आदिवासींना स्मशानभूमीसाठी जागा देण्याची मागणी

आदिवासींना स्मशानभूमीसाठी जागा देण्याची मागणी

स्मशानभूमीला जागा द्या
बिरसाची मागणी ; आज ठिय्या आंदोलन
रत्नागिरी, ता. १६ ः जामगे-विसापूर ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात असणाऱ्या बेंद्रेवाडी, कातकरवाडी, नवानगर कातकरवाडी व जामगे हद्दीतील कातकरवाडी या चार वाडींसाठी जामगे-विसापूर लघुपाटबंधारे योजनेसाठी संपादित केलेल्या धरणाच्या खालील बाजूस शिल्लक जागेमध्ये स्मशानशेड बांधण्यास परवानगी मिळावी, या मागणीसाठी उपविभागीय अधिकारी मृदा व जलसंधारण उपविभाग दापोली यांना बिरसा फायटर्स संघटनेने निवेदन दिले. यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा, कृष्णा हिलम, भिकाजी तांबट आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
स्मशानभूमीच्या मागणीसाठी उपविभागीय कार्यालय दापोलीसमोर बिरसा फायटर्सचे जामगे विसापूर ग्रामस्थांच्या उपस्थितीत उद्या (ता.१७) ठिय्या आंदोलन होणार आहे. या आंदोलनाचे निवेदन दापोलीचे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार वैशाली पाटील, गटविकास अधिकारी आर. एम. दिघे यांनाही देण्यात आले आहे. उपविभागीय जलसंधारण अधिकारी, मृदा व जलसंधारण उपविभाग दापोली यांच्या २२ नोव्हेंबर २०२१ च्या पत्रान्वये ग्रामपंचायत विसापूर कार्यक्षेत्रातील असणाऱ्या बेंद्रेवाडी, कातकरवाडी, नवानगर कातकरवाडी व जामगे हद्दीतील कातकरवाडी या चार वाडींसाठी पूर्वीपासून असणाऱ्या स्मशानभूमीच्या जागेवर स्मशानशेड बांधण्यास मनाई केली आहे. शासनाकडून स्मशानशेड बांधण्यासाठी साडेतीन लाख रुपये मंजूर झाले असले तरी स्मशानशेड बांधण्यास मनाई असल्यामुळे ही रक्कम परत जात आहे. स्मशानशेड नसल्यामुळे गावात अंत्यसंस्कारावेळी समस्या निर्माण होते. पावसाळ्यात स्मशानशेडअभावी प्रेत जळत नाही. अंत्यविधी करण्यास अडचण येणे, लोकांना पावसात भिजत उभे राहावे लागते. त्या जागेवर प्रेत जाळण्यास मनाई केल्यामुळे आता प्रेत जाळायचे कुठे, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
गटविकास अधिकारी यांच्या पत्रानुसार स्मशानशेड बांधण्यास साडेतीन लाख मंजूर झाले. तरीही जामगे-विसापूर येथील ४ वाड्यातील मयत व्यक्तींचे पूर्वीपासून प्रेत जाळून अंत्यसंस्कार करत असलेल्या जागेवर स्मशानशेड बांधण्यास ग्रामस्थांना उपविभागीय जलसंधारण अधिकारी, मृदा व जलसंधारण उपविभागाकडून अद्याप परवानगी दिली जात नाही. या ठिकाणी स्मशानशेड बांधण्यास अडचणी निर्माण केल्या जात आहेत. या गावातील लोकांनी आता अंत्यसंस्कार प्रेत कुठे जाळायचे, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाने लवकरात लवकर स्मशानशेड बांधण्यास परवानगी देऊन प्रश्न लवकरात लवकर सोडवावा. स्मशानशेड बांधण्याच्या कामात राजकीय लोक अडथळे निर्माण करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com