
लोकसभा उमेदवार भाजपच ठरवणार
83032
सावंतवाडी ः येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना राजन तेली. शेजारी सज्जन गोयल.
लोकसभा उमेदवार भाजपच ठरवणार
राजन तेली ः शिक्षणमंत्री दीपक केसरकरांचे मत घेण्याची गरज नाही
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १५ ः आधी नारायण राणे यांच्याविरोधात बोलणारे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आता त्यांच्याबद्दल चांगले बोलत आहेत. त्याबद्दल मी त्यांचे जाहीर अभिनंदन करतो. लोकसभेचा उमेदवार अद्याप ठरलेला नाही; परंतु असा निर्णय घेताना भाजपकडून केसरकरांचे मत नक्कीच विचारात घेतले जाणार नाही, असा टोला भाजप जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राजन तेली यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत हाणला.
तेली यांनी आज येथे आयोजित कार्यकारिणी मेळाव्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. त्यांच्या समवेत अॅड. सज्जन गोयल आणि वेंगुर्लेचे तालुकाध्यक्ष बाळू देसाई उपस्थित होते. तेली पुढे म्हणाले, ‘‘गेली बरीच वर्षे केसरकर हे राणे कुटुंबीयांच्या विरोधात सतत बोलत होते; मात्र आता शिंदे गट आणि भाजपची युती झाल्यानंतर त्यांनी राणेंबद्दल चांगले बोलण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे त्यांचे जाहीर अभिनंदन करतो. राणेंची लोकसभा निवडणुकीसाठी चर्चा होत असली तरी त्याचा निर्णय भाजपातील वरिष्ठ नेते घेणार आहेत. त्यामुळे त्याबद्दल आम्ही काही बोलणार नाही. लोकसभा निवडणुकीसाठी राणे उमेदवार असल्यास मी त्यांचा प्रचार करेन, असे विधान केसरकर यांनी केले होते. त्यामुळे मी मनापासून त्यांचे आभार मानतो; मात्र येणाऱ्या काळातील निवडणुकांसाठी आम्हाला त्यांचे मत विचारात घेण्याची गरज नाही. आगामी निवडणुका आम्ही स्वबळावर लढविण्याची तयारी केली असून कोकण भाजपमय नक्कीच करू, असा विश्वास आहे. निवडणुकीवेळी भाजपाचे वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील, तो आम्ही अंमलात आणू. येणाऱ्या पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपंचायत निवडणुकीसाठी भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते तयारीला लागल्यामुळे यश नक्कीच प्राप्त होणार आहे. जिल्ह्यातील काही अधिकाऱ्यांविरोधात माझ्याकडे तक्रारी आल्या आहेत. ते या ठिकाणी आम्हाला कोणत्याही प्रकारचे सहकार्य करीत नाही. त्यामुळे राज्यात सत्ताबदल झाले हे अजूनही या अधिकाऱ्यांना समजलेले नाही, असे वाटते. याची दखल घेऊन केंद्रीय मंत्री राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे याकडे लक्ष वेधणार आहे. तसा निर्णय आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे.’’
तेली म्हणाले, ‘‘सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थी दहावी, बारावीत पुढे आहेत; मात्र स्पर्धा परीक्षेत ते टिकत नाहीत. हे लक्षात आल्यामुळे आता जिल्ह्यातील आठही वाचनालयांत स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षण देणारे व्हर्च्युअल क्लासरुम सुरू करण्यात येणार आहेत. पालकमंत्री चव्हाण यांच्या संकल्पनेतून या उपक्रम राबविण्यात येणार आहे. आगामी काळात जिल्ह्यातील ३८ आरोग्य केंद्रे टेलिमेडिसीन सुविधेच्या माध्यमातून जोडण्यात येणार आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात सुध्दा आता मुंबईतील मोठमोठ्या हॉस्पिटलच्या वैदयकीय अधिकार्यांचे मार्गदर्शन उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. या ठिकाणी आज झालेल्या मेळाव्यात पक्षबांधणीबाबत चर्चा झाली. येणार्या सर्व निवडणुका स्वबळावर लढविण्यासाठी योग्य ते नियोजन केले आहे. देशात आणि राज्यात दोन्हीकडे आमचा पक्ष आहे. त्यामुळे जास्तीत जास्त निधी जिल्ह्यात यावा आणि मोठ्या प्रमाणात विकासकामे व्हावीत, यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. कामे सुचविताना तालुका किंवा जिल्हा पदाधिकार्याला विश्वासात घेऊनच कामे व्हावीत; अन्यथा संबंधित कार्यकर्ते किंवा पदाधिकार्यांची गय केली जाणार नाही. जिल्ह्यात काही अधिकारी मनमानी करीत असल्याचे आढळून आले आहे. सत्ताबदल झाला असला तरीही ते जुन्याच सरकारच्या काळात काम करीत असल्यासारखे वागत आहेत. अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी वरिष्ठांकडे करणार आहे.’’
.................
तूर्त स्वबळावर ठाम
सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवरील मोक्याच्या जागा पंचतारांकित हॉटेल्सना देण्यात आल्या आहेत. त्या ठिकाणी त्यांना काहीच उभारायचे नसेल, तर त्या जागा अन्य उदयोगपतींना देऊन रोजगार आणण्यासाठी आम्ही लवकरच आंदोलन करणार आहोत, तेली यावेळी म्हणाले. यावेळी निवडणुकांत शिंदे गटासोबत जाणार की नाही याबाबत विचारले असता, तूर्त स्वबळावर लढणार असून आयत्यावेळी वरिष्ठांचा निर्णय झाल्यास त्यावेळी निर्णय घेऊ, असे स्पष्ट केले.
--
बंद पडलेले प्रकल्प लवकरच मार्गी
राज्यात आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार सत्तेत आहे. हे दोन्ही नेते अत्यंत सकारात्मक विचारांचे आहेत. त्यामुळे गेली काही वर्षे केवळ राजकारणापोटी विरोधासाठी विरोध म्हणून जिल्ह्यातील बंद पडलेले सी वर्ल्ड, नाणार व अडाळी एमआयडीसीसारखे प्रकल्प लवकरच मार्गी लागतील, असा विश्वास तेली यांनी व्यक्त केला.