सदर-दंतधावन

सदर-दंतधावन

rat१३१२.txt
(३० जानेवारी टुडे पान दोन)


(सदर- टुडे पान २ साठी)

निरोगी राहण्याचा मंत्र आयुर्वेद
फोटो ओळी
- rat१३p२.jpg -
८२४१३
वैद्य निरंजन गोखले
---
रोज सकाळी आवश्यक काम म्हणजे दात घासणे. "दंतधावन". आता तुम्ही म्हणाल यात काय वेगळं सांगितलं आहे? हे तर आम्ही रोज न चुकता करतो. एकदाच नव्हे तर अगदी सकाळी आणि रात्री सुद्धा. पण मग एवढं असून सुद्धा किती टक्के लोकांना डेंटिस्टकडे एकदाही जावं लागत नाही? गुगलवर सर्च केलं तर येणाऱ्या सर्वेक्षणात ८५ ते ९० टक्के प्रौढ लोकांना दातांचे विविध आजार आहेत. कित्येकांच्या दाढा सरसकट काढून टाकण्याशिवाय पर्याय नसतो, ज्या चर्वणासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आपलं पचन हे तोंडातून सुरू होतं. अपचन हे बऱ्याच आजारांचे सुरुवातीचे कारण आहे. त्यामुळे त्या पचनाची सुरुवात ज्या दातांपासून होते ते दात सुदृढ असणं अत्यंत आवश्यक आहे. दातांनी व्यवस्थित बारीक करून मग ते अन्न पोटात गेलं की अग्निकडून पचवण्यासाठी ते हलकं होतं आणि अजीर्णाची भीती उरत नाही. त्यामुळे दात आणि ज्यांनी दात पकडून ठेवले आहेत अशा हिरड्या मजबूत राखणं ही आपली जबाबदारी आहे. नाहीतर हा दंत दंत म्हणण्याची वेळ येते.

--वैद्य निरंजन गोखले, रत्नागिरी
----
"दंतधावन"

आपण रोज दात घासत असून सुद्धा आपले दात आजारी का पडतात? कारण सगळ्यांना ज्ञात आहे की आपण केमिकल युक्त टूथपेस्ट वापरतो. कदाचित तुम्हाला वाटेल की आम्ही करतोय त्या सगळ्याच गोष्टी कशा चुकीच्या आहेत हेच सांगताय तुम्ही.. तर हो ! आपल्याला आपलं आरोग्य टिकवायचं असेल तर स्वतःला, स्वतःच्या दिनचर्येला १८० अंशाच्या कोनात वळवावच लागेल. आयुर्वेदानुसार सकाळी आणि जेवणानंतर दात घासावेत, असा नियम सांगितला आहे. वड, पिंपळ, उंबर, रुई, खैर, करंज, अर्जुन, निंब इत्यादी झाडांच्या काड्या त्यांचा अग्रभाग चावून त्याचा कुंचला (ब्रश) करून त्याने दात घासावेत आणि हिरड्यांना इजा होणार नाही असे घासावे. कित्येक जण संडासच्या भांड्यात ब्रश फिरवावा तसं खसाखसा जोर जोरात दात घासतात. त्याने हिरड्यांना इजा होण्याची शक्यता असते. हिरड्यामधून रक्त येतं. त्या नाजुक हातात. हे होऊ नये इतक्यातच जोराने दात घासावेत. उत्तर भारतामध्ये आजही दातून वापरण्याची प्रथा आहे. दातून (कडूनिंबाची काडी) हल्ली ऑनलाइन सुद्धा विकत मिळतात. अगदी दातून नाही मिळालं तर या सर्व प्रकारच्या वनस्पतींची चूर्ण एकत्र करून जे दंतमंजन केलं जातं ते सुद्धा दातांसाठी हितकारक आहे. दातांना मंजन करून (मंजन म्हणजेच चोळणे मसाज करणे) मग अगदी वाटल्यास मऊ ब्रशने दात घासायला हरकत नाही. सर्व प्रकारच्या केमिकल युक्त, फेस येणाऱ्या टूथपेस्टचा बहिष्कार करून दंतमंजनाची कास धरण्याची आवश्यकता आहे. ब्रश वापरायला हरकत नाही पण तोही जपून वापरावा आणि तो वेळेवर बदलावा जेणेकरून तो झिजून त्याच्या ब्रिस्टल्सचे कण पोटात जाणार नाहीत. याने हिरड्या मजबूत होतील, दात दुखणे, सुजणे हे थांबेल. याच चूर्णाचा उपयोग त्याचा काढा किंवा सिद्ध जल करून गुळण्या करण्यासाठी, तोंडात चूळ धरून ठेवण्यासाठी (गंडूष) केला तर दाढ दुखायची ही कमी येते.
ग्लोबलायझेशन, विविध ब्रँड्सची स्पर्धा आणि आपलं भारतीय मार्केटची भव्यता यामुळे विविध विदेशी उत्पादनांचे आपण बळी झालो. काहीजण टूथपेस्टमध्ये नमक आणि कोळसा घालू लागलेत. मग असली थेरं करण्यापेक्षा स्वदेशी दंतमंजन वापरले तर काय वाईट? साधं त्रिफळा चूर्णाने दात घासले तरी उत्तम उपयोग होतो. त्यामुळे टूथपेस्ट वापरणे बंद करून दंतमंजन वापरा.
जिव्हा निर्लेखन म्हणजेच जिभेवरच कोटिंग जीभ घासून काढणे हेही तितकच महत्त्वाच आहे. त्यासाठी टंग क्लीनरचा उपयोग करायला हरकत नाही. जीभ व्यवस्थित स्वच्छ ठेवली तर दुर्गंध येत नाही. फेस येणारं काहीही, ते स्वच्छता करण्यासाठी चांगलं असा आपला एक गोड गैरसमज झालेला आहे. आंघोळ करताना सुद्धा चांगला फेस आला नाही तर आपल्याला आंघोळ झाल्यासारखे वाटतच नाही. तसंच दात घासताना सुद्धा तोंडात फेस आला नाही तर दात घासल्यासारखे वाटत नाहीत. इतकी वर्षे हा फेस निघाल्यामुळे त्या फेसाची आपल्याला सवय झाली आहे. पण तसं बघायला गेलं तर फेस आणणे हे वाताचे काम आहे. म्हणजे जिथे जिथे फेस येतो तिथे वातवृद्धी होत असते आणि त्यामुळे वाताचे रुक्ष, खर हे गुण वाढतात. हे गुण झीज होण्यास कारणीभूत असतात. दात हे तर साक्षात अस्थिधातू (हाडं) आहेत आणि हाडांना वात हा शत्रुप्रमाणे आहे. म्हणजेच जितका वात जास्त वाढेल तितकी हाडांची झीज वाढत जाणार. म्हणजेच दातांच्या बाबतीत बोलायचं झालं तर जितका फेस जास्त काढणार तितके तुमचे दात जास्त झिजणार. या सगळ्या गोष्टी लक्षात घेता वनस्पतींची चूर्ण असलेलं दंतमंजन वापरणे हेच उत्तम होय. गोष्टी बारीक सारीक वाटल्या तरी महत्त्वाच्या आहेत. आरोग्संपन्नतेकडे वाटचाल ही अशाच छोट्या छोट्या गोष्टी सुधारून होणार आहे हे निश्चित.

(लेखक वाग्भट चिकित्सालय, रत्नागिरी आयुर्वेद चिकित्सालय, आडिवरे येथे कार्यरत आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com