
पावस-मावळंगे सरपंच, उपसरपंचांनी
फोटो ओळी
-rat१२p२९.jg-P२३L८२३११
रत्नागिरी ः मावळंगेतील उद्धव ठाकरे सेनेचे सरपंच-उपसरपंचांचे स्वागत करताना भाजपा जिल्हाध्यक्ष दीपक पटवर्धन. सोबत इतर मान्यवर
------
मावळंगे सरपंच, उपसरपंचांनी
घेतली भाजप जिल्हाध्यक्षांची भेट
ग्रामपंचायतीवर ठाकरे सेनेचे वर्चस्व ; गटातटाच्या राजकारणाची चर्चा
पावस, ता. १३ ः रत्नागिरी तालुक्यातील मावळंगे गावच्या ठाकरे सेनेच्या सरपंच, उपसरपंचांनी भाजपा जिल्हाध्यक्ष दीपक पटवर्धन यांची भेट घेतल्याने अनेक चर्चा रंगू लागले आहेत.
गेली अनेक वर्षे मावळंगे ग्रामपंचायत भाजपाच्या अधिपत्याखाली होती. भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष नाना शिंदे यांचे सातत्याने वर्चस्व या ग्रामपंचायतीवर राहिले होते. हे वर्चस्व मोडीत काढण्यासाठी यापूर्वी आमदार उदय सामंत यांनी विशेष प्रयत्न केले. परंतु शंभर टक्के वर्चस्व या ग्रामपंचायतीवर मिळवता आले नाही.
पावस जिल्हा परिषद गटामध्ये बाळ माने गटाचे वर्चस्व आहे. पर्यायाने नाना शिंदे यांचे यांचे वर्चस्व तळागाळापर्यंत पोहोचलेले आहे. त्यात प्रामुख्याने मावळंगे ग्रामपंचायत नाना शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपल्या ताब्यात ठेवली होती. सध्या तालुक्यामध्ये भाजपमध्ये अंतर्गत दोन गट कार्यरत असल्याने शह देण्याचे एकमेकांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यातूनच ग्रामपंचायत निवडणुकीत शिंदे यांच्या वर्चस्वाला सुरूंग लावण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात आल्याची चर्चा सुरू होती. त्याचा प्रत्यय निवडणुकीमध्ये आला. शिंदे गट व भाजप एकत्र लढूनही त्यांना केवळ चार जागा मिळाल्या, तर ठाकरे सेनेला पाच जागा व सरपंचपद मिळाले. सरपंचपदी नम्रता बिर्जे, उपसरपंचपदी विद्याधर गोगटे यांची निवड झाली.
मात्र ठाकरे सेनेकडून निवडून आलेले असूनही त्यांनी भाजपा जिल्हाध्यक्ष दीपक पटवर्धन यांची भेट घेतली. त्यामुळे परिसरात चर्चेला उधाण आले आहे. पालकमंत्री उदय सामंत यांनी विकास कामांसाठी निधी देऊनही त्यांच्या पाठीशी उभे राहिले नाहीत. तसेच खासदारांकडून निधी मिळत नसल्याने त्यांनी जिल्हाध्यक्षांची भेट घेतल्याचे बोलले जात आहे. त्यांना लागणारा निधी मिळवून देण्याचे आश्वासन दिल्याची चर्चा आहे. कारण या गावातील नाना शिंदे यांचे अस्तित्व संपुष्टात आणण्याच्या दृष्टीने हा गट सरसावल्याचे चित्र आहे. याबाबत मावळंगेचे भाजपाचे स्थानिक अध्यक्ष अनिल बिर्जे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, भाजपा जिल्हाध्यक्ष यांचा मावळंगे गावांमध्ये आपले वर्चस्व निर्माण करण्यासाठी व पक्षाचे अस्तित्व वाढवण्याच्या दृष्टीने केलेला प्रयत्न असू शकतो.