
‘आग्रा’वर होणार शिवजयंती
83250
कुडाळ ः पत्रकार परिषदेत बोलताना राजन तेली. शेजारी संध्या तेरसे, बंड्या सावंत, राकेश कांदे आदी.
‘आग्रा’वर होणार शिवजयंती
राजन तेली; निर्णयाचे भाजपतर्फे स्वागत
कुडाळ, ता. १७ ः छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती रविवारी (ता. १९) आग्रा किल्ल्यावर साजरी करण्यास पुरातत्त्व खात्याने मंजुरी दिली आहे. त्यामुळे यंदा या किल्ल्यावर शिवजयंती सोहळा मोठ्या धूमधडाक्यात साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती भाजपचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी दिली.
कुडाळ एमआयडीसी येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत भाजप जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार तेली बोलत होते. यावेळी जिल्हा चिटणीस बंड्या सावंत, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा संध्या तेरसे, नगरपंचायत भाजप गटनेते विलास कुडाळकर, नगरसेवक नीलेश परब, अॅड. राजीव कुडाळकर, शहराध्यक्ष राकेश कांदे, सचिन तेंडुलकर, राजवीर पाटील आदी उपस्थित होते.
जिल्हाध्यक्ष तेली म्हणाले, ‘‘छत्रपती शिवाजी महाराजांचे जगात कौतुक होत असून मराठेशाहीच्या इतिहासात आग्रा किल्ल्याला महत्त्वाचे स्थान आहे. याच किल्ल्यातील दिवाण-ए- आममध्ये शिवरायांनी बाणेदारपणा दाखवला होता. याच दिवाण-ए-आममध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची ३९३ वी जयंती यंदा धूमधडाक्यात साजरी होणार आहे. या किल्ल्यावर पहिल्यांदाच हा जयंती उत्सव साजरा होत आहे. या ठिकाणी शिवजयंती साजरी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह केंद्र व राज्याने विशेष प्रयत्न केले. तेली म्हणाले, ‘‘महाराष्ट्र सरकार या कार्यक्रमाचे सहसंयोजक आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री सहभागी होणार आहेत. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून पुणे येथे साकारण्यात आलेल्या शिवसृष्टीच्या पहिल्या टप्प्याचा लोकार्पण सोहळा केंद्रीय गृहमंत्री शहा यांच्या हस्ते होणार आहे.’’