Chiplun Water issue
Chiplun Water issueSakal Digital

चिपळूण : ...तरच हर घर नलसे जल हे उद्दिष्ट्य साध्य होईल!

नागेश पाटील, चिपळूण

ग्रामीण भागातील लोकांना मुबलक पाणीपुरवठा होण्यासाठी यापूर्वी जलस्वराज्य, राष्ट्रीय पेजयलसारख्या अनेक योजना शासनाच्या माध्यमातून राबवण्यात आल्या; मात्र या योजनेतून पिण्याचे पाणी थेट घरात पोहोचले नव्हते. जलजीवनमधून संपूर्ण गावचा तांत्रिक अभ्यास करून प्रत्येक घरात मुबलक पाणीपुरवठा केला जात आहे. नेहमी वंचित राहणाऱ्या धनगरवाड्यांची पाण्याची तहान भागणार आहे. यासाठी आवश्यक निधीची कमरताही भासणार नाही. त्यामुळे जलजीवनच्या पाणीयोजनांनी कोटीच्याकोटी उड्डाणे घेतली. गेल्या दहा-बारा वर्षानंतर आता जलजीवन मिशन रूपाने गावागावात पाणीयोजना साकारत असल्याने पाणीटंचाईची समस्या मिटण्यास मदत होणार आहे. कोट्यवधीच्या या योजना झाल्या तरी त्या नियमित सुरू राहण्याचे आव्हान आहे. वाढती थकित पाणीपट्टी हेच योजना बंद पडण्याचे प्रमुख कारण आहे. याकरिता ग्रामस्थांनीही जबाबदारीचे भान ठेवत पाणीपट्टी वेळेत जमा करून आपले कर्तव्य बजावण्याचीही गरज आहे. तसे झाले तरच हर घर नलसे जल हे उद्दिष्ट्य साध्य होईल.

...तरच हर घर नलसे जल

100 कोटीच्या जलजीवनमधून चिपळुणात पाण्याची समृद्धी येणार आहे. जलजीवन मिशनच्या माध्यमातून चिपळूण तालुक्यात 162 योजना साकारत आहेत. 5 कोटी रुपयेपर्यंतच्या पाणीयोजनांच्या अमंलबजावणीची जबाबदारी जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाकडे तर त्यापेक्षा जास्त खर्चाच्या योजना महाराष्ट्र जीवन प्राधीकरण (एमजीपी) विभागाकडे आहेत. त्यानुसार पाणीपुरवठा विभागाकडे 162 व एमजीपीकडे 26 योजना अंबलबजावणीची जबाबदारी आहे. सध्याच्या स्थितीला केवळ 2 गावातील योजनांचे अंदाजपत्रक करण्याचे काम बाकी आहे. या योजनांवर 97 कोटी 82 लाखाचा खर्च केला जाणार आहे. तालुक्यातील 128 योजनांचे अंदाजपत्रक तयार झाले असून, 125 योजनांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली तर 102 योजनांना प्रत्यक्ष काम सुरू करण्याचे कामाचे आदेश बजावले आहेत. यातील 58 कामे सुरू झाली असून, 23 कामांना लाईन आऊट देण्यात आले आहे. एकूण 81 योजना या प्रगतीपथावर आहेत.

Chiplun Water issue
Chiplun Water issueSakal Digital

थेट घरात पाणी

यापूर्वी राबवण्यात आलेल्या जलस्वराज्य अथवा राष्ट्रीय पेयजल योजनेत थेट ग्रामस्थांच्या घरात पाणीपुरवठा होत नव्हता. वाडीत ठिकठिकाणी उभारलेल्या स्टॅण्ड पोस्टवर जाऊन लोकांना पाणी भरावे लागायचे. प्रती व्यक्ती 40 लिटर पाणी मिळायचे. आताच्या जलजीवन मिशनमध्ये प्रत्येकाच्या घरी नळाद्वारे पाणी पोहोचवले जाणार आहे. प्रती माणसी 55 लिटर पाणी दिवसाकाठी मिळणार आहे. ज्यांना यापूर्वी नळ कनेक्शन मिळालेले नाही त्यांनाही नव्याने ते मोफत देण्यात येणार आहे. पाणीयोजना म्हटलं की, भविष्यात त्याच्या दुरुस्तीचा खर्च येणारच. त्यासाठी योजनेच्या 5 टक्के लोकवर्गणीचा हिस्सा ग्रामस्थांना भरावा लागणार आहे. यापूर्वी लोकवर्गणी भरण्यास लोकांचा प्रतिसाद मिळत नव्हता. अनेक ठिकाणी ही रक्कम ठेकेदाराकडूनच भरली जात होती.

