वारिशेंचा अपघात नव्हे, घात!

वारिशेंचा अपघात नव्हे, घात!

लोगो ः पत्रकार वारिशे मृत्यू प्रकरण
--
81957
सिंधुदुर्गनगरी : निवासी उपजिल्हाधिकारी सोनाने यांना पत्रकारांतर्फे निवेदन देण्यात आले.


वारिशेंचा अपघात नव्हे, घात!

प्रशासनाला पत्रकारांचे निवेदन; मुख्यालयात निदर्शने, जिल्ह्यात काळ्या फिती लावून काम


सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ११ ः रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिशे यांची झालेली हत्या आणि गेल्या आठ दिवसांत केज, मुखेड, धुळे आदी ठिकाणी पत्रकारांवर झालेले हल्ले किंवा खोटे गुन्हे दाखल करण्याच्या घटनांच्या निषेधार्थ जिल्ह्यातील पत्रकारांनी काल (ता. १०) काळ्या फिती लावून येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी सोनाने यांना निवेदन देऊन संतप्त भावना व्यक्त केल्या. तसेच हा अपघात नसून घात असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.
जिल्ह्यातील सर्व तालुका पत्रकार संघटनांनी काळ्या फिती लावून काम केले. त्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी सोनाने यांना निवेदन दिले. यानिमित्ताने पुन्हा एकदा जिल्ह्यातील पत्रकारांनी एकत्र येत एकजुटीचे दर्शन घडविले. मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने झालेल्या तातडीच्या ऑनलाईन बैठकीत राज्यातील पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्यांसंदर्भात सांगोपांग चर्चा होऊन सर्व पत्रकार, संघटनांना सोबत घेऊन आंदोलन करावे, असा निर्णय घेतला होता. त्यानुसार जिल्ह्यातील तालुका पत्रकार संघटनांशी चर्चा करून या आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला. या आंदोलनात जिल्हाध्यक्ष उमेश तोरस्कर, सचिव देवयानी वरस्कर, परिषद सदस्य गणेश जेठे, नंदकिशोर महाजन, गजानन नाईक, वसंत केसरकर, संतोष वायंगणकर, अभिमन्यू लोंढे, महेश सरनाईक, बाळ खडपकर, संतोष राऊळ, हरिश्चंद्र पवार, रवींद्र गावडे, मुख्यालय अध्यक्ष संजय वालावलकर आदी सहभागी झाले होते.
निवेदनात म्हटले आहे की, सभ्य आणि सुसंस्कृत महाराष्ट्रात निर्भीड पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांचा आवाज कायमचा बंद केला जातो. पत्रकारांवर हल्ले करून किंवा त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. पत्रकार संरक्षण कायदा आहे; मात्र या कलमाखाली गुन्हे दाखल करायलाही टाळाटाळ केली जाते. त्यामुळे महाराष्ट्रात पत्रकारांना निर्धोकपणे काम करणे कठीण झाले आहे. या घटना सातत्याने वाढत असल्याने पत्रकारांमध्ये भीतीची भावना निर्माण होत आहे. याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी तसेच शशिकांत वारिशे यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी काल जिल्हाभरातील पत्रकारांनी काळ्या फिती लावून काम केले.
---
‘घातपात असल्याचे उघड’
वारिशे यांचा अपघातात गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला; मात्र तो अपघात नसून घातपात असल्याचे उघड होत आहे. गाडीने ठोकर दिल्याने झालेला मृत्यू हा योगायोग नसून तो कट रचून केलेला खूनच असल्याने या घटनेचा जिल्ह्यातील पत्रकार तीव्र शब्दांत निषेध, असे निवेदनात नमूद केले आहे. जिल्हा मुख्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी सोनाने यांना जिल्हा मुख्यालय समितीनेही निवेदन दिले. यावेळी मुख्यालय पत्रकार समिती अध्यक्ष संजय वालावलकर, बाळ खडपकर, संदीप गावडे, विनोद दळवी, मनोज वारंग, नंदकुमार आयरे आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com