
देवरूख ः तीन वर्ष झाली, न्याय कधी मिळणार
सांडपाण्याच्या प्रश्नावर
तीन वर्ष मागताहेत न्याय
दिव्यांग जाधवांची कहाणी; गटारांची प्रतिक्षा
देवरूख, ता. १५ः सांडपाण्याच्या प्रश्नावर न्याय मागण्याला तीन वर्ष झाली तरी अद्याप न्याय मिळालेला नाही. मला न्याय कधी मिळणार असा सवाल दिव्यांग संजय श्रीधर जाधव यांनी केला आहे. देवरूख सावरकर चौकाजवळील त्यांच्या इस्त्रीच्या दुकानाजवळच सांडपाणी उघड्यावर सोडले आहे. यामुळे पसरलेल्या दुर्गंधीमुळे कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. तरी या सांडपाण्याचा बंदोबस्त करावा, अशा मागणी त्यांनी निवेदनाद्वारे वारंवार नगरपंचायतीकडे केली आहे. तरीही याबाबत देवरूख नगरपंचायतीने लक्ष दिलेले नाही, अशी जाधव यांची तक्रार आहे.
जाधव यांनी शेवटचे निवेदन ५ मे २०२२ ला दिल्याची त्यांच्याकडे पोच आहे. देवरूख नगरपंचायतीने याबाबत काहीच उपाययोजना केलेली नाही. संगमेश्वर-साखरपा असा हा शहराबाहेरून जाणारा मार्ग आहे. या रस्त्याला मुळातच अनेक वर्षे दोन्ही बाजूने काही ठिकाणी गटारांची सोयच केलेली नाही. हा नवीन रस्ता ३२ किमीला ३२ कोटी रुपये मंजूर होऊन तयार केला गेला. या वेळी या रस्त्याला दोन्ही बाजूने पक्की गटारे येतील, असे सांगितले गेले होते. तसेच सह्याद्रीनगर ते कांजिवरा असा एका बाजूने रनिंग ट्रॅक होणार, असे जाहीर झाले होते. या सर्व पार्श्वभूमीवर या गटारांचा नगरपंचायतीशी संबध आहे की बांधकाम विभाग आता यात लक्ष घालणार आहे? हा नवीनच प्रश्न संजय जाधव यांच्या तक्रारीनुसार पुढे आला आहे. हे सांडपाणी कुठे जाणार की आहे तिथेच मुरणार, अशी शक्यता निर्माण झाली आहे.