थकित पाणीपट्टीमुळेच पाणीयोजना तोट्यात

पाणीपुरवठा योजनांवर कोट्यवधीचा खर्च होतो. पाणीयोजनांवर काम करणारे कर्मचारी, दुरुस्ती खर्च, वीजबिल आदींसह पाणी शुद्धीकरणासाठी आवश्यक बाबींचा खर्च पकडून ग्रामपंचायतीकडून पाणीपट्टी आकारली जाते. तालुक्यात सरासरी दीड ते दोन हजारापर्यंत पाणीपट्टीची आकारणी होते. पाणीपट्टी थकित राहिल्यास त्याचा योजनेवर परिणाम होतो. पाणीपट्टी थकित राहिलेल्या योजनाच बंद पडतात ही वस्तुस्थिती आहे. थकित रक्कम वाढली तरी लोकांचा रोष वाढू नये म्हणून अनेकदा ग्रामपंचायती अॅडजेस्टमेंट करून पाणीयोजना सुरू ठेवण्यावर भर देतात.

खासगी योजनाही आदर्शवत

तालुक्यातील ग्रामीण भागात शासनाच्या माध्यमातून पाणीयोजना राबवल्या जातात; मात्र काही ठिकाणी ग्रामस्थांनी संघटित होत वाडीपुरत्या खासगी पाणीयोजना राबवल्या आहेत. शासकीय योजनेतून काम झाल्यानंतर 4 ते 5 वर्षानंतर दुरुस्तीची कामे निघू लागतात. 15 वर्षे झाली की योजना कालबाह्य होण्यास सुरवात होते. या तुलनेत खासगी योजना 22 वर्षे नियमित सुरू असल्याची उदाहरणे आहेत. चिपळूण शहरालगतच्या धामणवणे खोतवाडी येथे जीवनधारा ग्रामीण विकास मंडळाच्या माध्यमातून गेली 22 वर्षे खासगी स्वरूपात पाणीयोजना चालवली जात आहे. मंडळ वर्षाकाठी 1920 रु. पाणीपट्टी घेत असले तरी लोकांना नियमितपणे मुबलक पाणी पुरवते. दुरुस्ती निघाली तरी ती त्वरित होते. खर्चात काटकसर केली जाते.

महसूली गावनिहाय पाणीयोजना

जलजीवन मिशन योजनेतून पाणीयोजना राबवताना महसूली गावनिहाय योजना राबवण्यावर भर दिला. वाडीनिहाय योजना करावयाच्या झाल्यास साठवण टाकीसह विहिरींचा खर्च वाढून एकूण खर्चात वाढ होते. त्यासाठी महसुली गावनिहाय योजना राबवण्याचे शासनाचे आदेश आहेत.

जलजीवन मिशनची कोटीच्याकोटी उड्डाणे

या योजनेतून पाणीयोजना राबवताना गावास आवश्यक असलेल्या विहिरी, साठवणटाकी, जलवाहिनी आदी बाबींचा विचार झाला आहे. जलवाहिनीसाठी एसचडीपी पाईप वापरला जात आहे. त्यामुळे अनेक गावातील पाणीयोजनांचा खर्च हा साधारणः 30 ते 40 लाखापासून 2 कोटीपर्यंतचा आहे. सावर्डे कासारवाडीसाठी तर 17 कोटीची योजना एमजीपीकडून होणार आहे. उद्भव विहिरीपासून साठवण टाकीचे अंतर, लांब पल्ल्याच्या जलवाहिन्या, विहिरी, साठवण टाकी आणि वाढलेल्या महागाईच्या दरामुळेही प्रामुख्याने खर्चात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

Chiplun Water issue
Chiplun Water issueSakal Digital

योजनेसाठी लोकांचे प्रबोधन

गावात योजना साकारण्यापूर्वी पाणीपुरवठा असो अथवा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालय, या दोन्हीकडून संबंधित गावात ग्रामसभा घेत पाणीयोजनांची माहिती दिली जात आहे. योजनेसाठी ग्रामस्थांच्या मागण्या, तेथील अडचणी, कार्यरत असलेल्या योजनांची स्थिती, त्यात खराब झालेल्या बाबी आदींवर चर्चा होत आहे. योजनेविषयीची सविस्तर माहिती दिल्यानंतर पाणीयोजनेचे काम सुरू केले जाते.

काम सुरू करताना योजनांच्या माहितीचे फलक

प्रामुख्याने अनेक ठिकाणी शासकीय विकासकामे झाल्यानंतर तिथे कामाची माहिती असणारे फलक लागलेले दिसतात; मात्र जलजीवन मिशनमध्ये काम सुरू करतानाच योजनेचा एकूण खर्च, ठेकेदार कोण याची माहिती देणारे फलक लावले जात आहेत. झालेल्या कामाचे जिओ टॅगिंगदेखील होत आहे.

