे ग्रामस्थांनी स्पष्ट केले आहे. तसेच योग्य प्रकारे गुन्हा नोंद झाला पाहिजे. योग्य कलमांची नोंद झाली पाहिजे. अपघात स्वरूप पाहून कठोर स्वरूपात कारवाई झाली पाहिजे, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली. चालक पूर्णपणे दारूच्या नशेत असल्याचेही प्रत्यक्षदर्शी ग्रामस्थांनी सांगितले. दुपारी उशिरा डंपर मालक आल्यानंतर पोलिसांकडून पुढील कारवाई सुरू होती. नातेवाईकांनी संध्याकाळी मृतदेह ताब्यात घेतला, अशी माहिती ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने देण्यात आली.