बेस्टचे १० लाख स्मार्ट मीटर!

बेस्टचे १० लाख स्मार्ट मीटर!

बेस्टचे १० लाख स्मार्ट मीटर!
मुंबई ः बेस्टच्या वीज वितरण क्षेत्रात १० लाख ग्राहकांचे मीटर येत्या काळात स्मार्ट तंत्रज्ञानावर कार्यरत होतील. बेस्ट उपक्रमातर्फे मुंबईतील वीज वितरण क्षेत्रात मीटर बदलण्यात येत आहेत. त्यानुसार मार्चपासून वॉर्डनिहाय कामाला सुरुवात होईल. मुंबईतील निवासी, औद्योगिक, वाणिज्यिक आणि झोपडपट्टी भागातील ग्राहकांचे मीटर नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून बदलण्यात येणार आहेत. बेस्ट आणि अदाणी यांच्यातील करारानुसार १३०० कोटी रुपये त्या कामासाठी उपक्रमाकडून देण्यात येणार आहेत. मुंबईत वीज वितरणाची जबाबदारी असलेल्या बेस्ट उपक्रमाकडून अदाणी कंपनीसोबत करार करण्यात आला आहे. त्यानुसार अदाणी कंपनीच्या माध्यमातून तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यात येणार आहे. प्रत्येक वॉर्डात मीटर बदलण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठी मुंबईत काही ठिकाणी कंट्रोल रूमही तयार करण्यात येतील. स्काडा तंत्रज्ञानाचा वापर करून स्मार्ट मीटर वापरात येतील. सुरुवातीला वॉर्डनिहाय रहिवासी सोसायटीच्या आणि आस्थापनांच्या ठिकाणी स्मार्ट मीटर बदलण्याचे काम केले जाईल. त्यानंतर झोपडपट्टी भागात या तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. या भागातील जागेची उपलब्धता तसेच देखभाल-दुरुस्तीसारखी आव्हाने असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले; परंतु वॉर्डात एकाचवेळी अनेक ठिकाणी कामे करणे शक्य होईल. त्यामुळे वर्षभरात १० लाख मीटर स्मार्ट तंत्रज्ञानाचा वापर करून बदलण्याचे लक्ष्य ठेवल्याचे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
---
हिमालय पूल एप्रिलपासून सेवेत
मुंबई ः छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वेस्थानकाकडील दुर्घटनाग्रस्त हिमालय पुलाच्या पुनर्बांधणीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पुलाचे काम अंतिम टप्प्यात असून एप्रिलमध्ये तो प्रवाशांच्या सेवेत येईल, अशी माहिती पालिकेच्या पूल विभागातील अधिकाऱ्याने दिली. मुंबईत पोलादापासून तयार करण्यात येणारा हिमालय पहिलाच पूल ठरणार आहे. यापूर्वी तो फेब्रुवारीमध्ये पूर्ण होणार असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, आता तो एप्रिलमध्ये सेवेत येणार आहे. हिमालय पूल १४ मार्च २०१९ मध्ये कोसळून झालेल्या दुर्घटनेत सात जणांना जीव गमवावा लागला होता. दुर्घटनेनंतर तो पाडून नव्याने बांधण्याचा निर्णय पालिकेने घेतला. मागील एक-दीड वर्षापासून पुलाचे काम सुरू आहे. पूल बांधण्याबाबत पूल विभागाकडून आराखडा तयार करण्यात आला होता. नवीन आराखड्यानुसार हिमालय पूल टिकाऊ स्टेनलेस स्टीलचा बांधण्यात येत असून त्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. ओरिसावरून आणलेले पाच गर्डर टाकण्याचे कामही पूर्ण झाले आहे. हिमालय पुलाला आतापर्यंत पाच गर्डरची जोड दिली गेली आहे. पूल झाल्यानंतर त्याचा रोज सुमारे ५० हजार पादचाऱ्यांना फायदा होईल.
