रत्नागिरी ःक्युआर कोड करणार पोलिस गस्तीची निश्चिती

रत्नागिरी ःक्युआर कोड करणार पोलिस गस्तीची निश्चिती

पान १ साठी

क्यूआर कोड करणार गस्तीची निश्चिती
---
५०४ स्पॉटपैकी रत्नागिरीत ८४; जिल्हा पोलिस दलाचे ई-पेट्रोलिंगपुढे एक पाऊल
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १४ ः अत्याधुनिकतेची कास धरलेल्या जिल्हा पोलिस दलाने आणखी एक अनोखा प्रयोग केला आहे. ई-पेट्रोलिंगच्या पुढे एक पाऊल टाकून गस्तीसाठी नवीन अॅप विकसित केले. जिल्ह्यातील महत्त्वाच्या, संवेदनशील आणि गुन्हे घडण्याच्या संभाव्य जागांवर आता क्यूआर कोड स्कॅनिंग करून गस्त घातली जाणार आहे. क्यूआर कोडमुळे आता गस्तीची निश्चिती होईल. त्यासाठी जिल्ह्यात ५०४ स्पॉट निश्चित केले आहेत. रत्नागिरी शहरात ८४ पॉइंट, तर ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत २४ पॉइंट आहेत. या पॉइंटवर क्यूआर कोड लावले.
पेट्रोलिंगमध्ये होणारी टाळाटाळ रोखण्यासाठी आणि गस्त प्रभावीपणे व्हावी, यासाठी ही नवी पद्धत सुरू केली आहे. पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी आणि अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी ही माहिती दिली. गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा पोलिस दलाकडून अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. गस्त प्रभावीपणे घातली जावी, हा यामागील मुख्य उद्देश आहे. कोरोनामुळे लॉकडाउन असल्याने जिल्ह्यातील रस्त्यावरील गुन्हे काही प्रमाणात नियंत्रणात आले होते. मात्र, लॉकडाउन शिथिल होताच पुन्हा गुन्हेगारी कारवाया वाढल्या आहेत. पोलिसांतर्फे पुन्हा गस्तीला प्राधान्य दिले जात आहे. बीट मार्शल तसेच पोलिस ठाण्यातील इतर अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांमार्फत पेट्रोलिंग केले जाते का? पोलिसांमार्फत गस्तीत टाळाटाळ होत नाही ना? हे जाणून घेण्यासाठी नवीन क्यूआर कोड प्रणाली विकसित केली. जिल्ह्यात हा प्रयोग राबविण्यात येत आहे. महत्त्वाच्या ठिकाणी क्यूआर कोड लावले आहेत.
सध्या सकाळी गोपनीय विभागाकडून पुतळे तसेच महत्त्वाच्या ठिकाणांची पाहणीची गस्त, दामिनी पथक, रात्रीची गस्त त्यानंतर पोलिसांच्या विविध शाखांमार्फत गस्त घातली जाते. आता या सर्व गस्त टप्प्याटप्प्याने घालण्यात येणार आहेत. ज्या भागात गुन्हे घडतात किंवा गुन्हे घडण्याची शक्यता असते, अशा ठिकाणची गस्त वाढविण्यात येणार आहे. क्यूआर कोड पद्धतीची गस्त कोकणात प्रथमच रत्नागिरीत सुरू करण्यात येईल.

यामुळे गस्त होणार प्रभावी
गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या मोबाईलमध्ये हे विशेष अॅप असेल. त्याद्वारे निश्चित केलेल्या पॉइंटवर संबंधित कर्मचाऱ्याने क्यूआर कोड स्कॅन करायचा आहे. त्यामुळे त्या पॉइंटला गस्त घातल्याचे वरिष्ठांना कळेल. या दरम्यान या ठिकाणी काही घडल्यास त्याची जबाबदारी गस्त घातलेल्या पोलिसांची असेल आणि क्यूआर कोड स्कॅन न केल्यास संबंधितावर कारवाई केली जाणार आहे. यामुळे अतिशय प्रभावी ही गस्त होण्यास मदत होईल.


...म्हणून ई-पेट्रोलिंग बंद
शहर आणि परिसरात यापूर्वी ई-पेट्रोलिंग सुरू केले होते. पॉइंट निश्चित करून टॅग लावले होते. ज्या कर्मचाऱ्यावर गस्तीची ड्यूटी आहे, त्याने त्या टॅगला मशिन लावून आपण या ठिकाणी येऊन गस्त घालून गेल्याचे मशिनवर नमूद होत होते; परंतु त्यानंतर कर्मचारी फक्त टॅग करण्यासाठी जाऊ लागले. गस्तीचे महत्त्व कमी झाले. त्यामुळे ई-पेट्रोलिंग बंद पडले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com