
कुडाळ बालोद्यानातील खेळणी मोडकळीस
82691
कुडाळ ः येथील बालउद्यानमधील खेळण्यांच्या दुरावस्थेबाबत नगराध्यक्ष आफरिन करोल यांना निवेदन देताना येथील नागरिक पीटर शॅराव. सोबत इतर.
कुडाळ बालोद्यानातील
खेळणी मोडकळीस
नगरपंचायतीस निवेदन; उपोषणाचा इशारा
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १४ ः येथील पोलीस स्टेशन समोरील बालउद्यानमधील खेळण्यांची अवस्था एकदम दयनीय झालेली आहे. संबंधित प्रशासनाने त्याची दखल घ्यावी, अन्यथा उपोषणास बसण्याचा इशारा येथील नागरिक पीटर शॅराव यांनी पत्रकातून दिला आहे.
शॅराव यांनी नगरपंचायतीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मे महिन्याची सुट्टी जवळ येत असून त्यावेळी मुले विरंगुळ्यासाठी आपल्या पालकांसोबत उद्यानात येतात आणि या खेळण्यांच्या सहाय्याने त्यांच्या सुट्टीची मजा घेतात; परंतु सद्यस्थितीत येथील उद्यानातील खेळण्याचे साहीत्य मोडलेले आहे आणि त्यांना गंजपण पकडलेला आहे. त्यामुळे जर मुलांनी त्यांचा वापर केला तर मुले त्यावरुन खाली पडून त्यांना दुखापत होऊ शकते. हे साहित्य लोखंडाचे असल्यामुळे मुलांना गंभीर आजार, इन्फेक्शन होऊ शकते. येथील नगरपंचायत प्रशासनाने यावर गंभीर लक्ष घातलेले नाही. त्यामुळे नगरपंचायतीने मुलांना सुट्टीच्या अगोदर उद्यानात मोडकळीस आलेली खेळणी दुरुस्त करुन किंवा नवीन खेळणी बसविण्याची मागणी आहे. उद्यानात सुशोभित फुलझाडे लावून उद्यानाचे देखाभालीसाठी नेहमीसाठी एक कर्मचारी नेमणे, हे उद्यान हे अडगळीच्या जागेवर असून कोणाचेही नजरेत येत नसल्याने कृपया मुख्य रस्त्यावर उद्यानाला जाणारा फलक लावणे गरजेचे आहे. सुट्टीच्या पुर्वी ही मागणी पूर्ण करावी. अन्यथा अन्य नागरिकांना सोबत घेऊन एक दिवस उपोषणाला बसणार आहे. याची नोंद संबंधित यंत्रणेने घ्यावी, अशी मागणी शॅराव यांनी पत्रकातून केली आहे.