---
आपत्कालीन स्थितीतही सलग पाणी
मुंबई : मुंबईत आता आपत्कालीन परिस्थितीतही शुद्धीकरण न केलेले तलावातील पाणी थेट उपलब्ध होणार आहे. मुंबईतील भांडुप जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या ठिकाणी ४० वर्षांनंतर पहिल्यांदाच २४ तास पाणी बंद ठेवत जल अभियंता विभागाने मोठे काम हाती घेतले होते. दरम्यान दहा वर्षांपासून रखडलेले कामही पूर्ण करण्यात आले आहे. परिणामी आपत्कालीन परिस्थितीतही सलग पाणीपुरवठा होणार आहे. भांडुप जलशुद्धीकरण प्रकल्पात पालिकेने २०१२ मध्ये दोन वॉल्व्हचे काम केले होते; परंतु त्यामधून पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी मुंबईचे पाणी थांबवणे गरजेचे होते. १० वर्षांपासून काम प्रतीक्षेत होते. आता २४ तास पाणीपुरवठा बंद करून ते पूर्ण करण्यात आले. त्यामुळे आता आपत्कालीन स्थितीत भांडुप जलशुद्धीकरणाची प्रक्रिया बायपास करूनही पाणी उपलब्ध होणार आहे. प्रकल्पात काही तांत्रिक अडचण असल्यास किंवा काही कारणाने संच बंद पडल्यास पाणीपुरवठा थांबणार नाही, अशी व्यवस्था झाली आहे. मुंबईकरांना जलशुद्धीकरणाची प्रक्रिया न केलेले पाणीही आपत्कालीन स्थितीत थेट गुरुत्वाकर्षणाच्या माध्यमातून मिळेल.
--
महाशिवरात्रीनिमित्त बेस्टच्या जादा बस
मुंबई : महाशिवरात्रीनिमित्त कान्हेरी लेणी आणि बाबुलनाथ मंदिराला भेट देणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून बेस्टने शनिवारी (ता. १८) या मार्गावर अतिरिक्त बस चालवण्याचा निर्णय घेतला आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान प्रवेशद्वार ते कान्हेरी लेणी मार्गावर बसमार्ग क्र. १८८ (मर्या.) च्या सहा अतिरिक्त बस सकाळी १०.३० ते सायंकाळी ७.३० दरम्यान चालविण्यात येतील. बाबुलनाथ मंदिरात जाण्यासाठी बसमार्ग क्र. ५७ (वाळकेश्वर ते पी. टी. उद्यान, शिवडी), क्र. ६७ (वाळकेश्वर ते अँटॉप हिल) आणि क्र. १०३ (वाळकेश्वर ते कुलाबा बस स्थानक) अशा तिन्ही मार्गांवर सकाळी ७ ते सायं. ७ दरम्यान सहा अतिरिक्त बस चालविण्यात येतील.
--
मरीनलाईन्स स्थानकातील पादचारी पूल बंद
मुंबई : मरीनलाईन्स रेल्वेस्थानकातील फलाट क्रमांक दोन-तीन आणि चारला जोडणारा पादचारी पूल तोडण्याचा आणि त्या जागी नवीन पादचारी पूल उभारण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे. त्यामुळे आजपासून प्रवाशांसाठी हा पूल ३० नोव्हेंबरपर्यंत बंद करण्यात येणार आहे. पादचारी पूल नव्याने बांधण्यासाठी तो १५ फेब्रुवारी ते ३० नोव्हेंबरपर्यंत बंद राहणार आहे. रेल्वे प्रवासी फलाट क्रमांक चार ते दोन-तीन किंवा त्याउलट प्रवास करण्यासाठी मरीनलाईन्स स्थानकावरील मध्यवर्ती आणि उत्तर दिशेच्या दोन पादचारी पुलांचा वापर करू शकतात. फलाट क्रमांक एकवरील बुकिंग कार्यालयाजवळील मरीनलाईन्स पादचारी पुलावरून प्रवासी प्रवेश करू शकतात किंवा फलाट क्रमांक चारवर पादचारी पुलाचा पायऱ्यांचा उपयोग करू शकतात, असे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com