
श्वापदाच्या हल्यात चार वासरांचा मृत्यू
82801
विजयदुर्ग ः येथील याच गोठ्यातील वासरांवर हिंस्त्र श्वापदाकडून हल्ला करण्यात आला.
श्वापदाच्या हल्यात चार वासरांचा मृत्यू
विजयदुर्गमधील घटना; बिबट्या असल्याचा अंदाज
देवगड, ता. १४ ः हिंस्त्र श्वापदाने केलेल्या हल्यात विजयदुर्ग-हिराबाग (ता.देवगड) येथील एका गोठ्यात बांधलेल्या चार वासरांचा मृत्यू झाला. हल्लेखोर प्राणी बिबट्या असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. ही घटना काल (ता.१३) पहाटे चारच्या सुमारास घडली. वनविभागाला माहिती दिल्यानंतर वनविभागाच्या प्रतिनिधींनी घटनास्थळी पंचनामा केला.
जंगलामध्ये दिवसेंदिवस वन्य प्राण्यांच्या उपजिवीकेचा प्रश्न निर्माण होत असल्याने हिंस्त्र श्वापदे मानवी वस्तीकडे सरकत असल्याचे चित्र आहे. भक्ष्याच्या शोधार्थ भरवस्तीमध्ये हिंस्त्र श्वापदे येत असल्याचे दिसून येत आहे. जामसंडे-मळई भागातही मागील काही महिन्यापूर्वी वासरांवर केलेल्या हल्यात त्यांचा मृत्यू झाला होता. आता विजयदुर्ग येथील एकाच शेतकऱ्याच्या चार वासरांना एकाचवेळी लक्ष्य करण्यात आले आहे. घराशेजारील गोठ्यातील चार वासरे मारण्यात आली. यामुळे संबधित शेतकरी जयंत श्रीकांत गोखले यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे संबधित हिंस्त्र श्वापदाचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. श्री. गोखले यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोठ्यात एकूण २५ गुरे बांधण्यात आली होती. त्यातील चार वासरांवर पहाटे चार वाजण्याच्या सुमारास हिंस्त्र श्वापदाने हल्ला केल्याने त्यांचा मृत्यू झाला. हल्ला करणारा प्राणी बिबट्या असावा, असा अंदाज आहे. आता सुरक्षितता म्हणून गोठ्यातील अन्य जनावरे दुसरीकडे बांधण्यात आली आहेत, असे त्यांनी सांगितले.
---------
कोट
एकाचवेळी चार वासरांवर हल्ला करणारी बिबट्याची मादी असावी आणि तिच्यासोबत पिल्ले असावीत. मादी पिल्लांना शिकार करण्यास शिकवत असल्याने एकाचवेळी चार वासरे मारण्यात आली असावीत, अशी शक्यता आहे.
- प्रा. नागेश दप्तरदार, वन्यजीव अभ्यासक