
पान एक-आंबोलीच्या दरडींवर जाळीचा उतारा
82361
आंबोली ः येथील घाटात सुरू असलेले जाळी बसविण्याचे काम.
आंबोलीत दरडींवर जाळीचा उतारा
घाटात काम सुरू ः पावसाळ्यातील धोका ओळखून उपाययोजना
सकाळ वृत्तसेवा
आंबोली, ता. १२ : येथील घाटात धोकादायक ठिकाणी जाळी बसविण्याचे काम सुरू केले आहे. पायोनियर इंजिनिअरिंग वर्क्स या मुंबईतील कंपनीला या कामाचा ठेका देण्यात आला आहे. १० फुटांचे रॉड ड्रीलिंग करून त्यावर नट बोल्टने जाळी बसविण्यात येत आहे. रेल्वे मार्गालगतच्या दरडी रोखण्यासाठी ज्याप्रमाणे उपाययोजना केली जाते, त्याप्रमाणे घाट सुरक्षित करण्याचा उपाय करण्यात येत आहे.
आंबोली घाटातील पावसाळ्यात कोसळणाऱ्या दरडींवर उपाय म्हणून घाट कापण्यास आणि पर्यायी जागा देण्यास केंद्रीय आणि राज्य वनखात्याने नकार दिला. त्यामुळे त्या परिस्थितीत उपाययोजना करण्यासाठी घाटाचा सर्व्हे करण्यात आला होता. तमिळनाडू नदीजोड प्रकल्पाचे शास्त्रज्ञ, तसेच भूवैज्ञानिकांनी देखील सर्व्हेमध्ये घाट कोसळण्याची कारणे आणि त्याचा अहवाल सादर केला होता. त्यानंतर रेल्वेच्या धर्तीवरत्या उंच धोकादायक ठिकाणी जाळी बसविण्याचा निर्णय घेण्यात आला. सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्रालयातून त्याचा ठेका पायोनियर इंजिनिअरिंग वर्क्स, मुंबई या कंपनीला देण्यात आला आहे. दीड वर्षापासून कंपनीचे हे काम सुरू आहे. दोन अभियंते, दोन सुपरवायझर आणि ५६ पश्चिम बंगाल येथील कामगार हे जाळी बसविण्याचे काम करीत आहेत. कोट्यवधींची तरतूद यासाठी थेट बांधकाम खात्याकडून कंपनीसाठी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे सावंतवाडी, आजरा, आंबोली, गडहिंग्लज या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम देखील कोल्हापूर जिल्ह्यात सुरू करण्यात आले आहे; मात्र आंबोली घाटात कोणता पर्याय ठेवला आहे, ते अद्याप स्पष्ट झालेले नाही. तूर्तास सुरू असलेल्या कामावरून घाटातील रुंदीकरण होणार का, याबाबत साशंकता आहे. घाटातील जीर्ण झालेल्या पुलांबाबत देखील सार्वजनिक बांधकाम खात्याने कोणतीही दखल घेतलेली नसून ब्रिटिशकालीन पूलदेखील धोकादायक स्थितीत तसेच आहेत; मात्र आमदार आणि बांधकाम विभाग अधिकारी तोंडावर बोट ठेवून आहेत. पावसाळ्यात फक्त चिंता व्यक्त करण्यापलीकडे प्रत्यक्ष कृती काही होत नाही. ठेकेदारी करणे, कमिशन मिळविणे आणि कामे अडवणे या पलीकडे जनहितासाठी आणि सुरळीत सर्व चालण्यासाठी वाहतुकीस अडथळा असणाऱ्या पुलांबाबत तसेच घाटातील वाहतूक सुरळीत होण्यासाठी त्यांनी सहकार्याची भूमिका घेणे आवश्यक आहे. सध्या या जाळीच्या कामामुळे दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.