6 गावांनी नाकारली पाणीयोजना
गावात पाणीपुरवठ्याची समस्या नसल्याने तालुक्यातील 6 महसुली गावांनी जलजीवनमधून पाणीयोजना नाकारली आहे. यामध्ये मांडवखरी, ताम्हणमळा, मजरेकाशी, कालुस्ते करंजीकर मोहल्ला, मजरेगोवळ आणि शिरवली या गावांचा समावेश आहे.

जलजीवनमध्ये ग्रामसमित्यांचा अंकुश संपला

यापूर्वी गावात पाणीयोजना राबवताना ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा स्वच्छता समितीच्या माध्यमातून योजना राबवल्या जात होत्या. ही समिती ठेकेदार नेमून कामे देत होती; मात्र काही गावात या समित्यांचा गैरकारभार उजेडात आला. तालुक्यातीलच बोरगांवमध्ये पाणीयोजनेत 20 लाखाचा अपहार झाल्याचे निदर्शनास आले. चिवेलीत ठेकेदाराने नवीन जलवाहिनी टाकली नसल्याचे दीर्घकाळानंतर उघड झाले होते. या बाबींचा विचार करून शासनाने योजना अंमलबजावणीची जबाबदारी शासकीय यंत्रणेवर सोपवली. पाणीपुरवठा अथवा एमजीपीवर सोपवली आहे. योजना पूर्ण झाल्यावर मात्र ती ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित केली जात आहे.

अनेक योजना या 20 ते 25 वर्षापूर्वीच्या आहेत. या योजनेतील जलवाहिन्या बदलण्यासाठी निधीची कमतरता होती; मात्र जलजीवनमध्ये निधीची कसलीही कमतरता नाही. जीर्ण झालेल्या जलवाहिन्या नव्याने टाकल्या जात आहेत. एचडीपी पाईप दीर्घकाळ टिकाऊ असल्याने योजना दीर्घकाळ टिकण्यास मदत होणार आहे.
- मयूर खेतले, सरपंच मुंढेतर्फे चिपळूण

जलस्वराज्य तसेच राष्ट्रीय पेजयल योजना बंद झाल्यानंतर मुख्यमंत्री राष्ट्रीय पेयजल योजना सुरू झाली; मात्र त्यात दोन-चार गावांचाच समावेश राहिला. आता मात्र जलजीवन मिशनची व्याप्ती मोठी आहे. सर्वच गावे यात समाविष्ट होण्यास मदत झाली. या योजनतून पाणीटंचाई संपुष्टात येण्यास मदत होणार आहे.
- नेहा वाजे, सरपंच, बिवली

जलजीवन मिशन योजना तालुक्यातील 162 महसुली गावांमध्ये साकारणार आहे. यासाठी पाणीपुरवठा विभागाकडून केवळ दोन गावांचे अंदाजपत्रक करण्याचे काम बाकी आहे. गावातील लोकांना मुबलक पाणी मिळेल, योजना चांगल्या पद्धतीने साकाराव्यात यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. 2 नियमित अभियंते व 3 कंत्राटी अभियंते अशी कर्मचाऱ्यांची कमतरता असली तरी योजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी होत आहे.
- अविनाश जाधव, उपअभियंता, जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभाग

पाणीटंचाईच्या समस्येचा त्रास प्रामुख्याने महिलांनाच सहन करावा लागतो. पाणीयोजनेत बिघाड अथवा त्या बंद पडल्यानंतर महिलांनाच डोक्यावर हंडे घेऊन पायपीट करावी लागते. यासाठी गावात पाणीयोजना नियमित सुरू राहणे गरजेचे आहे. योजना नियमित सुरू राहण्यासाठी ग्रामस्थांचेही योगदान हवे.
- अक्षता कदम, मिरजोळी

पाणीयोजनांची कामे ही दर्जेदार व्हायला हवीत. कमी प्रमाणात खोदाई, निकृष्ट साहित्याचा वापर केल्यास दुरुस्तीची कामे लवकर निघतात. धामणवणे खोतवाडी येथे जीवनधारा ग्रामीण विकास मंडळाच्या माध्यमातून खासगी स्वरूपात 22 वर्षापासून योजना सुरू आहे. नियमित पाणीपट्टी भरली तरच योजनेचे गणित जुळते अन्यथा विविध समस्येला सामोरे जावे लागते. जलवाहिन्या सुस्थितीत असतानाही थकित बिलामुळे पाणीयोजना बंद पडण्याची शक्यता जास्त असते.
- सतीश जोशी, धामणवणे, माजी सचिव, जीवनधारा ग्रामीण विकास मंडळ)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com